कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव; मात्र भाजपला बहुमत नाही !

  • अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणून हिंदूंच्या श्रद्धांचे निर्मूलन करणार्‍या, टिपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या आणि लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रयत्न करून हिंदु धर्मात फूट पाडू पहाणार्‍या काँग्रेसला हिंदूंनी त्याची जागा दाखवून दिली !
  • भाजप सत्तेत येण्याची शक्यता असल्याने पुन्हा हिंदूंची मंदिरे ‘अनधिकृत ठरवून पाडली जाणार नाहीत ना ?’ याकडे हिंदूंनी लक्ष ठेवावे !
  • ‘भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखल्या जातील’, अशी हिंदूंची अपेक्षा !
  • देशातील २९ पैकी २२ राज्ये आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात कोणता अडसर आहे ?

बेंगळुरू – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ‘वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी’, असे संबोधले जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १५ मे या दिवशी झाली. त्यात काँग्रेसचा पराभव झाला, तर भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला. मतमोजणीतून भाजपला १०४ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेस ७८ जागांवर पुढे आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरेपक्ष) या पक्षाला ३८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक ११३ जागा कोणालाही न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे या दिवशी येथे मतदान झाले होते. आर्.आर्. नगर येथील भागात अपप्रकार झाले, तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

सरकार स्थापनेसाठी जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांच्यात युती

सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला सत्ता मिळू नये, यासाठी काँग्रेसने जनता दल (ध) पक्षाचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्याची सिद्धता दर्शवली. कर्नाटकचे प्रभारी (कार्यभार बघणारे) गुलाम नबी आझाद यांनी याविषयी देवेगौडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला. नंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला.

तत्पूर्वी भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. नियमानुसार सर्वाधिक जागा जिंकणार्‍या पक्षाला सरकार स्थापन करण्यास बोलावले जाते. त्यामुळे भाजपला ही संधी मिळणार असली, तरी काँग्रेस आणि जनता दल (ध) हेही एकत्रित सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. गोव्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा असतांना भाजपने गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करून सत्ता स्थापनेचा दावा केला होता आणि त्याला तेथील राज्यपालांनी मान्यता दिली होती अन् त्यामुळे तेथे भाजपचे सरकार आले होते. याच अनुषंगाने कर्नाटकातही झाल्यास भाजपला सत्ता प्राप्त करणे अशक्य आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ९ जागांची आवश्यकता आहे.

कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केल्यास काँग्रेसमधील लिंगायत आमदारांची पक्ष सोडण्याची धमकी

काँग्रेसने जनता दल(ध)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्यास मान्यता दिल्याने काँग्रेसमधील लिंगायत समाजाचे आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी कुमारस्वामी यांना विरोध केला आहे. ‘त्यांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष सोडून जाऊ’, अशी धमकी आमदारांनी दिली आहे.

१. कर्नाटकमधील सत्ता गमावल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कर्नाटकमधील सत्ता टिकवणे महत्त्वाचे होते. स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता.

२. कर्नाटकातील पराभवामुळे काँग्रेसची देशात केवळ पंजाब आणि मिझोराम ही २ राज्ये अन् केंद्रशासित पुद्दुचेरी राज्य येथे सत्ता उरली आहे. एकेकाळी २६ पैकी १६ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. वर्ष २०१४ मध्ये काँग्रेस १३ राज्यांमध्ये सत्तेत होती. मागील ४ वर्षांमध्ये १३ पैकी १० राज्यांमधील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. (काँग्रेसला लागलेली घरघर ! यावरून काँग्रेसवाल्यांना जनतेने झिडकारले आहे, हे निश्‍चित ! – संपादक)

३. ‘मतदानानंतर अनेक जनमत चाचण्यांनी कर्नाटकमध्ये कुणालाच बहमत मिळणार नाही. येथे त्रिशंकू स्थिती निर्माण होईल’, अशी शक्यता वर्तवली होती. केवळ दोन चाचण्यांमध्ये ‘भाजपला बहुमत मिळेल’, असे म्हटले होते.

४. कर्नाटकातील विजयामुळे आता देशातील २२ व्या राज्यात भाजपचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. देशातील ७५ टक्के जनता या राज्यांमध्ये रहाते.

‘इव्हीएम्’चा वापर करूनही कूर्मगतीने होणारी मतमोजणी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम्) असतांनाही सायंकाळी उशिरापर्यंत मतदान झालेल्या सर्व २२२ मतदार संघातील अंतिम निकाल लागला नव्हता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्‍वरी येथे पराभव, तर बदामीमध्ये विजय

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्‍वरी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला; मात्र बदामी मतदार संघात ते केवळ ४ सहस्र मतांनी विजयी झाले. त्यांनी दोन ठिकाणावरून निवडणूक लढवली होती. सिद्धरामय्या यांनी यापूर्वी केवळ चामुंडेश्‍वरीमधून निवडणूक लढवली आहे; पण विजयाची शक्यता नसल्याने त्यांनी बदामी येथूनही निवडणूक लढवली.

लिंगायत आणि मुसलमान यांचे भाजपला मतदान

निवडणुकीच्या पूर्वी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसला निवडणुकीत धक्का बसला. लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या ३७ जागांवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली. दुसरीकडे मुसलमानबहुल १० जागांवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसने ८ जागांवर आघाडी घेतली. मागासवर्गियांचा प्रभाव असलेल्या १९ मतदारसंघात भाजपला आणि १६ मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली.

राहुल गांधी नव्हे, तर काँग्रेसचे स्थानिक नेते उत्तरदायी ! – काँग्रेस

कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राहुल गांधी यांनी त्यांच्या बाजूने उत्तम कामगिरी केली; पण आम्ही या निवडणुकीत कमी पडलो. हा आमचा पराभव आहे, असे काँग्रेस नेते डी.के. शिवाकुमार यांनी म्हटले आहे.

कर्नाटकची निवडणूक जिंकणारे वर्ष २०१९ ची निवडणूक जिंकतील ! – योगऋषी रामदेवबाबा

कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल; कारण जो पक्ष ही निवडणूक जिंकेल, त्यांच्यात वर्ष २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे.

लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता

वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे ‘जनतेचा कल कोणत्या बाजूने आहे’, हे पाहिले जाणार होते. आता भाजपने कर्नाटकात काँग्रेसचा पराभव केल्यानंतर याचा लाभ घेऊन वर्ष २०१९ पूर्वीच देशात लोकसभेच्या निवडणूक घेण्याच्या हालचाली भाजपकडून होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याचसमवेत येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश यांसह ६ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही त्यासह घेण्याचाही विचार केला जात आहे, तसेच महाराष्ट्रातही विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शक्यता आहे. ही निवडणूक या वर्षीच्या साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मासांत होऊ शकते.

कर्नाटक निवडणुकीवर १० सहस्र कोटी रुपयांचा व्यय (खर्च)

  • एकीकडे देशातील अर्ध्याहून अधिक जनता अर्धपोटी जगत असतांना निवडणुकांवर सहस्रावधी कोटी रुपये व्यय करणारे राजकीय पक्ष लोकशाही निरर्थक ठरवतात ! निवडणुकांवर सहस्रावधी कोटी रुपये व्यय करण्यापेक्षा जनहितकारी हिंदु राष्ट्र हवे !
  • निवडणुकीत व्यय करण्यात आलेले पैसे कुठून आणले जातात आणि नंतर हेच पैसे सत्तेत आल्यावर कसे वसूल केले जातात, हे जनतेला माहिती आहे !

बेंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० सहस्र कोटी रुपयांचा व्यय (खर्च) करण्यात आला आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांनी या निवडणुकीत प्रचंड पैसा व्यय केल्याने ही निवडणूक देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक ठरली आहे. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने (‘सीएम्एस्’ने)या निवडणुकीच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (याची निवडणूक आयोग चौकशी करील का ? – संपादक)

१. या सर्वेक्षणानुसार या निवडणुकीमध्ये ९ सहस्र ५०० ते १० सहस्र ५०० कोटी रुपये व्यय करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या व्ययापेक्षा हा व्यय अधिक आहे. यात पंतप्रधान मोदी यांच्या सभांवर झालेल्या व्ययाचा समावेश करण्यात आलेला नाही.

२. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा व्यक्तीगत व्ययही ७५ टक्क्यांनी वाढल्याचे पाहणीतून आढळून आले आहे.

३. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या व्यक्तीगत व्ययात ५५ ते ६० टक्क्यांनी वाढ होणार आहे, तर राजकीय पक्षांच्या व्ययात २९ ते ३० टक्के वाढ होणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

४. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० सहस्र ते ६० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत एकूण ३० सहस्र कोटी रुपये व्यय करण्यात आले होते, असे ‘सीएम्एस्’चे के.एन्. भास्कर राव यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now