काँग्रेसचा पराभव हा हिंदुद्वेषी विचारांचा पराभव !

संपादकीय

काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेच्या कितीही गमजा मारल्या असल्या, तरी जनतेच्या मनातील काँग्रेसचे स्थान मतमोजणीतून स्पष्ट झाले. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजप १०४ जागांसह पहिला मोठा पक्ष बनला आहे, तर काँग्रेस ७८ जागांसह दुसर्‍या स्थानावर फेकली गेली आहे. जनता दलाला ३८ जागांवर यश मिळाल्यामुळे सत्तास्थापनेत त्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निकालामुळे काँग्रेसमुक्त भारत बनवण्यातील एक मोठा टप्पा पार पडला आहे. वर्ष २०१४ पासून भाजप एकेक राज्य सर करत आहे. त्याचा लाभ याही निवडणुकीत भाजपला मिळणे, हे स्वाभाविक होते. काँग्रेसला एक मोठे राज्य टिकवता आलेले नाही आणि पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे पंजाब, पुद्दुचेरी आणि मिझोराम या राज्यांपुरती काँग्रेस सीमित झाली आहे. आता देशातील केवळ अडीच टक्के समाजावर काँग्रेसचे राज्य राहिले आहे, हेच या निकालाचे वैशिष्ट्य आहे.

काँग्रेसची हिंदुविरोधी कृत्ये !

वास्तविक सत्ताधारी पक्षाला ५ वर्षांत केलेले कार्य दाखवून मते मागता येतात. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आलेला नाही; कारण जनतेच्या उत्कर्षासाठी काम करण्यापेक्षा हिंदुविरोधी कारवाया आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची जुनी सवय ! गेल्या ५ वर्षांच्या काळात काँग्रेसने हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुढे आणला. काँग्रेसच्याच काळात हिंदुद्रोही मोगल आक्रमक टिपू सुलतान याची जयंती सरकारी पातळीवर साजरी होऊ लागली. हिंदुत्वनिष्ठांकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊनही कानात वारं भरल्याप्रमाणे काँग्रेस भरकटतच गेली. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता दिली. याने लिंगायत समाजाला आकर्षित करण्याचा काँग्रेसचा डाव होता; मात्र लिंगायतबहुल भागात जनतेने काँग्रेसला पिछाडीवरच टाकले. हिंदु समाज फोडून त्याचा राजकीय अपलाभ घेऊ पहाणार्‍या काँग्रेसवाल्यांना यातून मोठी चपराकच मिळाली आहे. कर्नाटकमध्ये करण्यासारखे बरेच काही होते; मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात कर्नाटकचा विकास थांबला. त्यांच्या शासनात राज्याचा विकासदर वाढला नाही. निवडणूक जिंकण्यासाठी सिद्धरामय्या यांनी एक रुपये किलो तांदूळ, कर्जमाफी आणि ५ रुपयांत जेवण यांसारखी अनेक आमीषे दाखवली. कोणत्याच प्रकारच्या आश्‍वासनांना या वेळी जनता भुललेली नाही. भ्रष्ट आणि आेंगळ कारभार असल्यामुळे अन् हीन राजकारणामुळे देशभरातून काँग्रेस नामशेष झाली आहे. उरलेले मोठे राज्य कर्नाटक जिंकणे, हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा विषय होता; म्हणून या निकालांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

निर्णायक स्थिती !

भाजप कर्नाटककडे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून पहात आहे. दक्षिण भारतात पाय घट्ट रोवण्यासाठी भाजपला कर्नाटककडून अपेक्षा आहेत. वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता भाजपला दक्षिण भारतातून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आंध्रप्रदेश सध्या विशेष राज्याच्या दर्जाच्या सूत्रावरून भाजपवर नाराज आहे. त्यामुळे दक्षिणेत सध्या भाजपला कर्नाटकच्या जोरावर पुढे सरकण्याची संधी मिळाली आहे. असे असले, तरी कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे आता सत्तेसाठी घोडेबाजार चालू झाला आहे. ‘गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांत जनतेने भरभरून मते देऊन कुणाच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या’, असे झालेले नाही. त्या राज्यांप्रमाणेच या विधानसभेतही स्पष्ट बहुमतापर्यंत कोणताच पक्ष पोहोचू शकलेला नाही. त्यामुळेच भाजप किंवा काँग्रेस दोघांनाही जनता दलाला (सेक्युलर) समवेत घ्यावे लागणार आहे. यापूर्वी गोवा येथे बहुमत मिळूनही निर्णयप्रक्रियेत विलंब केल्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. ते टाळण्यासाठी या वेळी काँग्रेसने ७८ जागा मिळूनही ३८ जागा मिळालेल्या जनता दलाला (सेक्युलर) घाईघाईने पाठिंबा घोषित केला आहे. यावरून कर्नाटकमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस किती अगतिक आहे, हेच लक्षात येते.

बहुमत सिद्ध करून प्रत्यक्षात सत्ता कोण स्थापन करणार, हे कळेलच; मात्र सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणण्याचे दिवस आता संपले आहेत. जनता जागृत झाली आहे. ६० वर्षांतील काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून देशभरातील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. याला ‘केवळ एका पक्षाचा अंतिम काळ’ एवढ्यापुरते न समजता, हा देशभरात स्वातंत्र्यापूर्वीपासून चालू असलेल्या हिंदुविरोधी षड्यंत्राचा अस्तकाळ आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. कायमच हिंदूंची मते गृहीत धरून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे, त्यांच्यावर सवलतींची खैरात करणे, हिंदूंचे सातत्याने दमन करणे, पराकोटीची घराणेशाही जपणे, असले प्रकार आता या देशात फार काळ चालणार नाहीत. ‘सत्ता सांभाळण्यासाठी हिंदुविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’, असाच संदेश या निवडणुकीत हिंदूंनी दिला आहे. त्याकडे येणार्‍या नव्या सरकारनेही दुर्लक्ष करू नये आणि सुशासन करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! सत्ता स्थापन केलीच, तर भाजपने तेथे चालू असलेली शासकीय टिपू सुलतान जयंती, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आदी रहित करावे. हेच खरे मतदाराचे किंवा जनतेचे मन जाणणे आहे !