नोबेल आणि नैतिकता !

संपादकीय

‘यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही’, अशी घोषणा या पारितोषिकासाठी साहित्यिकांची निवड करणार्‍या स्वीडिश अकादमीने केली आहे. जगात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या नोबेल पुरस्काराच्या ११७ वर्षांच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे. याला कारणही तसेच आहे. या अकादमीच्या सदस्या कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती आणि छायाचित्रकार क्लाऊड अर्नाल्ट यांनी मागील काही वर्षांत १८ महिलांचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे स्वीडनमध्ये गदारोळ माजला. यांनतर ‘अर्नाल्ट यांनी या पुरस्कारासाठी ज्या साहित्यिकांच्या नावांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे, त्यांची नावे फोडली’, असा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. या आरोपाची संवेदनशीलता लक्षात घेऊन फ्रोस्टेन्सन यांनी त्यागपत्र दिले. त्यानंतर अकादमीच्या प्रमुख प्रा. सारा दायिस यांनीही त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले; मात्र त्याआधी त्यांनी अर्नाल्ट यांच्याशी अकादमीचे असलेले सर्व संबंध तोडून टाकले. भारतात भ्रष्टाचार्‍यांवर आरोप झाल्यास त्यांना पाठीशी घालण्यात धन्यता मानली जाते. ते पहाता प्रा. दायिस यांनी घेतलला निर्णय नक्कीच कौतुकास्पद वाटतो. महत्त्वाचे म्हणजे स्वीडिश अकादमीतील काहींचा अर्नाल्ट यांना पाठिंबा आहे, तर काही सदस्यांचा विरोध. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अकादमीतील हे अंतर्गत भांडण मिटवण्यासाठी स्वीडनचे पंतप्रधान आणि राजा यांना हस्तक्षेप करावा लागला. ‘स्वीडनच्या हितासाठी हे अंतर्गत वाद मिटवावेत’, असे आवाहन या दोघांनी केले. त्याचा मान राखत काही सदस्यांनी अकादमीच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. स्वीडिश अकादमीमध्ये उफाळलेल्या वादानंतर जगाचे लक्ष या घटनेकडे गेले. आणि जगभर या विषयावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. यामुळे ‘स्वीडनची अपकीर्ती होऊ नये’, याचे भान जपण्याचा अनाहुत सल्ला त्या देशाचे पंतप्रधान आणि राजा यांनी दिला. भारतात कठुआ प्रकरण, अखलाख हत्या प्रकरण, गोहत्या या सूत्रांवरून पुस्कार वापसी टोळी आणि प्रसारमाध्यमे यांनी हे वाद रंगवून जगात भारताची नाचक्की केली. कुठल्याही घटनेवर वादविवाद हे व्हायलाच हवेत; मात्र त्यामुळे ‘जगात देशाची अपकीर्ती होत नाही ना ?’, याचे भान ठेवायला नको का ? ही सर्व सूत्रे पहाता स्वीडिश अकादमीच्या या प्रकरणातून भारतियांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.

प्रतिमा डागाळल्याची चिंता !

नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. साहित्याच्या नोबेल पुरस्कार निवडीची प्रक्रिया तर वर्षभर चालू असते. स्वीडिश अकादमीतील काही सदस्यांनी त्यागपत्र दिल्यानंतर आता अस्तित्वात असलेल्या सदस्यांची संख्या ११ आहे. वास्तविक या ११ सदस्यांनी ठरवले असते, तर तेही एखाद्या साहित्यिकाची या पुरस्कारासाठी निवड करू शकले असते; मात्र त्यांनी असे करण्यास असमर्थता दर्शवली. ‘पुरस्कार निवडीसाठी जे निकष पाळले जातात, ते काटेकोरपणे पाळले जावेत’, यासाठी अकादमी आग्रही असून त्याविषयी तडजोड करण्यास ती सिद्ध नाही. यावरून पुरस्कार निवडीच्या कार्याविषयी तिची असलेली बांधिलकी दिसून येते. भारतात असे होते का ? भारतात विविध क्षेत्रांत विविध पुरस्कार दिले जातात; मात्र ‘ज्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात, त्यातून पुरस्काराची पत राखली जाते

का ?’, हा एक गहन प्रश्‍न आहे. प्रतिवर्षी पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली जाते. यात बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील अनेक नटनट्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यांची नावे वाचून ‘संबंधितांचे समाजासाठी सोडाच, चित्रपटसृष्टीसाठी काय योगदान आहे ?’, असा प्रश्‍न सामान्यजनांना पडतो. मध्यंतरी पद्मश्री पुरस्कारप्राप्त सैफ अली खान पतौडी यांनी उपाहारगृहात एकाला मारहाण केल्यावर पुरस्कारप्राप्त मंडळींच्या असभ्य वर्तनाविषयी बरेच काही बोलले अथवा लिहिले गेले. भारतातील होतकरू खेळाडू नेमबाज गगन नारंग किंवा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ‘त्यांना विशिष्ट पुरस्कारांपासून वंचित ठेवले जात आहे’, असा आरोप केला होता. या दोघांनी त्यांच्या क्षेत्रात केलेली कामगिरी पहाता त्यांना ते पुरस्कार मिळणे आवश्यक होते; मात्र पुरस्कारांनी त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. यावरून भारतात विविध क्षेत्रांत दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची निवड प्रक्रिया किती उथळ आहे, हे दिसून येते. स्वीडिश अकादमीने जशी भूमिका घेतली, तशी भूमिका भारतात पुरस्कार देणारी एखादी तरी संस्था घेऊ शकेल का ?

नैतिकतेचे मूल्य मोठे !

‘अकादमीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काही कालावधी जाईल’, असे स्वीडिश अकादमीने म्हटले आहे. तिचे म्हणणे रास्तही आहे. ‘सामाजिक स्तरावर कार्य करणे किती महत्कठीण असते’, हे यातून लक्षात येते. स्वीडिश अकादमी किंवा सामाजिक स्तरावर कार्य करणार्‍या तत्सम संघटना यांविषयी लोकांच्या मनात कमालीचा आदर असतो. ‘या संघटनांकडून केली जाणारी प्रत्येक कृती ही आदर्शच असायला हवी’, अशी लोकांची अपेक्षा असते. त्यामुळे संघटनेकडून किंवा तिच्या सदस्यांकडून काही चुका झाल्यास तिची विश्‍वासार्हता धुळीला मिळते. नैतिकतेच्या बळावर चालू असलेल्या कुठल्याही कार्याची फलनिष्पत्ती निश्‍चितच वाढते. ‘त्याचा लाभ हा समष्टीवरही होत असतो’, हे वेगळे सांगायला नको. समष्टीच्या नैतिकतेचे अवमूल्यन होत असेल, तर तिथे हस्तक्षेप करून नीतीमत्तेचा र्‍हास थोपवण्याचे दायित्व शासनकर्त्यांचे आहे. सध्याच्या युगात नीतीमान वर्तनासाठी आग्रही रहाणे, हे काहींना कठीण वाटू शकते; मात्र धर्माचे अधिष्ठान लाभल्यास अशक्य असे काहीच नाही. सरतेशेवटी प्रत्येक गोष्ट ही धर्मापर्यंत येऊन पोहोचते. धर्माचरणामुळे समाजाचे व्यापक हित साधले जात असेल, तर संविधानच धर्माधिष्ठित करण्यास काय हरकत आहे ?


Multi Language |Offline reading | PDF