मागासवर्गियांच्याच घरी केवळ भोजन न करता त्यांना स्वतःच्या घरीही बोलवा ! – रा.स्व. संघाने भाजप नेत्यांना फटकारले

अशा कृतीने समरसता साध्य होणार का ?

नवी देहली – अष्टमीच्या दिवशी मागासवर्गीय समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो; पण आपण आपल्या मुलींना कधी त्यांच्या घरी पाठवतो का ? दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला, तरच समरसता अभियान यशस्वी होईल. केवळ मागासवर्गियांच्या घरी जाऊन भोजन करून चालणार नाही, तर त्यांनाही स्वतःच्या घरी बोलावले पाहिजे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे. सध्या भाजप नेत्यांनी मागासवर्गियांच्या घरी जाऊन भोजन करण्याचा प्रकार चालू केला आहे. त्यावर देहलीत संघाच्या झालेल्या बैठकीत भागवत यांनी वरील विधान केल्याचे म्हटले जात आहे.

संघाचे देहलीचे सहप्रांतचालक आणि विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, केवळ मागासवर्गियांच्या घरी जेवल्याने समरसता येणार नाही. त्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. त्यांच्या घरी गेल्याने ‘धन्य’ झालो, असे कुणाला वाटत असेल, तर तो केवळ अहंकार आहे. जर कोणी स्वत:ला मोठा आणि दुसर्‍याला छोटा समजून त्याच्या घरी जेवत असेल, तर त्याने समरसता कधीच येणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF