सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव काँग्रेससह ७ पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन आणला आहे. या प्रस्तावावर एकूण ७१ खासदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत. हे पत्र देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

दुसरीकडे या महाभियोगावरून काँग्रेसमध्येच मतभेद झाले आहेत. या प्रस्तावावर विरोधी पक्षातील लालूप्रसाद यादव यांच्या राजद आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने स्वाक्षर्‍या केलेल्या नाहीत, तसेच या संदर्भातील बैठकांना या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या व्यतिरिक्त साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे, तर त्यांच्याच पक्षाचे प्रकाश करात यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा प्रस्तावाला विरोध

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी उघडपणे या प्रस्तावाला विरोध केला आहे. ते म्हणाले की, ‘महाभियोग हे गंभीर सूत्र आहे. सरन्यायाधिशांच्या विरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावाच्या चर्चेत मी सहभागी नाही. न्यायव्यवस्थेशी सर्वच जण सहमत होऊ शकत नाही. एवढेच कशाला, न्यायाधीशही एखाद्या निर्णयावर सहमत होत नसतात. कधी कधी तर न्यायालयाचे निर्णयही पालटले जातात. संसदेत महाभियोगाची कारवाई होणार नाही, याचा मला विश्‍वास आहे. आपल्या व्यवस्थांची हानी होईल, असे काही करता कामा नये.’


Multi Language |Offline reading | PDF