पतीनिधनाच्या अतीव दुःखद प्रसंगाला सामोरे जातांना श्रीमती क्षमा शशिकांत राणे यांनी वर्णिलेली मनाची अवस्था आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् प.पू. गुरुमाऊली यांनी स्थुलातून आणि सूक्ष्मातून कसे सावरले, याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्री. शशिकांत राणे

५.४.२०१८ या दिवशी सायंकाळी ५.५० वाजता शशिकांत राणेकाका यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी क्षमा राणे २९.३.२०१८ ते ५.४.२०१८ या कालावधीत सेवेसाठी देवद आश्रमात गेल्या होत्या. ५.४.२०१८ या दिवशी सकाळी राणेकाकांना गोव्यातील रुग्णालयात भरती केल्यावर राणेकाकू देवद आश्रमातून गोव्याला येण्यास निघाल्या. त्या वेळी त्यांच्या मनाची झालेली स्थिती, त्यांनी राणेकाकांचा घेतलेला अखेरचा निरोप आणि या कालावधीत अनुभवलेली गुरूंची कृपा त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

१. मन अस्वस्थ असतांनाच यजमानांंची प्रकृती ठीक नसल्याचा मिळालेला निरोप आणि प्रथमच केलेला विमानप्रवास !

श्रीमती क्षमा राणे

१ अ. मध्यरात्रीपासून अस्वस्थ वाटून यजमानांंची आठवण येणे आणि सकाळी सौ. सुप्रिया माथुर यांनी ‘काकांना बरे वाटत नसल्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुम्हाला रामनाथी आश्रमात येण्यास सांगितले आहे’, असा निरोप देणे : ‘५.४.२०१८ हा दिवस उगवला. मला मध्यरात्रीपासूनच थोडी अस्वस्थता वाटत होती आणि झोप येत नव्हती. यांची (यजमानांची) आठवण येत होती. ‘त्यांंना बरे वाटत नाही का ?’, असे विचार येत होते. आदल्या रात्रीच त्यांच्याशी बोलणे झाले; पण त्या वेळी तेे काहीच बोलले नाहीत. उलट त्यांनी मला सांगितले, ‘‘तुझ्या सर्व सेवा करूनच तू येथे येे.’’ मी या विचारांत असतांना सकाळी साधारण १० च्या सुमारास सौ. सुप्रिया माथुर यांनी मला सांगितले, ‘‘काकू, तुम्ही रामनाथी आश्रमात जा, आम्ही नंतर तिकडे येतो.’’ मी ‘‘का ?’’ असा प्रश्‍न विचारल्यावर तिने मला सांगितले, ‘‘राणेकाकांना थोडे बरे वाटत नाही. कुणीतरी आपले माणूस जवळ असावे; म्हणून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुम्हाला यायला सांगितले आहे.’’ तोपर्यंत सौ. सुप्रिया माथुर आणि सौ. आर्या कासकर यांनी माझी बॅग भरून ठेवली होती. मुंबईला जाण्यासाठी माझे रेल्वेचे आरक्षणही झालेले होते.

१ आ. रुग्णालयात भरती केल्याचा निरोप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देऊन गोव्याला विमानाने येण्यास सांगणे : नंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला, ‘‘काकू, काळजी करू नका. काकांना थोडे बरे वाटत नाही; म्हणून रुग्णालयात भरती केले आहे; पण तुम्ही विमानाने गोव्याला या.’’ त्यांनी असे सांगितल्यावर मला थोडी भीती वाटली. त्या वेळी पू. (सौ.) अश्‍विनी पवार मला धीर देत होत्या, तसेच ‘मला तेथून लवकर निघता यावे’, यासाठी माझे विमानाचे तिकीट आणि इतर सिद्धताही करत होत्या. १० मिनिटांनी पुन्हा सद्गुरु बिंदाताईंचा भ्रमणभाष आला, ‘‘काकू, तुम्ही घाबरू नका. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण तुमच्या समवेत आहेत.’’ नंतर प्रत्येक १५ ते २० मिनिटांनी त्यांचा धीर देणारा भ्रमणभाष मला येत होता.

१ इ. विमानतळावरील सोपस्कारांची एका साधकाने माहिती देणे आणि एकटीने विमान प्रवास करण्याची पहिलीच वेळ असल्याने जणू ‘परीक्षेतील पहिली प्रश्‍नपत्रिका चालू झाली’, असे वाटणे : ‘देवद आश्रम ते मुंबईतील विमानतळ’ या प्रवासात श्री. योगेश प्रभुदेसाई हे साधक मला माहिती सांगत होते. ‘विमानतळावर गेल्यावर कसे, कुठे जायचे आणि कुठे काय करायचे ?, बोर्डिंग पास कसा घ्यायचा ?’, आदी सर्व माहिती ते मला समजावून सांगत होते; पण माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. एकटीने प्रवास करण्याची आणि तोही विमानाने प्रवास करण्याची, ही माझी पहिलीच वेळ होती. प्रत्येक वेळी प्रवासात यजमान किंवा कुणीतरी साधक समवेत असायचे; म्हणून मी अगदी निर्धास्त असायचे. ‘येथूनच माझ्या परीक्षेची पहिली प्रश्‍नपत्रिका चालू झाली’, असे मला जाणवले.

२. ‘यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी साधक आणि संत नामजपाला बसले आहेत’, हे ऐकल्यावर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येणे अन् ‘मुंबई ते गोवा’ या ५५ मिनिटांच्या विमानप्रवासात प्रार्थना, नामजप होणे

त्यानंतरही मला सद्गुरु बिंदाताईंचा भ्रमणभाष येत होता, ‘‘काकू, घाबरू नका. येथे काकांवर औषधोपचार आणि आध्यात्मिक उपाय चालू केले आहेत. त्यांच्यासाठी सर्व साधक आणि संत नामजप करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सर्व साधक, सर्व संत, परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले प्रार्थना करत आहेत.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, यांची प्रकृती चिंताजनक असावी. विमानाने उड्डाण केले आणि माझ्या मनानेही; पण कुणीतरी सूक्ष्मातून मला प्रार्थना आणि नामजप यांची आठवण करून देत होते. त्या होत्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ! ‘मुंबई ते गोवा’ या ५५ मिनिटांच्या विमानप्रवासात माझी प्रार्थना आणि नामजप चालू होता.

३. मनाची होणारी घालमेल आणि पतीनिधनाचा मिळालेला निरोप !

३ अ. गोवा येथील विमानतळावर उतरल्यावर मन अस्वस्थ होणे, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रत्येक १० मिनिटांनी भ्रमणभाषवरून धीर देणारा संदेश पाठवणे आणि यजमानांची भेट होण्यापूर्वीच त्यांची जीवनज्योत मावळल्याचा भ्रमणभाष येणे : गोवा येथील विमानतळावर उतरल्यावर माझे मन पुन्हा अस्वस्थ झाले. ‘मी कधी रुग्णालयात पोहोचते’, असे मला झाले. तेवढ्यात मला पुन्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी सांगितले, ‘‘काकांची प्रकृती जरा गंभीर आहे; पण तुम्ही स्थिर रहा. सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.’’ प्रत्येक १० मिनिटांनी भ्रमणभाषवरून त्या मला धीर देणारा संदेश पाठवत होत्या. ‘‘काका बेशुद्ध झाले आहेत’’, असे त्यांनी सांगितल्यावर मी समजायचे, ते समजले; पण तरीही ‘मी गरुडझेप घेऊन (विमानप्रवास करून) आले आहे, तर किमान दृष्टीभेट तरी व्हावी’, असे मला वाटत होते; पण मी अभागी ठरले. सायंकाळी ५.५५ वाजता सद्गुरु बिंदाताईंचा यांची जीवनज्योत मावळल्याचा भ्रमणभाष आला.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून आधार देत असल्याची जाणीव होणे : त्या क्षणी मला कुणीतरी आधार देत होते. ‘माझ्या मनाला कुणीतरी हातात घेऊन बसले आहे’, असे मला जाणवत होते. ते दुसरे-तिसरे कुणी नव्हते, तर माझे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले हे होते. मी त्यांच्या चरणांशी होते. माझ्या मनाला कोणत्याच संवेदना जाणवत नव्हत्या.

३ इ. यजमानांच्या मृतदेहाकडे पहातांना ‘ते निद्रेत असून लगेच उठून बसतील’, असे वाटणे : रुग्णालयात माझ्या पुतण्याने ‘काकी’ अशी हाक मारल्यावर मी भानावर आले. त्या वेळी पुन्हा सद्गुरु ताईंनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘‘काकू आता लगेच आत जा. आताच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांना डोळे भरून पाहून घ्या. एकच संधी आहे.’’ त्यानंतर डॉ. पांडुरंग मराठे मला आत घेऊन गेले. यांना पाहिल्यावर ‘ते निद्रेत आहेत आणि मी आले आहे’, हे कळल्यावर ते नक्कीच उठून बसतील’, असे मला वाटत होते. त्या क्षणी क्षणभर मला भास झाला की, ‘यांनी क्षणभर डोळे उघडून मला पाहिले.’ बस ! तेच शेवटचे दर्शन ! त्यांच्या चरणांना स्पर्श करून मी बाहेर आले.

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि आश्रमातील साधिका यांनी पदोपदी सांभाळणेे

मी आश्रमात आल्यावर सर्व साधिका मला पुष्कळ जपत होत्या. सद्गुरु बिंदाताई तर प्रत्येक क्षणाला मला धीर देत होत्या. सौ. मनीषा पानसरे, सौ. भक्ती खंडेपारकर, कु. युवराज्ञी शिंदे, तसेच सौ. श्रुती डुबळे या साधिकांनी मला कुठलीही उणीव भासू नये; म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली. त्यांच्याकडून मला कळले की, ‘रामनाथी आश्रमात साध्वी प्रज्ञासिंह आल्या आहेत ! खरेच, ‘त्यांच्या नियोजनात सद्गुरु बिंदाताई किती व्यस्त असतील ना !’, तरीही त्यातून वेळ काढून त्या माझ्यासाठी सर्वांना सूचना देत होत्या. मला धीर देत होत्या आणि मला मन स्थिर ठेवण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करत होत्या.

५. अंत्यविधीची सिद्धता

५ अ. ‘अंत्यविधी कुठे करायचा ?’, याविषयी पुतण्याने विचारल्यावर मागील एका प्रसंगाचे स्मरण होऊन ‘आपण गुरुचरणी आहोत, तर आपले सर्व आश्रमातच होणार’, असे यजमानांनी सांगितल्याची आठवण होणे : नंतर ‘‘काकांना आपल्या गावाला (आरवली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) घेऊन जायचे ना !’’, असे मला पुतण्याने विचारले. त्या वेळी मला एक प्रसंग आठवला. एकदा आम्ही दोघे बोलत असतांना मृत्यूचा विषय निघाला. तेव्हा मी यांना म्हणाले, ‘‘आपल्यापैकी कोण पुढे जाणार ? कधी जाणार ? ते ठाऊक नाही !’’ तेव्हा हे धीर देत मला म्हणाले, ‘‘आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. आपण आता गुरुचरणी आहोत. त्यांनी आपल्याला त्यांच्या कुशीमध्ये घेतले आहे. आता आपले सर्व आश्रमातच होणार ना ! मग तुला आणि मला काळजी कशाला वाटायला हवी ? कुणीही पुढे गेले, तरी आपले सर्व आश्रमातच होणार आहे ! आपण आता सर्वस्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तन, मन आदींनी अर्पण होऊया. तू मन कसे अर्पण करता येईल, ते अगोदर बघ. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं त्यांच्या चरणी अर्पण करून आपल्याला त्यांना जिंकायचे आहे.’’

मी भानावर आल्यावर ‘यांचा अंत्यविधी आश्रमात करूया’, असे मला वाटत होते; पण निर्णय घेण्यास मी असमर्थ होते.

५ आ. आश्रमच सर्वस्व असल्याने ‘सर्व अंत्यविधी आश्रमातच व्हावेत’, असे वाटणे आणि यासाठी दिरांनी सहमती दर्शवणे : १९९९ या वर्षी आम्ही ठाण्याचे घर सोडले. तेव्हापासून १९ वर्षे आम्ही आश्रमातच आहोत. आश्रमच आमचे घर होते. आश्रमच आमचे सर्वस्व होते. आश्रम आमचा आणि आम्ही आश्रमाचे होतो; म्हणून मी माझ्या दिरांना सांगितले, ‘‘यांचा अंत्यविधी आश्रमातच गुरुचरणी व्हावा’, असे मला वाटते, तरीही मी तुमच्या शब्दांबाहेर नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल !’’ दिरांनीही लगेच माझ्या मताला सहमती दर्शवली आणि अंत्यविधी आश्रमात करण्याचे मान्य केले.

५ इ. अंत्यविधीच्या वेळी विष्णुस्वरूप गुरुमाऊली आणि संत उपस्थित असणे अन् एका डोळ्यात दुःखाश्रू आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू असणे : माझ्या गुरुमाऊलीने सर्व भार घेतला होता. प.पू. गुरुमाऊली नेहमी ‘माझे साधक’ असेच संबोधतात. प.पू. गुरुमाऊलीला साधकांविना दुसरे कुणीही प्रिय नाही. सर्व साधक जीव ओतून साहाय्य करत होते. अंत्यविधीची सिद्धता करत होते. अंत्यविधीच्या वेळी विष्णुस्वरूप गुरुमाऊली प्रत्यक्ष तेथे उपस्थित होती. अन्य संतही उपस्थित होते. यांना सर्वांचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्या जीवनाचे सोने झाले, यापेक्षा माझ्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट कोणती ? एका डोळ्यांत दुःखाश्रू होते, तर दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू, समाधान आणि कृतज्ञता दाटून आली होती. मी कृतकृत्य झाले होते. ‘आमच्याइतके भाग्यवान कुणीही नाही’, असे मला वाटत होते.

५ ई. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मनातील भीती बोलून दाखवल्यावर त्यांनी खोलीत येऊन आईच्या वात्सल्याने आपल्या कुशीत घेणे आणि त्या क्षणी ‘प.पू. गुरुमाऊली आपल्याला बळ पुरवणार आहे’, याची निश्‍चिती होऊन सौभाग्यालंकार उतरवण्याच्या आणि सर्वच प्रसंगांना सामोरे जाता येणे : ७.४.२०१८ या दिवशी सकाळपासून सद्गुरु बिंदाताई बर्‍याच वेळा भ्रमणभाष करून ‘मी मनाने स्थिर रहावे’, यासाठी मला धीर देत होत्या. स्त्रीला सर्वांत प्रिय असते, ते तिचे सौभाग्यलेणे ! मला भीती वाटत होती की, सौभाग्यालंकार उतरवण्याचा प्रसंग मी सहन करू शकेन कि नाही ? ‘या प्रसंगाला मी कशी सामोरी जाणार ?’, याची भीती मी सद्गुरु बिंदाताई यांच्याकडे बोलून दाखवली. तेव्हा त्या खोलीत आल्या आणि त्यांनी मला आपल्या कुशीत घेतले. ‘जणू आईने मुलीला धीर देण्यासाठीच तिच्या कुशीत घेतले’, असे मला वाटले. तेव्हा मी मनाला समजावले, ‘माझ्यासमवेत गुरुमाऊली आहे. सद्गुरु ताई आहेत. मला सर्व प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष प.पू. गुरुमाऊली मला बळ पुरवणार आहे.’ त्यांच्याच कृपेने मी सर्व प्रसंगांना सामोरी जाऊ शकले. नंतरही सर्व झाल्यानंतर सद्गुरु ताई पुष्कळ वेळ माझ्याजवळ बसल्या आणि त्यांनी मला धीर दिला.

कु. गार्गी दिघे

‘प.पू. गुरुदेवा, तुमच्या कृपेने मी हे सर्व लिहिले आहे. तुम्हीच मला शक्ती पुरवली. जे लिहिले, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी मी ते अनुभवले आहे. ते शब्दांत उतरवणे माझ्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या पलीकडचे आहे ! ‘तुमच्या चरणी कशी कृतज्ञता व्यक्त करू ?’, तेच मला कळत नाही. गुरुमाऊली, कशी होऊ उतराई तव चरणी ?’

– श्रीमती क्षमा शशिकांत राणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१८)

गुरूंवरील श्रद्धेमुळे आजी (श्रीमती राणेकाकू) संपूर्ण प्रसंगात स्थिर रहाणे

‘संपूर्ण प्रसंगात आजी स्थिर होती. ‘सर्वकाही गुरुकृपेने होत आहे’, असे तिला वाटत होते. ती श्रद्धेने सर्वांना सामोरे जात होती.’

– कु. गार्गी दिघे (नात) (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now