वर्चस्वाची लढाई !

संपादकीय

अमेरिकेने पुन्हा सिरीयावर मिसाईलद्वारे आक्रमण केले. त्यानंतर रशियाने तिसरे महायुद्ध होण्याची चेतावणी दिली आहे. ‘सिरीयावरील आक्रमणाचे परिणाम म्हणून महायुद्ध होऊ शकते’, अशी संतप्त प्रतिक्रिया रशियाने व्यक्त केली असून त्याच्या ‘२४ न्यूज’ या वृत्तवाहिनीने जनतेला ‘युद्धकाळात बंकरमध्ये आसरा घ्यावा लागल्यास तेथे आवश्यक असलेली सर्व सामग्री घेऊन जाण्यासाठी सिद्धता करा’, असेही सुचवले आहे. यावरून आखातातील परिस्थिती तणावग्रस्त असल्याचे दिसून येते. या युद्धाचे लोण भारतापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. सध्या सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर अल् असद हे अमेरिकेने सिरीयावर आक्रमण करण्याला कारणीभूत ठरले आहेत. सिरीयाकडील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आल्याचा दावा अमेरिका करत आहे. एकूणच या देशांतील नेत्यांची भूमिका आणि त्यांनी उचललेली पावले, ही त्यांच्यातील तीव्र अहंकार दर्शवणारी आहेत.

तिसर्‍या महायुद्धासाठी पोषक वातावरणनिर्मिती !

वर्षभरापूर्वीपर्यंत आखातात इसिस या आतंकवादी संघटनेने इराक आणि सिरीया कह्यात घेऊन हाहाकार माजवला होता. त्या वेळी सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर अल् असद यांच्या साहाय्यासाठी केवळ रशिया आली होती. इसिसचा आतंकवाद युरोपजवळ पोहोचला, तेव्हा अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी इसिसच्या विरोधात कारवाई केली. तोपर्यंत बशर असद हे एकटेच इसिसला तोंड देत होते आणि त्याला रशिया साहाय्य करत होती. अमेरिका किंवा युरोपमधील राष्ट्रेे असद यांच्या बाजूने कधीच नव्हती. सिरीयामध्ये नागरी युद्ध चालू आहे. असद बंडखोरांना चिरडत असल्याचे सांगितले जात आहे, ते खरेच आहे; पण तेथील बंडखोरही काही निरागस नाहीत. भारतासारखी तिथे लोकशाही नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध बंडखोरी निशस्त्र असणे शक्यच नाही. ‘असद यांनी बंडखोरांच्या विरोधात रासायनिक वायूचा वापर केला’, या अमेरिकेच्या आरोपाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, तशीच ‘असद रासायनिक वायूचा वापर करणार नाहीत’, असेही ठामपणे कुणी म्हणू शकत नाही.

महासत्तांची शस्त्रास्त्रस्पर्धा !

ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये शस्त्रास्त्रस्पर्धा चालू आहे. अशी स्पर्धा त्यांच्या देशात कोणीही सत्तेवर आला, तरी होतच असते. सिरीयात सध्या जे नागरी युद्ध चालू आहे, ते रोखून तेथे स्थिरता निर्माण करण्यात अमेरिकेला म्हणजेच ट्रम्प यांना स्वारस्य आहे, असे कुठेही दिसत नाही. त्यांचे ‘मिशन अ‍ॅकमप्लिश्ड’ हे एका दिवसातच पूर्ण झाले आहे; पण त्यातून त्यांनी काय साधले ? यापूर्वीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश किंवा त्यानंतरचे बराक ओबामा यांनीही सद्दाम हुसेन संपल्यानंतर इराकमध्ये स्थिरता निर्माण होईल, असे काही केले नाही. रशियामध्ये पुतिन हल्लीच राष्ट्रीयत्वाच्या सूत्रावर पुन्हा निवडून आले. निवडणुकीत त्यांनी रशियाकडील नवीन ‘हायपरसॉनिक न्युक्लिअर मिसाईल’ आणि जलदगती पाणबुड्या यांच्या क्षमतेविषयी उल्लेख केला होता. या वर्षी सिरीयामध्ये रशियाने अत्याधुनिक फायटर जेट तैनात केले आहे. त्यामुळे सिरीया हा अमेरिका आणि रशिया यांच्याकडील नवीन शस्त्रास्त्रांची चाचणी घेण्यासाठीचा प्रदेश बनला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या महायुद्धासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे. सिरीयात जोपर्यंत स्थिरता निर्माण होत नाही, तोपर्यंत तेथे युद्धसदृश परिस्थिती रहाणार आणि दोन महासत्तांच्या शस्त्रास्त्रस्पर्धेमुळे सिरीयातील नागरिक मात्र नाहक भरडले जाणार.

भारताकडून कणखर भूमिका अपेक्षित !

सिरीयावरील आक्रमणावर भारताने तटस्थ भूमिका अवलंबली आहे. ‘आम्ही तेथील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. रासायनिक शस्त्रांचा वापर खरोखरीच झाला असेल, तर तो खेदजनक आहे’, असे सांगण्यासमवेतच ‘तेथील संघर्ष सामंजस्याने आणि चर्चेद्वारे सोडवायला हवा’, असे म्हटले आहे. सिरीयालाही ‘भारताने त्याच्या प्रश्‍नात लक्ष घालावे’, असे वाटते; पण भारताने कोणत्याही सार्वभौम राष्ट्राच्या अंतर्गत घडामोडींत कधीच हस्तक्षेप केलेला नाही. मालदीवविषयीही भारताने अशीच भूमिका अवलंबली आहे. अमेरिका किंवा रशिया कुणालाही न जुमानता असा हस्तक्षेप करतात आणि शस्त्रास्त्रांचाही वापर करतात. किमान त्या वेळी तरी भारताने या महासत्तांना काही खडे बोल ऐकवायला हवेत. आशिया खंडातील (पाकिस्तान आणि चीन वगळता) किंवा आखातातील अनेक राष्ट्रांना भारताकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. भारत शस्त्रास्त्रदृष्ट्या जरी महासत्तांएवढा अत्याधुनिक आणि सक्षम नसला, तरी विश्‍वासार्हतेच्या अनुषंगाने अनेक राष्ट्रांना भारताचाच आधार वाटतो. याच विश्‍वासार्हतेच्या आधारे भारत जगावर राज्य करू शकतो; परंतु त्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तरी किमान कणखर भूमिका अवलंबायला हवी. कोणाला दुखवायचे नाही, हे योग्य आहे; पण कोणी स्वतःचे वर्चस्व गाजवण्यासाठी एखाद्याला बळीचा बकरा बनवत असतांना गप्प बसणे भारताने सोडायला हवे ! आर्थिक सुबत्ता आणि शस्त्रास्त्र क्षमता या आधारे महासत्ता बनल्याने अहंकार निर्माण होतो, जो आज अमेरिका, रशिया आणि चीन यांना झाला आहे; परंतु हाच अहंकार एक दिवस त्यांच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणार आहे. याउलट भारत एकेकाळी संपूर्ण जगाचा मार्गदर्शक होता, तो येथील ज्ञान, संस्कृती आणि शौर्य यांच्या बळावर ! त्यामुळे विश्‍वगुरुपदावर पुन्हा आरूढ होण्यासाठी भारताला आध्यात्मिक वारशाचे पुनरुत्थान करणार्‍या शासनकर्त्यांची आवश्यकता आहे !