अंकोर वाट : राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने कंबोडिया येथे बांधलेले हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’

‘अंकोर वाट’ मंदिर आणि गर्भगृह, तसेच त्याच्या परिसरातील शिल्पे यांची वैशिष्ट्ये !

‘महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो भूभाग म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहात होते. ‘ख्रिस्ताब्द ८०२ ते १४२१ या कालावधीत तेथे ‘खमेर’ नावाचे हिंदु साम्राज्य होते’, असे सांगितले जाते. खरे तर कंभोज प्रदेश हे कौंडिण्य ॠषींचे क्षेत्र होते, तसेच कंभोज देश हा ‘नागलोक’ही होता. ‘कंभोजच्या राजाने महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता’, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. ‘नागलोक’ असल्यामुळे हे ‘शिवक्षेत्र’ही आहे. येथील महेंद्र पर्वतावर श्रीविष्णुचे वाहन गरुड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे ‘विष्णुक्षेत्र’देखील आहे. अशा पद्धतीने हरिहर क्षेत्र असलेल्या या कंभोज देशात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत असलेले ४ साधक-विद्यार्थी यांनी केलेल्या अभ्यासदौर्‍यातील काही क्षणचित्रे येथे देत आहोत.

(भाग २६)

श्री. विनायक शानभाग
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
अंकोर वाट मंदिराची भव्यता दर्शवणारे रेखाचित्र ! या रेखाचित्रातून मंदिराच्या परिसराची व्याप्ती आपल्या लक्षात येते !

४. मंदिराच्या चारही प्रांगणांच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली असणे

मंदिराच्या परिसरात असलेल्या ग्रंथालयापासून पुढे २०० मीटर चालत गेल्यावर मुख्य मंदिर लागते. हे मंदिराचे पश्‍चिम द्वार आहे. येथे मंदिराचा पहिला प्राकार (प्रांगण) चालू होतो. प्राकाराच्या चारही बाजूंना ४ प्रांगणे आहेत. या चारही प्रांगणांच्या भिंती आणि ४ कोपरे, तसेच ४ दिशांना असलेल्या ४ प्रवेशद्वारांच्या भिंती यांवर देवतांची अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमधील देवतांच्या अलंकारांचे कोरीवकाम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात विविध प्रकारच्या केशरचनाही पहावयास मिळतात. प्रवेशद्वारांवर वेगवेगळ्या फुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार, तसेच गर्भगृह यांच्या पायर्‍या नेहमीप्रमाणे तिरक्या नसून उभ्या आहेत. ‘त्या वेळचे लोक प्रतिदिन मंदिरात जाऊन पूजा कशी करत असतील ?’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) ‘मंदिर बांधण्यासाठी लाखो मोठे दगड वापरण्यात आले आहेत. हे सर्व दगड तेथून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या महेंद्र पर्वतावरून नदीच्या मार्गे आणले असावेत’, असे आमच्या ‘गाईड’ने सांगितले.

गर्भगृहामध्ये जाण्यासाठी असलेल्या पूर्वीच्या पायर्‍या !या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या उभ्या स्वरूपाच्या आहेत !

५. ‘अंकोर वाट’ मंदिराच्या चार बाजू आणि त्यांवर कोरलेली शिल्पे

अ. दक्षिण-पूर्व (आग्नेय) कोपरा : येथील शिल्पांमध्ये समुद्रमंथनाचा देखावा, यम शिक्षा करतांना, तसेच स्वर्ग आणि नरक येथील दृश्ये यांचा समावेश आहे.

आ. मंदिरातील दक्षिण-पश्‍चिम (नैऋत्य) कोपरा : येथे अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात भगवान श्रीकृष्णाच्या लीला, प्रभु श्रीराम वालीचा वध करतांनाचा प्रसंग, रावण कैलास पर्वत उचलतांनाचा प्रसंग, समुद्रमंथनाचा देखावा, प्रभु श्रीराम मारीच राक्षसाचा पाठलाग करतांनाचे दृश्य, दक्षिणामूर्तीच्या रुपात असलेल्या भगवान शिवाचे शिल्प, गोवर्धन पर्वत उचलतांना श्रीकृष्ण, कामदेवाचा वध करतांना भगवान शिव, ध्यानस्थ झालेले भगवान शिव, वैकुंठलोकात भगवान श्रीविष्णु अन्य देवतांकडून स्तुती ऐकतांना, अशी अनेक शिल्पे येथे आहेत.

इ. पश्‍चिम-उत्तर (वायव्य) कोपरा : बाणासुरावर विजय मिळवतांना श्रीकृष्ण, तसेच असुरांना युद्धात जिंकतांना श्रीविष्णु, अशी दृश्ये असलेली शिल्पे आहेत.

ई. मंदिरातील उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपरा : सीतेची अग्नीपरीक्षा, रावण वधानंतर प्रभु श्रीराम अयोध्येला परत येतांना, राम, लक्ष्मण आणि विभीषण संभाषण करतांना, हनुमंत श्रीरामाची अंगठी सीतामातेला देतांना, शेषावर झोपलेल्या श्रीविष्णुंकडे समस्या मांडणारे देव, देव आणि असुर यांच्यातील युद्ध, राम आणि लक्ष्मण सुग्रीवाशी बोलतांना, राम आणि लक्ष्मण हे कबंध नावाच्या असुराशी लढतांना, सीता स्वयंवर, असे अनेक शिल्प येथे आहेत.

६. ‘अंकोर वाट’ मुख्य मंदिर आणि गर्भगृह

गर्भगृहात जाण्यासाठी खूप उंचच्या उंच पायर्‍या चढाव्या लागतात ! तेथे जाण्यासाठी आता बांधलेल्या पायर्‍या !

‘अंकोर वाट’ मंदिराच्या दुसर्‍या प्रांगणातून आत वर चढावे लागते. तेव्हा आपण शेवटच्या प्रांगणात पोहोचतो. येथे ५ गोपुरासारखे शिखर असलेले मुख्य मंदिर दिसते. हे ५ शिखर म्हणजे पवित्र मेरू पर्वताची ५ शिखरे आहेत. (आमच्या ‘गाईड’ने आम्हाला सांगितले की, ‘अंकोर वाट’ मुख्य मंदिराची ५ शिखरे, मंदिराच्या चार बाजूला असलेली ४ शिखरे आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे असलेली ३ शिखरे, अशी एकूण १२ शिखरे होतात आणि ती १२ ज्योर्तिलिंगांची प्रतीके आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेली ३ शिखरे आता अस्तित्वात नाहीत.) ही ५ शिखरे असलेल्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह आहे. ५ वे शिखर गर्भगृहाच्या वर आहे. गर्भगृहात जाण्यासाठी खूप उंचच्या उंच पायर्‍या चढाव्या लागतात. (छायाचित्र क्रमांक २ पहा.) गर्भगृहाच्या येथून आपल्याला पश्‍चिम दिशेला ७५० मीटर दूरवर असलेले मुख्य प्रवेशद्वार दिसते. गर्भगृहाच्या येथून मंदिराची भव्यता आणि मंदिर परिसराचा जो प्रचंड विस्तार दिसतो, तो आपण शब्दांत मांडू शकत नाही.

कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला हिंदूंच्या जगातील सर्वांत मोठ्या मंदिराचे दर्शन झाले आणि त्या मंदिराकडून शिकायला मिळाले. यासाठी अभ्यासदौर्‍यातील आम्ही सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

(क्रमश:)

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now