अमेरिकेचे सिरीयावर पुन्हा आक्रमण

दमास्कस (सिरीया) – अमेरिकेने पुन्हा एकदा सिरीयावर आक्रमण केले आहे. ‘सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर असद यांच्याकडील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले आणि त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला. ‘जोपर्यंत असद हे रासायनिक आक्रमण बंद करत नाही, तोपर्यंत कारवाई चालू राहील’, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या या कारवाईमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स हेही सहभागी झाले आहेत. अमेरिकेने सिरियाच्या सरकारविरुद्ध बळाचा वापर केल्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे.

१. सिरीया सरकारने काही दिवसांपूर्वी बशर अल असद यांच्या विरोधात लढणार्‍या बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या दुमा भागात रासायनिक वायू सोडून ७० हून अधिक नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर अमेरिकेने सूड घेण्यासाठी सिरीयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले होते.

२. सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या विरोधात देशात बंड झाले होते आणि ते चिरडण्यासाठी सैन्याला आदेश देण्यात आला आहे. यात सिरीयाला रशियाने पाठिंबा दिला आहे, तसेच बंड चिरडण्यासाठी रशियाही साहाय्य करत आहे.

३. संयुक्त राष्ट्रमधील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली म्हणाल्या, ‘‘आमच्या अंदाजानुसार सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या सैन्याने ७ वर्षांच्या युद्धाच्या कालावधीत किमान ५० वेळा रासायनिक शस्त्रांचा वापर केला.’’

आक्रमणाचा परिणाम युद्धात होऊ शकतो ! – रशियाची संतप्त प्रतिक्रिया

अमेरिकेच्या आक्रमणानंतर रशियाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने म्हटले आहे की, अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी सिरीयावर केलेल्या आक्रमणाचा परिणाम भयंकर होऊ शकतो. या तिन्ही देशांनी लक्षात घ्यायला हवे की, याचा परिणाम युद्धाच्या रूपातही होऊ शकतो.

तिसर्‍या महायुद्धासाठी सिद्ध रहा !

रशियाच्या ‘२४ न्यूज ’ वृत्तवाहिनीवरून आवाहन

मॉस्को – अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी संयुक्तपणे सिरीयावर केलेल्या आक्रमणाच्या विरोधात रशियाने दंड थोपटले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या ‘२४ न्यूज’ या वृत्तवाहिनीने रशियन नागरिकांना ‘तिसर्‍या महायुद्धासाठी सिद्ध रहा’, असे आवाहन केले आहे. या आवाहनाद्वारे ‘बंकरमध्ये स्वत:समवेत नेण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा साठा जमा करायला प्रारंभ करा. अण्वस्त्रांचे आक्रमण झाल्यास आणि त्याच्या किरणोत्सर्गापासून वाचण्यासाठी ‘आयोडीन’ जमा करा. तांदूळ, डाळ, ‘कॅन’मधील मांस, दुधाची पावडर, साखर, मीठ यांचा साठा करून ते नेण्यासाठी सिद्ध ठेवा’, अशा सूचनाही केल्या आहेत.