इस्लामी देश इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी येणार !

इस्लामी देशात अशी बंदी घालण्यात येऊ शकते, तर भारतात का नाही ? आणखी किती वर्षे महिलांना मध्यकालीन बुरसटलेल्या प्रथांनुसार वागवले जाणार आहे ? भारतातील महिला संघटना याविषयी कधी आवाज का उठवत नाहीत ?

 

इजिप्तमधील महिला खासदार अम्ना नोसेर

कैरो (इजिप्त) – इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.

१. इजिप्तमधील महिला खासदार अम्ना नोसेर याविषयी म्हणाल्या, ‘‘मुसलमान  महिलांना बुरखा घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे जे मूळचे मुसलमान नाहीत, त्यांनाही याचे बंधन नाही. बुरखा घालणे, ही ज्यू लोकांची परंपरा आहे. ती प्रामुख्याने अरेबिअन द्विपकल्पात इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या आधीपासून पाळण्यात येत होती; मात्र त्यानंतर कुराणमध्ये तिचा समावेश झाला.

तरीही कुराणमध्ये बुरखा परिधान करण्याविषयी सांगितलेली गोष्ट आणि सध्याची प्रचलित पद्धत यात विरोधाभास आहे; कारण कुराणने केस झाकलेले आधुनिक कपडे परिधान करण्याविषयी सांगितले आहे. यात तोंड झाकून घेण्याविषयी म्हटलेले नाही.’’

२. नोसेर या अल् अझहर विद्यापिठातील तुलनात्मक न्यायशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकाही आहेत.

३. याच वर्षी फेब्रुवारी मासांत कैरो विद्यापिठाने वैद्यकीय संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालये यांमध्ये परिचारिका आणि महिला डॉक्टर यांना बुरखा घालण्यास बंदी घातली होती. रुग्णांच्या हक्कासाठी ही बुरखाबंदी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

४. गेल्या वर्षी सप्टेंबर मासांत याच विद्यापिठाने महिला शिक्षकांवर वर्गात शिकवतांना बुरखा घालण्यास बंदी घातली होती. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे बुरखा घालण्याविषयी तक्रार दिली होती; कारण बुरखा घालून शिकवतांना त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे संवाद साधतांना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.


Multi Language |Offline reading | PDF