संसदेचे कामकाज न झाल्याने वेतन न घेण्याचा भाजपप्रणीत रालोआच्या खासदारांचा निर्णय

असे असले, तरी सभागृहाचे कामकाज न झाल्याने झालेली हानी सरकार कशी भरून काढणार आहे ? जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणार्‍यांवर सरकारने योग्य कारवाई करणे, हीच त्यांची जनतेशी खरी बांधिलकी ठरेल !

नवी देहली – संसदेच्या अधिवेशनात होत असलेल्या गोंधळावरून गेल्या अनेक दिवसांपासून कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (‘रालोआ’च्या) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी दिली.

गदारोळामुळे कामकाज होऊ न शकल्याने संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला आहे. याचे पडसाद केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. या बैठकीत बहुतांश खासदारांनी वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडली. ‘यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल’, असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केले. संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याने अनेक महत्त्वाच्या विधेयकांना संमत्ती मिळू शकली नाही. यावरून संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी २३ दिवसांचे वेतन आणि भत्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या कामातून लोकांची सेवा होत असेल, तरच आम्ही वेतन घ्यायला हवे’, असे आम्हाला वाटते. आम्हाला अधिवेशनात विविध सूत्रांवर चर्चा करायची होती; मात्र काँग्रेसमुळे लोकसभा आणि राज्यसभा यांचा अमूल्य वेळ वाया गेला.’’ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शनेही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF