आरक्षणाविषयी अफवा पसरवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न ! – गृहमंत्री

‘अफवा पसरवणारे कोण आहेत ?’, हे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देणारे गृहमंत्री हवेत !

नवी देहली – ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यातील पालटाच्या विरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला काही राज्यांमध्ये हिंसक वळण लागले. आरक्षण संपवण्याविषयीच्या अफवा पसरवून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अफवांना आळा घालणे आणि शांतता राखणे, यांसाठी केंद्र सरकारने राज्यांना सूचना केली आहे, असे निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सादर केले. सिंह यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविषयी ३ एप्रिलला केंद्र सरकारची भूमिका मांडली. ते ही भूमिका मांडत असतांना विरोधकांनी घोषणाबाजी केली. असे असतांनाही सिंह यांनी सभागृहात निवेदन सादर केले. (शाळेतील मुलांप्रमाणे गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींना लोकसभा अध्यक्षांनी शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)

सिंह पुढे म्हणाले की, संविधानाद्वारे दिलेल्या संरक्षणाप्रती सरकार कटीबद्ध आहे. सरकारने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यात कोणताही पालट केलेला नाही वा कुठलेही कलम हटवलेले नाही. उलट सत्तेत आल्यानंतर सरकारने या कायद्याचे अवलोकन करत तो अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१५ मध्ये यावर संशोधन करून अनेक नव्या गोष्टी समाविष्ट केल्या, तसेच पीडितांना देण्यात येणार्‍या हानीभरपाईतही वाढ केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यावर २० मार्चला निर्णय दिल्यानंतर सरकारने फक्त ६ दिवसांत तत्परता दाखवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली.

गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

काँग्रेसच्या खासदारांचे संसदेच्या छतावर चढून आंदोलन

सवंग लोकप्रियतेसाठी आंदोलन करणारे लोकप्रतिनिधी !

नवी देहली – इराकमध्ये हत्या झालेल्या भारतियांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याच्या मागणीसाठी पंजाबमधील काँग्रेसच्या खासदारांनी ३ एप्रिल या दिवशी संसद भवनाच्या छतावर चढून आंदोलन केले.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा, कावेरी पाणी वाटप वाद, इराकमधील भारतियांची हत्या आदी सूत्रांवर विरोधकांनी संसदेत गदारोळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज ४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेसच्या खासदारांनी इराकमध्ये मारल्या गेलेल्या भारतियांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी वरील आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. पंजाबमधील काँग्रेसचे ३ खासदार संसदेच्या छतावर चढले आणि हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.


Multi Language |Offline reading | PDF