करोली (राजस्थान) येथे आजी-माजी आमदारांची घरे जाळली

‘भारत बंद’ आंदोलनाचे दुसर्‍या दिवशीही पडसाद

करोली – सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यामध्ये सुचवलेल्या पालटाविरोधात येथील आजी-माजी आमदारांची घरे आंदोलकांच्या संतप्त जमावाने जाळली. भाजपच्या आमदार राजकुमारी जाटव आणि काँग्रेसचे माजी आमदार भरोसीलाल जाटव यांची घरे आंदोलकांनी पेटवली असून ते दलित समाजाचे असल्याचे समजते.

१. दलित संघटनांनी २ एप्रिलला ‘भारत बंद’ आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाला येथे हिंसक वळण लागल्याने प्रशासनाने संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केले होते.

२. असे असतांनाही ३ एप्रिल या दिवशी ४० सहस्र जणाच्या जमावाने रस्त्यावर उतरून वरील दोन्ही नेत्यांची घरे जाळली.

३. एवढ्यावरच न थांबता त्या जमावाने एका मॉलची तोडफोड केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केल्याचे समजते.

राजस्थानमध्ये ‘भारत बंद’च्या कालावधीत १ सहस्र जणांना अटक

  • समाजकंटकांचा शोध चालू

  • राज्यातील वातावरण तणावपूर्ण

जयपूर – दलित संघटनांनी २ एप्रिलला पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये हिंसाचार केल्याचा ठपका ठेवत राजस्थानमध्ये पोलिसांनी १ सहस्र जणांना अटक केली. संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाची स्थिती असून निमलष्करी दलाच्या २३ तुकड्या परिस्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी हिंसा करणार्‍यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला असून समाजकंटकांचीही ओळख पटवण्यात येत आहे. (पोलिसांनी असे करून समाजकंटकांना पसार होण्यास हातभार लावल्यासारखेच होते. त्यापेक्षा हिंसा चालू असतांनाच ती करणार्‍यांवर पोलिसांनी तात्काळ अटकेची कारवाई करायला हवी. – संपादक) सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील संचारबंदी २४ घंट्यांनी वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक ओ.पी. गेहलोत यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF