इयत्ता १० वीची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा सी.बी.एस्.ई.चा निर्णय

सी.बी.एस्.ई.च्या पेपरफुटीचे प्रकरण

पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा घेण्याची आणि नंतर ती न घेण्याची घोषणा करणार्‍या सरकारच्या कारभारात किती गोंधळ असेल, हे यावरून स्पष्ट व्हावे ! दिवसागणिक निर्णय पालटणे सरकारसाठी लज्जास्पद !

नवी देहली – सी.बी.एस्.ई.च्या पेपरफुटीप्रकरणी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (‘सी.बी.एस्.ई.’ने) घेतला आहे.

‘सी.बी.एस्.ई.’चा इयत्ता १० वीचा गणिताचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. यावर सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा विचार चालू केला होता. त्यास देशभरातून विरोध झाला. विरोधानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत ‘केवळ पेपर फुटलेल्या ठिकाणीच, म्हणजेच देहली, एन्सीआर् आणि हरियाणा येथेच फेरपरीक्षा घेतली जाईल’, असे घोषित केले होते. तथापि आता कुठेही फेरपरीक्षा होणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. काही उत्तरपत्रिकांच्या तपासणीनंतर ‘सी.बी.एस्.ई.’ या निर्णयाप्रत आल्याचे समजते. पेपरफुटीचा परिणाम सार्वत्रिक नसल्याचे उत्तरपत्रिकांच्या तपासणीतून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सरसकट फेरपरीक्षा घेणे योग्य ठरणार नाही, असे ‘सी.बी.एस्.ई.’चे मत असल्याचे समजते.


Multi Language |Offline reading | PDF