इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षात पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा मृत्यू

  •  २ सहस्रांहून अधिक नागरिक घायाळ

  • पॅलेस्टाइन सरकारकडून ‘राष्ट्रीय दुखवटा’ घोषित

  •  इस्रायलने धडक कारवाई करत इस्रायलविरोधी आंदोलन चिरडले

कुठे देशाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शत्रूराष्ट्राच्या विरोधात धडक कारवाई करणारा बाणेदार इस्रायल, तर कुठे शत्रूराष्ट्राने सातत्याने कुरघोडी करूनही त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याच्याशी वर्षानुवर्षे चर्चा करत बसणारे कणाहीन भारतीय शासन !

जेरुसलेम – पॅलेस्टाइनच्या नागरिकांकडून ४२ व्या ‘भूमी दिवसा’च्या (‘लॅण्ड डे’च्या) निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या वेळी गाझापट्टीत इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षात पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत किमान २ सहस्र नागरिक घायाळ झाले. या घटनेनंतर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी ‘राष्ट्रीय दुखवटा’ घोषित केला असून तेथील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापिठे बंद रहाणार आहेत.

इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘भूमी दिवसा’निमित्त पॅलेस्टाइनचे अनुमाने १७ सहस्र नागरिक सीमेवरील ५ स्थानांवर जमा झाले होते. इस्रायली सैन्याने आंदोलकांना पुढे न येण्याची चेतावणी दिली होती. तथापि या चेतावणीनंतरही त्यातील काही युवकांनी इस्रायली सैन्यावर सीमेवर पेट्रोल बॉम्ब आणि दगड यांद्वारे आक्रमण केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या सैन्याने आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात १७ जण ठार, तर २ सहस्र नागरिक घायाळ झाले.

इस्रायलच्या निषेधार्थ पाळला जातो ‘भूमी दिवस !’

३० मार्च १९७६ या दिवशी पॅलेस्टाइनचे ६ नागरिक इस्रायलच्या गोळीबाराला बळी पडले होते. हे नागरिकही इस्रायलने पॅलेस्टाइनवर ताबा मिळवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करत होते. त्यांना इस्रायली सैन्याने ठार केले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पॅलेस्टाइनकडून हा दिवस ‘भूमी दिवस’ म्हणून पाळला जातो. एकप्रकारचे हे आंदोलनच असून ते १५ मे पर्यंत चालते. यालाच ‘ग्रेट मार्च ऑफ रिटर्न’ असेही संबोधले जाते. ३० मार्च हा या आंदोलनाचा पहिला दिवस होता. इस्रायलने पहिल्याच दिवशी धडक कारवाई करत हे आंदोलन चिरडून टाकले.

४ इस्लामी राष्ट्रांकडून इस्रायलचा निषेध

कुवेतचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मन्सूर अल् ओतायबी यांनी ‘इस्रायलच्या विरोधात कारवाई करण्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद अपयशी ठरली आहे’, असा आरोप केला. त्यांनी इस्रायलचा निषेध केला. याशिवाय पॅलेस्टाइनच्या आंदोलकांना ठार मारणार्‍या इस्रायलचा जॉर्डन सरकारनेही निषेध केला आहे. जॉर्डन सरकारचे प्रवक्ते महंमद अल् मोमानी म्हणाले, ‘‘शांततामय मार्गाने निषेध नोंदवण्याचा अधिकार पॅलेस्टाइन नागरिकांना आहे. त्यामुळे पॅलेस्टाइनमध्ये आज जे झाले त्यास इस्रायल सर्वस्वी उत्तरदायी आहे.’’ याशिवाय तुर्कस्थान आणि कतार सरकारनेही इस्रायलचा निषेध केला आहे.

गाझापट्टीतील परिस्थिती आणखी बिघडू शकते ! – संयुक्त राष्ट्रसंघाची चेतावणी

इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टाइनचे नागरिक यांच्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर गाझापट्टीतील वातावरण बिघडू शकते, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. संघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटर्स यांनी ‘या प्रकरणाचा स्वतंत्र आणि पारदर्शक तपास झाला पाहिजे’, असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने इस्रायलला संयम राखण्याचे अवाहनही केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now