सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची बाली बेटावरील उबूड गावातील आनंद आश्रमाला भेट !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गटाचा इंडोनेशिया येथील अभ्यासदौर्‍याचा वृत्तांत

१५ व्या शतकापर्यंत इंडोनेशियात हिंदु राजांचे राज्य होते. एकेकाळी जगभर पसरलेल्या हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी साधक सध्या इंडोनेशियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची वैशिष्ट्ये, मान्यवरांच्या घेतलेल्या भेटीगाठी आणि तेथील हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे हे सदर !

(भाग १३)

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

आनंद आश्रमाचे आनंद कृष्णस्वामीजी यांच्याशी अध्यात्मावर चर्चा

बाली (इंडोनेशिया) येथील आनंद आश्रम या आध्यात्मिक संस्थेचे मुख्य कार्यदर्शी श्री. सयोगा यांना कुणाच्या तरी माध्यमातून कळले की, भारतातून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ नावाच्या संत बाली द्वीपावर आल्या आहेत. त्यांनी त्यांचे गुरु आनंद कृष्ण स्वामी यांना याविषयी कळवले असता स्वामीजींनी श्री. सयोगा यांना ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आनंद आश्रमात बोलवून त्यांच्याशी चर्चा करूया’, असे सांगितले. श्री. सयोगा आणि सौ. ओखा यांच्या निमंत्रणावरून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासह आलेले साधक यांनी २१.३.२०१८ या दिवशी सायंकाळी बाली द्वीपावरील राजधानी देनपासरपासून ३० कि.मी. दूर असलेल्या उबूड नावाच्या गावातील आनंद आश्रमात स्वामीजींची भेट घेतली.

१. आनंद कृष्ण स्वामी यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या बाजूला श्री. विनायक शानबाग

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी चर्चा !

आश्रमात पोहोचल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गाडीतून खाली उतरताच आनंद आश्रमाच्या साधिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. प्रत्येक बुधवारी आनंद आश्रमात संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत भजनांचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाला ७० भक्त उपस्थित होते. ‘आज आपल्याकडे भारतातून विशेष अतिथी आले आहेत’, असे सांगून स्वामीजींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा परिचय करून दिला. भजनांचा कार्यक्रम झाल्यावर स्वामीजी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात चर्चा झाली. त्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या कार्याविषयी, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाविषयी माहिती सांगितली. जेव्हा त्यांनी स्वामीजींना परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कार्याविषयी सांगितले, तेव्हा स्वामीजी म्हणाले, ‘‘मला तुमच्या आश्रमात येऊन गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करायची आहे.’’

यानंतर विद्यार्थी साधक श्री. दिवाकर आगावणे यांनी स्वामीजींना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर स्वामीजी आणि त्यांचे भक्त यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आनंद आश्रम आणि इंडोनेशियातील हिंदु धर्माच्या खुणा दर्शवणार्‍या वस्तूंचे आश्रमातील संग्रहालय दाखवले. स्वामीजींनी आश्रमातील स्वयंपाकघरात सांगून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि साधक यांच्यासाठी भारतीय जेवणाची व्यवस्था केली होती.

आनंद कृष्ण स्वामी यांचा परिचय

मूळचे अखंड भारतातील सिंध प्रांतातील आनंद कृष्ण स्वामीजी यांचा जन्म इंडोनेशियात झाला. अनेक वर्ष त्यांनी व्यवसाय केल्यानंतर जीवनात घडलेल्या एका मोठ्या शारीरिक व्याधीमुळे ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी ध्यान-धारणादी साधना केली. साधनेतून मिळालेल्या ज्ञानाने आणि इतरांना साहाय्य करण्याच्या आंतरिक तळमळीमुळे त्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली. भारतातील लखनौ येथील संत शेखबाबा हे त्यांचे गुरु आहेत. आतापर्यंत त्यांनी अध्यात्मावर १७० ग्रंथ लिहिले आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

‘भारतापासून ४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या इंडोनेशियात पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती, ते आम्हाला जवळून बघण्याचे भाग्य लाभले. यासाठी आम्ही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय


Multi Language |Offline reading | PDF