श्रीलंकेतील बौद्ध आणि मुसलमान पंथातील संघर्षाची १० कारणे

श्रीलंकेत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर…

श्रीलंकेतील कँडी या ठिकाणी उसळलेल्या दंगलीनंतर तेथील सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. ‘बौद्ध’ पंथ हा शांतताप्रिय आहे’, असे म्हटले जाते. तरीही ‘श्रीलंकेत बौद्ध आणि मुसलमान या दोन्ही पंथांमध्ये संघर्ष का उसळला ?’, ‘श्रीलंकेत संचारबंदी, जमावबंदी आणि आणीबाणी का लागू करण्यात आली ?’, हे अन् असे अनेक प्रश्‍न नक्कीच मनात येतात; मात्र दंगल एका दिवसात उसळलेली नाही. सदर पंथांतील संघर्षाची १० प्रमुख कारणे येथे देत आहोत.

श्रीलंकेत चालू असलेल्या हिंसाचारात तोडफोड करण्यात आलेल्या एका घराचे छायाचित्र (संदर्भ : ‘द बगदाद पोस्ट’ हे संकेतस्थळ)

१. श्रीलंकेतील पूर्व भागात असलेल्या अंपारा येथे वर्षभरापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी २०१७ मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यानंतर बौद्ध आणि मुसलमान यांमध्ये पंथीय संघर्ष चालू झाला. वर्षभर त्या दोन्ही पंथांच्या नागरिकांमधून विस्तव जात नाही, अशीच स्थिती आहे.

२. वरील हिंसाचारापूर्वी एलुथगामा येथे जून २०१४ मध्ये दंगली उसळल्या होत्या. काही बौद्ध पंथियांनी आरोप केला होता की, मुसलमान हे सक्तीने धर्मपरिवर्तन करत आहेत. त्यानंतर मुसलमानविरोधी मोहीम चालवण्यात आली.

३. म्यानमारमध्ये संघर्ष उसळल्यानंतर काही रोहिंग्या मुसलमानांनी श्रीलंकेचा आश्रय घेतला होता; मात्र श्रीलंकेतील बौद्धांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले.

४. म्यानमारप्रमाणेच श्रीलंकेतही मुसलमान आणि बौद्ध पंथ यांच्यात वाद आणि ताणतणाव कायम असतात. सिंहली बौद्ध पंथातील काही कट्टरपंथीय बौद्ध हे ‘अल्पसंख्यांक मुसलमान स्वतःसाठी धोकादायक’ असल्याचे मानतात.

५. श्रीलंकेत वर्ष २०१४ मध्येही मोठ्या दंगली उसळल्या होत्या. त्यात २ सहस्रहून अधिक बौद्ध आणि ८ सहस्रपेक्षा अधिक मुसलमान यांना विस्थापित व्हावे लागले.

६. श्रीलंकेत सिंहली बौद्ध समाजाचा एक मोठा जनसमुदाय आहे. हा समुदाय ‘सिंहली नसलेले आणि मुसलमान हे आपल्या समाजाला इजा करू शकतात किंवा आपल्यावर उलटू शकतात’, असे मानतो.

७. श्रीलंकेत बौद्ध संघटनेचे बोदु बाला यांनाही मुसलमान-बौद्ध हिंसेसाठी उत्तरदायी धरले जाते. ‘मुसलमानांची वाढती लोकसंख्या सिंहली बौद्धांसाठी घातक आहे’, असे बोदु बाला यांना वाटते.

८. मुसलमान समाजाला श्रीलंकेमध्ये व्यवसायात चांगले यश मिळाले आहे; मात्र ‘त्यांचे यश हे आपल्या अस्तित्वासाठी चांगले नाही’, असे सिंहली बौद्धांना वाटते.

९. श्रीलंकेत बौद्ध पंथियांची लोकसंख्या ७५ टक्के आहे. तरीही ‘तमिळ आणि मुसलमान समुदाय हे आपल्यासाठी घातक आहेत’, असे बौद्धांना वाटते.

१०. ‘मुसलमान समुदायाला पूर्वेकडील देशांतून साहाय्य मिळते. त्या जोरावर ते आम्हाला संकटात टाकू शकतात’, असे मत एका बौद्ध भिख्खूने वर्ष २०१४ मध्ये एका मुलाखतीत मांडले होते.

या सर्व कारणांचा विचार करता ‘दोन समुदायांमध्ये संघर्ष का पेटला ?’, हे लक्षात येते. दंगली आणखी पसरू नयेत आणि निरपराध लोकांचा बळी जाऊ नये, यांसाठी श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली. श्रीलंकेतील काही भागांमध्ये संचारबंदी आणि जमावबंदी यांचेही आदेश देण्यात आले आहेत.

(साभार : ‘दैनिक लोकसत्ता’चे संकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF