(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येतील संशयित सनातन संस्थेशी संबंधित असल्याने सनातनवर कायद्याने बंदी घालावी !’ – निखिल वागळे यांची सनातनविरोधी गरळओक

सोलापूर, १३ मार्च (वार्ता.) – डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेशी संबंधित संशयित सापडले आहेत. या संस्थेवर अजूनही बंदी आणली नाही. अशा संस्थांवर कायद्याने बंदी यायला हवी, असे वक्तव्य वागळे यांनी शिवछत्रपती रंगभवन येथे ‘जवाब दो आंदोलन कृती समिती’च्या वतीने ‘देशातील असहिष्णुता आणि आपण’ या विषयावरील व्याख्यानात बोलतांना केले. या वेळी व्यासपिठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. (खोटे आरोप करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मिळाला आहे. ते आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विरोधात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. म्हणून यापेक्षा अधिक चौकशी करू शकत नाही, असा अहवाल सीबीआय आणि एस्आयटी या दोन मोठ्या अन्वेषण यंत्रणांनी दिला आहे. त्यापेक्षा वागळे यांना अधिक कळते काय ? राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत सनातनवर कायद्याने बंदी यायला हा काय पाक आहे का ? – संपादक)

वागळे पुढे म्हणाले की,

१. ४ वर्षे होऊनही डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत. या देशामध्ये धर्मांध शक्तींना शिक्षा व्हावी, असे कोणत्याही रंगाच्या राजकारण्याची इच्छा नाही. (वरील व्यक्तींचे मारेकरी धर्मांध शक्ती आहेत, हा निष्कर्ष वागळे यांनी काढला, म्हणजे ते पोलीस आणि न्यायालय यांच्यापेक्षा स्वतःला हुशार समजतात का ? – संपादक) 

(म्हणे) ‘कार्यकर्ता आणि मास्टरमांईंड यांना अटक झाली पाहिजे !’

हत्या करणारा कार्यकर्ता आणि त्याच्यामागील ‘मास्टरमाईंड’ या दोघांनाही अटक झाली पाहिजे, अशी गरळओकही पत्रकार निखिल वागळे यांनी केली. (वारंवार बेताल वक्तव्ये करून सनातनची अपकीर्ती करणारे वागळे यांच्यावर  कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. – संपादक)

२. पुतळे पाडण्याची शृंखला आणि डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या घटनांची नाळ एकमेकांशी जोडलेली आहे. (भाजप हा पक्ष असून सनातन संस्था धर्मप्रसार करणारी आध्यामिक संस्था आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाने केलेल्या कृतीचा आध्यात्मिक संस्थेशी संबंध जोडणे हा वागळे यांचा शुद्ध मूर्खपणा आहे. डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना सनातनच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. असे असतांना सनातन आणि भाजप पक्षाविषयी वागळे यांच्या नसानसात पराकोटीचा द्वेष भरलेला असल्याने ते अशी विधाने करत असतात. – संपादक)

३. त्रिपुरामधील निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर लेनिनचा पुतळा पाडण्यात आला, ही भारतीय संविधानाला तडा देणारी गोष्ट आहे. (वागळे यांचे खरे स्वरूप ! – संपादक) कम्युनिस्टांना पुतळा उभारण्याचा अधिकार आहे. देशात सत्तापालट झाल्यावर काही धर्मांध संघटनांनी त्यांच्या विरोधी विचाराच्या लोकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला, उदा. पुणे येथील मोहसीन शेख, त्यानंतर दादरी येथे अखलाक यांच्या हत्या करण्यात आल्या. (भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या दक्षिणेतील ४०० हून अधिक हत्या, सहस्रों काश्मिरी पंडितांच्या हत्या, मुसलमान दंगलींमध्ये देशभर हिंदूंच्या करत असलेल्या हत्या यांविषयी वागळे यांना काहीच कसे वाटत नाही ? – संपादक)

४. ३१ डिसेंबरला पुणे येथील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद पार पडली. त्यामुळे शनिवारवाडा बाटला, असा राग धरून भीमा कोरेगाव येथे जाऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांनी बहुजन समाजाची माथी भडकवून ही दंगल घडवून आणली. (खोटे बोल आणि रेटून बोल याप्रमाणे वागळे किती दिवस खोटे बोलत रहाणार आहेत ? – संपादक)

५. राममंदिराच्या विरोधात निकाल लागल्यास भारताचा सिरिया होईल, हे सांगणारे श्रीश्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे नागपूरच्या अजेंड्याप्रमाणे चालणारे बाबा आहेत. (वागळे कुणाच्या अजेंड्यावर चालतात, हेही सर्व जण आता ओळखू लागले आहेत ! – संपादक) 

६. संघ वाढत असेल, तर नरेंद्र मोदी केवळ ३१ टक्के मतांनी का निवडून आले ? यातील १० ते १५ टक्के मते ही हिंदुत्वनिष्ठांची नाहीत. लोकांना देशात सत्तापालट हवा होता, त्यामुळे त्यांचा मूळ पाठीराखा १५ ते २० टक्के एवढाच आहे. उरलेल्या ८० टक्के लोकांना या देशात हिंदु राष्ट्र नको आहे. (काय योग्य आणि काय अयोग्य ते कळण्याची क्षमता सर्वसामान्य जनतेत नसते. भारताचा सहस्रो वर्षांचा इतिहास हिंदु राष्ट्राचाच आहे. प्रत्यक्षात हिंदु राष्ट्र आल्यावर किती जणांना ते हवे आहे, हे कळेलच ! – संपादक)

७. या देशातील खरी लढाई मुसलमान विरुद्ध हिंदु अशी नसून ती धर्मांध हिंदु विरुद्ध उदारमतवादी म्हणजे बहुसंख्य हिंदू अशी आहे. (हिंदु ऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणारे फुटीरतावादी वागळे ! – संपादक)

उदारमतवाद्यांनो, तुम्ही बोलवत असलेल्या वक्त्यांना तुमच्याविषयी असलेली आत्मियता किती बेगडी आहे पहा !

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे कि स्मृतीदिन हेही ज्ञात नसलेले वागळे !

कार्यक्रामाच्या प्रारंभीच वागळे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वांना अभिवादन.’’ त्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्याने ओरडून सांगितले की, ‘सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन नव्हे, स्मृतीदिन आहे’ त्यानंतर वागळे यांनी क्षमा मागून पुढील भाषणाला आरंभ केला. (मनात हिंदुत्व आणि प्रतिगामी संघटनांच्याविषयी द्वेष, तिरस्कार अन् असंख्य नकारात्मक विचार असल्यामुळे निखिल वागळे यांना भाषण करतांना सावित्रीबाई फुले यांचा ‘जन्मदिन आहे का स्मृतीदिन’ हेही समजले नाही, यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF