बांधकामाची सेवा करतांना साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

१. ‘स्थुलातून अनेक संत आध्यात्मिक उपाय करतात; पण देवाने मला सूक्ष्मातील कार्य दिले आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला सांगणे

‘साधारणपणे १७-१८ वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू होते. त्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन सकाळी बांधकाम पहाण्यासाठी येत असत. त्या वेळी मी त्यांना माझ्या मनातील पुढील विचार सांगितला, ‘‘आपले कार्य एवढे वाढले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, अजून एक-दोन तरी प.पू. डॉक्टर असायला हवेत.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘अरे, १ – २ काय घेऊन बसलास ! अजून २ – ४ पाहिजेत. इथेच भगवान श्रीकृष्णाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. तो परिपूर्ण अवतार आहे. त्याला पाहिजे तेथे तो देह धारण करून कार्य करू शकतो; पण मला तसे करता येत नाही. मिरज आश्रमात प.पू. भगवानदास महाराज, कुडाळ सेवाकेंद्रात प.पू. रघुवीर महाराज आणि देवद आश्रमात प.पू. पांडे महाराज आध्यात्मिक उपाय करतात. तसेच प.पू. कालिदास देशपांडेकाकाही आध्यात्मिक उपाय करतात आणि इथे मी आहे. स्थुलातून ते आवश्यक आहेत; पण देवाने मला सूक्ष्मातील कार्य दिले आहे.’’

श्री. राहुल कुलकर्णी

२. ‘एखादा लहान निर्णय चुकला, तरी त्यात साधना वाया जाते’, याची परात्पर गुरु डॉक्टरांनी जाणीव करून देणे

एके दिवशी परात्पर गुरु डॉक्टर बांधकाम पहाण्यासाठी आले होते. मी तेथेच सेवा करत होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

परात्पर गुरु डॉक्टर : काय करतोस ?

मी : खोलीत ‘स्विच बोर्ड’ लावण्यासाठी भिंत फोडत आहे.

परात्पर गुरु डॉक्टर : हे आधी नियोजित नव्हते का ?

मी : या खोलीला पूर्वी लहान दरवाजा होता. त्या हिशोबाने मी ‘स्विच बोर्ड’ लावला होता; पण आता दरवाजा मोठा केल्याने स्विचची जागा पालटावी लागत आहे.

परात्पर गुरु डॉक्टर : इतर ठिकाणी एखादी चूक झाली की, ती एका मिनिटात सुधारता येते. एखादा शब्द लिहितांना काना-मात्रा चुकला, तर तो संगणकावर लगेच सुधारता येतो. तुमच्या सेवेच्या ठिकाणी तसे होत नाही. एक लहान निर्णय चुकला, तरी एवढे मोठे तोडावे लागते. यामध्ये तुमची साधना वाया जाते.’

– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (डिसेंबर २०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now