मुंबई येथे अखिल भारतीय किसान सभेचा भव्य मोर्चा

मोर्च्यात ३० सहस्र शेतकर्‍यांचा सहभाग !

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी १२ मार्चला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. नाशिक येथून निघालेला मोर्चा ठाणे, विक्रोळी, घाटकोपर या मार्गाने ११ मार्चला रात्री येथील आझाद मैदानात पोहोचला. या मोर्च्याची सरकारने नोंद घेऊन शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे.पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात ३० सहस्र शेतकरी सहभागी झाले होते. आझाद मैदानात लाल रंगाचे झेंडे हातात घेतलेले असंख्य शेतकर्‍यांची गर्दी झाली होती.

उन्हाळ्याचा वाढता दाह आणि अनवाणी चालल्यामुळे शेतकर्‍यांच्या पायांना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्रास होत होता. काही शेतकर्‍यांना अतिसाराची लागण झाली आहे, तसेच बरीच पायपीट केल्याने शेतकर्‍यांच्या पायातून रक्तही येत आहे, अशी माहिती तेथे उपस्थित आधुनिक वैद्यांनी दिली.

शेतकर्‍यांच्या मागण्या

‘शेतमालाला दीडपट हमीभाव देणे, कृषीपंप वीजदेयक माफ करणे, स्वामीनाथन् आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारसींची कार्यवाही करणे, वनाधिकार कायद्याची संपूर्ण कार्यवाही करणे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकर्‍यांनी हा मोर्चा काढला.

शेतकर्‍यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा 

मोर्च्याद्वारे मोठ्या संख्येने आलेल्या शेतकर्‍यांना मुंबईतील अनेकांनी साहाय्य केले. आझाद मैदानातही मोर्चेकर्‍यांसाठी अन्न, पाणी यासोबतच वैद्यकिय सुविधाही पुरवण्यात आल्या. आझाद मैदानात शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

थोडीशी जरी गद्दारी केल्यास येथेच अन्न सत्याग्रह करू ! – डॉ. अजित नवले यांची चेतावणी

आपल्या हक्कासाठी ६ दिवस नाशिक ते मुंबईपर्यंत पाटपीट करत आलेल्या शेतकर्‍यांशी सरकारने आता टक्केवारीवर बोलणे टाळावे. या सरकारने थोडीशी जरी गद्दारी  केली, तरी याच ठिकाणी अन्न सत्याग्रह करू, अशी चेतावणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी शासनाला दिली.

शेतकर्‍यांच्या आंदोलनामागे माओवादी हात आहे का, याचा शोध घेतला पाहिजे ! – खासदार पूनम महाजन, भाजप

मुंबई – येथील आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आणि मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी नाशिकहून आलेल्या शेतकर्‍यांच्या हाती लाल झेंडे असून या आंदोलनामागे माओवादी हात आहे का, याचा शोध घेतला पाहिजे, असे भाजपच्या उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी सांगितले.

खासदार महाजन पुढे म्हणाल्या, ‘‘लोकशाहीत आंदोलने केलीच पाहिजेत. आतापर्यंत आंदोलने होतच आली. शेतकर्‍यांचे हे आंदोलन  पद्धतीने झाले. कर्जमाफी झाली आहे. त्यांनाही ते मान्य आहे; पण त्यांना आणखी काय अपेक्षित आहे, हे ऐकून घेऊन त्यावर निश्‍चितच तोडगा काढला जाईल. सध्या शहरी नक्षलवाद (माओवाद) वाढत आहे. आपल्या देशात नक्षल प्रभावित ५४ जिल्हे आहेत. तिथे ते शिक्षण आणि साक्षरता यांच्या विरोधात काम करतात.’’