राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना क्षणोक्षणी आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यांना आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

(पू.) श्री. अशोक पात्रीकर

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर आपत्काळाचे चित्र येत असल्याने त्यांनी राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना सतत सतर्क करणे

‘परात्पर गुरु डॉक्टर हे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी, तसेच साधक यांना प्रत्येक क्षणाला आपत्काळाची जाणीव करून देत आहेत. वर्ष २०१८ हे एकच वर्ष साधनेसाठी शेष राहिले आहे आणि ‘जिवंत रहायचे आहे, तर साधना करा’, असे सांगून ते आपल्याला सतर्क करत आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टर द्रष्टे संतच नव्हे, तर विष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. जसे ‘महाभारतातील संजय धृतराष्ट्राच्या महालात बसून युद्धाचे वर्णन सांगत असे, तसे परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर आपत्काळाचे चित्र सतत येत असावे’, असे वाटते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रत्येक श्‍वास हा केवळ साधकांसाठी !

परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्येक श्‍वास हा केवळ आणि केवळ साधकांसाठी (प्रतिदिन ईश्‍वरप्राप्तीसाठी तळमळीने साधना करणार्‍यांसाठी) आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुठेतरी म्हटले आहे, ‘संत तुकाराम महाराज यांच्यासारखे विमान त्यांना न्यायला आले, तर सर्व साधक त्या विमानात बसल्यानंतर शेवटी ते स्वतः बसतील.’ त्यामुळे ‘त्यांच्या मनात साधकांविषयी कसे विचार येत असावेत ?’, याचे माझ्या अल्प बुद्धीने केलेले चिंतन पुढीलप्रमाणे वाटते.

अ. आपत्काळात साधकांची साधना नीट होईल ना ?

आ. त्यांच्या साधनेत काही अडचणी येणार नाहीत ना ?

इ. ज्यांना अडचणी आहेत, त्या उत्तरदायी साधकांकडून तत्परतेने सोडवल्या जात आहेत ना ?

ई. आपत्काळात साधक तरून जातील ना ?

उ. ज्यांचे वाईट शक्तींचे त्रास वाढणार आहेत, ते साधनेच्या बळावर त्यांच्याशी लढू शकतील ना ? तेवढे बळ त्यांच्यात साधनेमुळे निर्माण झाले आहे ना ?

ऊ. तेवढे बळ त्यांच्यात नसेल, तर येत्या एक वर्षाच्या काळात साधनेची गती वाढवून त्यांच्यात ते निर्माण होईल ना ?

ए. त्यांच्यात भाव निर्माण होत आहे ना ?

ऐ. त्यांची देवावरची श्रद्धा प्रत्येक क्षणाला वाढत आहे ना ?

३. ‘साधकांच्या अनेक पूर्वजांना गती देणे, स्थुलातून ४ पिढ्यांची काळजी घेणे आणि मृत्यूनंतरही साधकांचा योगक्षेम वहाणे’, असे सर्व करणारे पृथ्वीतलावर एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले असणे

गुरुमाऊली साधकांच्या ४ पिढ्यांची काळजी घेत आहे, हे पुढील विवरणाहून लक्षात येईल.

३ अ. वृद्धांनी गुरुकृपायोगानुसार साधना न करता आपल्या मुला-मुलींना साधनेसाठी प्रोत्साहित केल्यामुळे आणि अनुमती दिल्यामुळे त्यांची साधनेत प्रगती होणे : आज काही साधकांच्या ८० ते ९० वर्षे या वयोगटातील नातलगांनी साधनेत प्रगती केली आहे. साधकांनी स्थुलातून पाहिलेली ही पहिली पिढी आहे. त्यांनी गुरुकृपायोगानुसार साधनाही केली नाही; पण त्यांनी त्यांच्या मुला-मुलींना साधना करण्यास प्रोत्साहित केले. आज समाजातील सामान्य वृद्ध लोकांची अपेक्षा असते की, वृद्धापकाळात मुलगा, सून आणि नातवंडे यांनी त्यांच्या जवळ राहून त्यांची काळजी घ्यावी; पण या वृद्धांनी असे न करता मुला-मुलींना साधनेसाठी अनुमती दिली.

३ आ. दुसर्‍या पिढीला, म्हणजे साधारण ४० ते ८० वर्षे या वयोगटातील साधकांना साधना कळली आणि केवळ गुरुकृपेने ते आज साधनेत आहेत.

३ इ. तिसरी पिढी ती साधारण २० ते ४० वर्षे या वयोगटातील. त्यांनाही त्यांच्या आई-वडिलांमुळे साधना कळली आणि आज ते साधनेत आहेत.

३ ई. घरातील एक व्यक्ती साधना करत असल्याने त्यांच्या पाल्यांच्या पोटी जन्माला येणारे दैवी बालक असणे : चौथी पिढी म्हणजे आज तिसर्‍या वयोगटातील मुला-मुलींना होणारी बालके ही ‘दैवी बालके’ म्हणून जन्माला येत आहेत. काही कुटुंबांतील अशा बालकांचे आई किंवा वडील साधनेत नाहीत, तरी घरातील एक व्यक्ती साधना करत असल्याने त्यांच्या पाल्यांच्या पोटी जन्माला येणारी बालके ‘दैवी बालके’ आहेत.

३ उ. सर्व पिढ्यांतील साधकांचा योगक्षेम केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले वहात असणे : या सर्व पिढ्यांतील साधकांचा योगक्षेम केवळ प.पू. गुरुमाऊली वहात आहेत. दुसर्‍या गटातील साधकांच्या मुला-मुलींच्या काही पालकांना त्यांची काळजी होती; पण आज त्यांना चांगल्या पदावरील नोकर्‍या लागल्या आणि त्यांची लग्ने झाली. आता ‘त्यांना होणार्‍या ‘दैवी बालकां’च्या साधनेसाठी त्यांनी साधना करावी’, असे प.पू. गुरुमाऊली सांगत आहे.

३ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून दत्ताचा नामजप करवून घेऊन साधकांच्या अनेक पितरांना गती मिळवून देणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेच्या आरंभीच साधकांकडून दत्ताचा नामजप करवून घेऊन साधकांच्या अनेक पितरांना गती मिळवून दिली आहे. त्यामुळे पूर्वजांमुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधक साधना करू शकत आहेत.

३ ए. परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या साधनेची काळजी साधकांच्या मृत्यूनंतरही घेत असणे : परात्पर गुरु डॉक्टर काही साधकांची मृत्यूनंतरही आध्यात्मिक प्रगती करून घेत आहेत. सनातनच्या साधिका सौ. होनपकाकू यांची मृत्यूच्या वेळी (१२.८.२०१० या दिवशी) ६६ टक्के आध्यात्मिक पातळी होती. मृत्यूनंतर त्या एप्रिल २०१३ मध्ये संतपदी विराजमान झाल्या. अमरावती येथील पू. रत्नाकर मराठेकाका यांनीही त्यांच्या मृत्यूनंतर संतपद प्राप्त केले. परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू आणि डॉ. वसंत बाळाजी आठवले संतपदी विराजमान झाले आणि पुढे ९.११.२०१३ या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. नंतर वर्ष २०१७ मध्ये ते ‘सद्गुरु’पदी विराजमान झाले. तसेच मृत्यूच्या वेळी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अनेक साधक प्रगती करत आहेत.

‘साधकांच्या अनेक पूर्वजांना गती देणे, स्थुलातून ४ पिढ्यांची काळजी घेणे आणि मृत्यूनंतरही साधकांचा योगक्षेम वहाणे’, हे करणारे पृथ्वीतलावर एकमेव परात्पर गुरु डॉक्टर आहेत ! असे गुरु या जन्मी मिळणे, हे साधकांचे अहोभाग्य आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे साधना करून साधकांनी लाभ करून घेतला नाही, तर त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच असतील !

४. ‘पृथ्वीवरील प्रत्येक जिवाने साधना करावी’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वाटणे आणि त्यांचे आज्ञापालन करून देश-विदेशातील अनेक साधक साधनेसाठी पूर्णवेळ साधक होणे

‘पृथ्वीवरील प्रत्येक जिवाने साधना करावी’, असे परात्पर गुरु डॉक्टरांना वाटते; म्हणून ते सर्वांना साधनेचे महत्त्व सांगत आहेत. त्यांचे आज्ञापालन करून आज अनेक धर्मप्रेमींनी साधना करायला आरंभ केला आहे आणि तेही साधनेत प्रगती करत आहेत. विदेशातील अनेक भारतीय साधक पूर्णवेळ साधनेसाठी त्यांचे ऐश्‍वर्य सोडून भारतात कुटुंबासह येत आहेत. विदेशात रहाणारे विदेशी साधकही पूर्णवेळ साधक होऊन विदेशात धर्मप्रसार करत आहेत.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांना सक्षम ‘डॉक्टर’ बनवत असणे

‘आपत्काळाची तीव्रता किती भीषण राहील ?’, याची जाणीव परात्पर गुरु डॉक्टरांनी एका लेखात करून दिली आहे. त्यात त्यांनी साधकांना ‘सायकल आणि बैलगाडी चालवणे, घोड्यावर बसणे याचा सराव करा’, असे सांगितले आहे. आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनने ‘आगामी भीषण आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका’ प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये स्वतःच स्वतःवर उपाय करण्याचा सराव करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे, तसेच ‘घरात आणि परिसरात आयुर्वेदीय औषधी वनस्पतींची लागवड करा’, असे सांगितले आहे. या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना एकप्रकारे ‘डॉक्टर’ बनवत आहेत.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ अन् ‘भावजागृती’ अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न करवून घेत असल्याने साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढणे

‘आपत्काळात वाईट शक्तींचे त्रास वाढणार आहेत. त्यासाठी आध्यात्मिक उपायांचे महत्त्व किती आहे ?’, याची जाणीव परात्पर गुरु डॉक्टर वारंवार करून देत आहेत. वर्ष २००४ पासून परात्पर गुरु डॉक्टर साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला सांगत आहे; पण बहुतांश साधकांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. साधनेतील सर्वांत मोठा अडथळा आपले स्वभावदोष आणि अहं हेच आहेत. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी शुद्धीकरण सत्संग चालू केले आहेत. आज आठवड्यातील पाच दिवस हे सत्संग असतात. त्यांत साधक त्यांच्यातील स्वभावदोषांची आहुती देत आहेत. दुसरीकडे ‘भाव तेथे देव’, असे असल्याने आठवड्यातील पाच दिवस भाववृद्धी सत्संगांचेही आयोजन करण्यात येत आहे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून एकाच वेळी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् भावजागृती’ अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न करवून घेत असल्याने साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढले आहेत.

७. साधनेपासून दूर गेलेल्या साधकांवरही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपादृष्टी असणे आणि त्यांनी  ‘साधना सोडणे किंवा त्यांची साधनेची गती मंदावणे’ यामागील कारणांचे चिंतन करणे आवश्यक असणे

गुरुमाऊली साधकांना आपत्काळाची जाणीव ‘येनकेन प्रकारेण’ करून देत आहे. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे काही साधक आज गुरुकृपायोगानुसार साधनेपासून दूर गेले आहेत; पण परात्पर गुरु डॉक्टरांची त्यांच्यावरही तेवढीच कृपादृष्टी आहे. अशा जुन्या साधकांनी कोणत्याही कारणाने त्यांची साधना थांबवली असल्यास ‘तो सर्व भूतकाळ विसरून आतातरी साधनेची गती वाढवावी’, असेच त्या गुरुमाऊलीला वाटते.

७ अ. जुन्या साधकांनी ‘पुढीलपैकी कोणत्या कारणाने साधना सोडली किंवा साधनेची गती मंदावली ?’, याचे स्वतः चिंतनरूपी आत्मनिरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे पडताळून पहावीत !

जुन्या साधकांनो, ‘परात्पर गुरु डॉक्टरांवर १०० टक्के श्रद्धा आहे का ?’, या प्रश्‍नाचे उत्तर ‘हो’ असेल, तर…..

प्रश्‍न १. त्यांचे आज्ञापालन करावेसे वाटते का ?

उत्तर : ‘साधनेचा आदर्श गुण गुरूंचे आज्ञापालन करणे, हाच आहे’, ही शिकवण त्यांनीच दिली आहे’, याची जाणीव ठेवणे अपेक्षित आहे.

प्रश्‍न २. आपत्काळाची तीव्रता लक्षात आली आहे का ?

उत्तर : लक्षात आली असेल, तर ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करा’, हे सांगणारेही परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, याचे भान असावे.

प्रश्‍न ३. चुकांच्या भीतीमुळे साधना सोडली का ? ‘आपल्यात पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहेत’, याचा ताण येऊन साधनेपासून दूर गेलो का ?

उत्तर : ‘चुकांतून शिकत रहाणे, हीच साधना आहे’, ही शिकवणही परात्पर गुरु डॉक्टरांची आहे. चुका ज्या स्वभावदोषांमुळे होतात, त्यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रियाही त्यांनी सांगितली आहे.

प्रश्‍न ४. ‘चुका झाल्यास व्यष्टी साधना करायला सांगतील’, असे वाटते का ?

उत्तर : विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तर त्याला एक वर्ष घरी रहावेच लागते. तसेच आपल्याकडून काही गंभीर चुका झाल्या, तर ‘व्यष्टी साधना करायला सांगणे, ही साधनाच आहे’, याचे भान ठेवावे. अनेक साधक सकारात्मक राहून व्यष्टी साधना करून आज साधनेत परत आले आहेत आणि काही साधकांनी अंतर्मुखतेने साधनेत शीघ्र प्रगती करून संतपदही गाठले आहे.

प्रश्‍न ५. पूर्वीच्या काही प्रसंगांमुळे आणि साधकांविषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे साधना सोडली का ?

उत्तर : पूर्वी जे काही घडले, तो आज भूतकाळ आहे. ‘साधकाने सतत वर्तमानकाळात रहायला हवे’, ही शिकवणही गुरुमाऊलीचीच आहे.

प्रश्‍न ६. घरातून विरोध वाढला आहे का ?

उत्तर : साधनेचे महत्त्व जर मनावर बिंबले आहे, तर विरोधाकडे दुर्लक्ष करणे अपेक्षित आहे; कारण विरोध करणार्‍या घरच्यांची काळजी घेणारेही परात्पर गुरु डॉक्टर आहेत.

प्रश्‍न ७. ‘आपली साधनेत प्रगतीच होणार नसेल, तर साधना कशाला करावी ?’, असे वाटते का ?

उत्तर : ‘साधना करून प्रगती होणार नाही’, असे होऊच शकत नाही. स्वतःचे जर अवलोकन केले, तर स्वतःतील अनेक स्वभावदोष (उदा. उद्धटपणा, राग येणे, अव्यवस्थितपणा इत्यादी) अल्प होऊन नम्रता, प्रेमभाव, व्यवस्थितपणा आदी ईश्‍वरी गुण आपल्यात येणे, ही प्रगतीच नाही का ? ‘थोडे प्रयत्न करून एवढे साध्य होते, तर प्रामाणिकपणे साधना केल्यास प्रगती होणारच आहे’, असे परात्पर गुरु गुरुमाऊलीने आश्‍वस्त केले आहे.

प्रश्‍न ८. वाईट शक्तींचे त्रास वाढतील, याची भीती वाटते का ?

उत्तर : ‘आध्यात्मिक त्रास वाढणार आहेत’, हे परात्पर गुरु डॉक्टर सांगत आहेतच; पण त्याच वेळी ते आध्यात्मिक उपायांचे महत्त्वही सांगत आहेत आणि त्यांनी स्वतःच स्वतःचे विविध त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधायलाही आपल्याला शिकवले आहे. त्याचप्रमाणे ‘कितीही आध्यात्मिक त्रास वाढले, तरी ते आपली काळजी घेणार आहेत’, ही दृढ श्रद्धा असावी.

८. साधनेला ‘उद्या नव्हे आज, आज नव्हे, तर आताच’ आरंभ करावा !

परात्पर गुरु डॉक्टरांना आपत्काळाचे भीषण दृश्य दिसत असल्याने साधकांना ते साधनेची गती वाढवायला सांगत आहेत. आपण जर साधनेपासून दूर गेलो असू, तर साधनेला ‘उद्या नव्हे आज, नव्हे तर आताच आरंभ करावा. ‘जे साधनारत आहेत, त्यांनी साधनेत धावायचे आहे’, याची जाणीव सतत मनात ठेवूया.

कृपाळू गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने तिच्या चरणांवर समर्पित करतो.’

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन संस्थेचे प्रसारसेवक, विदर्भ. (८.१.२०१८)

वाचकांना निवेदन

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now