प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण

  • ९ वर्षांनी निकाल लावणारी न्याययंत्रणा ! ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना शारीरिक आणि मानसिक  त्रास दिला, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या अधिकार्‍यांकडून या कार्यकर्त्यांना हानीभरपाई दिली गेली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे !
  • पबवरील आक्रमणाचे कारण पुढे करून गोव्यात गेल्या ५ वर्षांपासून श्रीराम सेनेवर घातलेली बंदी सरकार आतातरी उठवणार का ?
श्री. प्रमोद मुतालिक

बेंगळुरू – मंगळुरू येथील पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात दक्षिण कन्नड तिसर्‍या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व ३० आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. न्यायाधीश मंजूनाथ यांनी हा निकाल दिला. या निकालानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. २४ जानेवारी २००९ या दिवशी मंगळुरू येथील ‘अ‍ॅम्नेशिया – द लाऊंज’ या पबमध्ये एका गटाने तेथे आलेल्या काही मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर या घटनेचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या प्रकरणात २७ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. अधिवक्त्या आशा नायक आणि अधिवक्ता विनोद यांनी आरोपींच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद मांडला.

सत्याचा विजय झाला ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

श्री. प्रमोद मुतालिक यांनी सदर प्रकरणासंबंधी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘२४ जानेवारी २००९ या दिवशी मंगळुरू येथील पबमध्ये महिलांवर झालेल्या आक्रमणाच्या घटनेच्या वेळी मी मुंबई येथे होतो. तरीही कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने मला २६ जानेवारी २००९ या दिवशी बेळगाव येथून अटक केली. आमच्या विरोधात भा.दं.वि. अन्वये ९ कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. आज ९ वर्षांनी न्यायालयाने माझी संघटना आणि माझ्यासह ३० कार्यकर्त्यांना निर्दोष घोषित केले आहे. सत्याचा विजय झाला असून हा न्याय आमच्यासाठी हर्षदायक आहे. आम्ही न्यायालयाला धन्यवाद देतो, तसेच आमचे अधिवक्ता आशा नायक आणि अधिवक्ता विनोद पाल यांचाही मी आभारी आहे. यासमवेतच आम्ही भाजपचा निषेधही करतो. मी घटनास्थळी उपस्थित नसतांना मला या प्रकरणात गोवण्यात आले होते. वर्ष २००९ मधील घटनेमागे ‘ड्रग माफिया’, ‘सेक्स माफिया’ होते.’’ प्रसारमाध्यमांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीराम सेना आणि श्री. मुतालिक यांच्याविरोधात चालवलेल्या मोहिमेसंदर्भात श्री. मुतालिक म्हणाले, ‘‘टाइम्स नाऊ, एन्डीटीव्ही, आजतक या वृत्तवाहिन्यांनी आम्हाला ‘तालिबानी’, ‘गुंडा संस्कृती’, ‘गुंडांची संघटना’ इत्यादी म्हणून आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदु संस्कृती रक्षणार्थ हिंदु युवतींना विकृतीच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत आणि आज आमचा अर्थात् सत्याचाच विजय झाला आहे.’’

श्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे वृत्त दाबणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे !

वर्ष २००९ मध्ये ही घटना घडल्यानंतर श्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांची प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात मानहानी करण्यात आली. श्री. मुतालिक यांनाही अशा प्रकारे अवमानित करण्यात आले होते. आता मात्र या प्रकरणात न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केल्यावर प्रसारमाध्यमांनी याविषयीचे वृत्त प्रसारित केले नाही. यावरून प्रसारमाध्यमांचा कमालीचा हिंदुद्वेष दिसून येतो.