पुन्हा राममंदिर !

संपादकीय

काही प्रश्‍न ठेवणीतले असतात. ते सोडवायचेही नसतात आणि बाजूलाही करायचे नसतात. केवळ चर्चेत ठेवून लोकांची सहानुभूती मिळवायची असते. स्थानिक पातळीवरही अशा अनेक समस्या असतात. सध्या राष्ट्रीय पातळीवर अयोध्येतील राममंदिर हा ठेवणीतील प्रश्‍न झाला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी तो चर्चेत येतो. आश्‍वासने, आवाहने, घोषणा यांनी गाजतो. निवडणूक झाली की, पुन्हा ‘जैसे थे’ होतो. आतापर्यंत या प्रश्‍नावर केवळ भाजपची मालकी होती. गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी जशी काँग्रेसला हिंदूंच्या मतांची आठवण झाली, तीच उपरती आता राष्ट्रीय जनता दलालाही झाली आहे. ‘भाजप, संघ नाही, तर आम्ही राममंदिर उभारणार’, असे वक्तव्य राजदचे लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी केले आहे. ‘भाजपचे हे ठेवणीतील सूत्र एकदाचे निकाली काढले की, त्याला मते मागायला निराळे काही रहाणार नाही’, या कुटील हेतूने का असेना आता राजदला राममंदिराची आठवण झाली आहे. ‘हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिस्ती यांच्यासह अतीमागास, गरिब आणि दलित, हे सर्वजण अयोध्येत जातील आणि एक-एक विट ठेवून राममंदिर उभारणीसाठी प्रयत्न करतील’, अशी फुशारकी त्यांनी मारली आहे. हिदू आणि दलित यांचा प्रश्‍नच नाही, ते राममंदिराची उभारणी होण्याची वाट पहात आहेत. त्यांना जे करायचे, त्याचा प्रारंभ त्यांनी वर्ष १९९२ मध्येच केलेला आहे. राहिला प्रश्‍न अन्य पंथियांचा ! मुसलमानांनी त्या भूमीवरील दावा सोडला, तर अडचणच काय आहे ? राजदला एवढेच वाटते, तर त्याने  मुसलमानांना त्यावरील दावा सोडायला बाध्य करावे. एरव्हीही मुसलमान बिहारचे घरजावईच आहेत. आतापर्यंत बिहारच्या जंगलराजमध्ये जेवढ्या हिंदू-मुसलमान दंगली झाल्या, तेवढ्या प्रसंगात मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्यातच यादव कुटुंबियांना स्वार्थ दिसला होता. त्यामुळे राजद त्याची परतफेड म्हणून राममंदिराची भूमी मागणार असेल, तर त्यात वाईट काही नाही; मात्र तसे केल्यानंतरही ‘हिंदूंनो, आता आम्हाला मते द्या’, असे तेजप्रताप यादव म्हणू शकणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. केवळ वारसा हक्काने सूत्रे हातात एकवटलेल्या आपल्याकडील राजकीय पक्षांच्या अपरिपक्व युवराजांना हिंदूंना गृहित धरणे एवढे सोपे वाटते की, एखाद्या वेळी मंदिरामंदिरांमधून दर्शन घेत फिरले अथवा राममंदिरासारख्या बहुचर्चित सूत्राविषयी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवली की, निवडणुकीचा मार्ग सुकरच झाल्याची स्वप्ने त्यांना पडू लागतात !

बिहारची दुःस्थिती कुणी केली ?

वर्ष १९९८ पासून बिहारच्या राजकारणात असूनही तेथील हिंदूंना अत्याचाराच्या आणि हालअपेष्टांच्या खाईत लोटणार्‍या राजदने आता राममंदिरासारख्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेशी निगडित सूत्राला हात घातला; म्हणून तो काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होणार नाही. आतापर्यंत बिहारमधील राजकारणाची दलदल, घराणेशाही, भ्रष्टाचार यांमुळे तेथील जनता दुःखी आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि दंगली-मारामार्‍यांमुळे राज्याची जागतिक स्तरावर अपकीर्ती होत आहे. केवळ राजकीय स्वार्थ साधणारे राज्यकर्ते लाभल्यामुळे राज्यातील बेरोजगारी, अशिक्षितपणा, दारिद्य्र, भूकबळी आदीनींही टोक गाठले आहे. सुशासन, कायदा-सुव्यवस्था, विकास आणि परिवर्तन यांची आज बिहारला जेवढी आवश्यकता आहे, तेवढी खचितच अन्य राज्यांना. या परिस्थितीला उत्तरदायी कोण आहे ? बिहार एवढे बकाल कुणामुळे झाले आहे ? अशा स्थितीत तेजप्रताप यांनी भाजपला डिवचण्यासाठी राममंदिराचे सूत्र उपस्थित करण्यापेक्षा बिहारमधील जंगलराज संपवून जनतेला रामराज्य देण्याची घोषणा केली असती, तर अधिक मते पारड्यात पडली असती. बिहारची जनता चांगले दिवस पहाण्याची प्रतीक्षा करत आहेत. ते करण्याची राजदवाल्यांची इच्छा नाही. सवंग प्रसिद्धीसाठी वाटेल ते बरळणारे युवराज राहुल गांधी यांच्याप्रमाणे तेही आता असंबद्ध वक्तव्ये करू लागले आहेत. राममंदिर बांधणे, हे केवळ भ्रष्टाचारी राजदच्याच नव्हे; तर कुठल्याच पक्षाच्या आवाक्यात नाही, हे त्यांच्या बुद्धीला समजावून सांगणे, हा निष्फळ प्रयत्न ठरेल.

राममंदिराचा लढा देण्यासाठी रामभक्त व्हा !

ज्या प्रभु श्रीरामाने रावणाचा नाश करून बिभीषणाकडे राज्यकारभार सोपवला, तो भगवंत काय राजदच्या गुंडप्रवृत्तीच्या नेत्यांना असा सहजतेने प्रसन्न होणार आहे का ? भाजप काय किंवा राजद काय, अयोध्येत राममंदिर बांधणे, हे काही राजकीय बळ वापरून पूर्णत्वाला नेण्याचे कार्य नाही. भगवंत निवडणुकीसाठी नाही, मतांसाठी नाही, तर भक्तांसाठी धावून येतो. कुणाला खरोखरच राममंदिर बांधण्याची इच्छा असेल, तर त्यांनी प्रथम प्रभु श्रीरामाचे भक्त होणे आवश्यक आहे. रामराज्यासम आदर्श कारभार केला, तर प्रभु श्रीराम स्वयं अवतरित होतील. वास्तविक आता केंद्रात आणि उत्तरप्रदेशमध्ये भाजपला बहुमत असल्यामुळे आणि उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आध्यात्मिक नेतृत्व असल्यामुळे हिंदूंच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘आतातरी राममंदिराचे निर्माण व्हावे’, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे; मात्र राजकीय तडजोड म्हणून कुणी राममंदिर बांधावे आणि त्याच्या बदल्यात मतांची याचना करावी, अशी कुणाही हिंदूची इच्छा नाही. अयोध्या ही त्या रामललाची जन्मभूमी असल्यामुळे तेथे एक दिवस प्रभु विराजमान होणारच आहेत; ‘रामभक्तच ते कार्य तडीस नेणार आहेत’, यावर हिंदूंची अढळ श्रद्धा आहे. ‘कुणा येर्‍यागबाळ्याचे ते काम नाही’, हे हिंदूंनी आता तेजप्रताप यांना ठणकावून सांगावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now