ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या पालिकेच्या आदेशाचे पालन न करणार्‍या सोसायट्यांना अंतिम मुदत !

मुंबईत प्रतिदिन जमा होणार्‍या कचर्‍यामुळे क्षेपणभूमीही अपुरी पडत आहे. याची कल्पना असूनही कचरा व्यवस्थापनाविषयीची निष्क्रीयता दाखवणारे नागरिक समाजहिताचा थोडा तरी विचार करतात का ?

मुंबई – शहरातील कचर्‍याची अडचण मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण वसाहतींतील ओल्या कचर्‍यावर वसाहतीच्याच परिसरात प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने वारंवार कालावधी देत कारवाईचा धाक दाखवूनही अद्याप केवळ १ सहस्र वसाहतींनीच याविषयी कार्यवाहीला आरंभ केला आहे. असे असल्याने कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणार्‍या शहरातील अनुमाने २ सहस्र ३०० वसाहतींना १ मासाची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेच्या आदेशावर कार्यवाही न करणार्‍या वसाहतींवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. (वसाहतींत राहणारे उच्चभ्रू नागरिक कचरा व्यवस्थापनाविषयी एवढे उदासीन का ? – संपादक) मुंबईतील २० सहस्र चौ.मी.पेक्षा अधिक आकाराच्या आणि प्रतिदिन १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणार्‍या वसाहतींचा कचरा २ ऑक्टोबर २०१६ पासून उचलला जाणार नाही, अशी चेतावणी पालिका प्रशासनाने दिल्यावर तिला राजकीय नेते आणि नागरिक यांच्याकडूनही विरोध झाला होता. आधीच्या वर्षांच्या तुलनेत आजमितीस प्रतिदिन गोळा कराव्या लागणार्‍या कचर्‍यात मोठी घट झाल्याने कचरा संकलन करणार्‍या वाहनांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. (अशी लाभदायक प्रक्रिया राबवण्यास नागरिकांनी दिरंगाई करणे, हे त्यांना सामाजिक बांधिलकी नसल्याचेच द्योतक ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF