श्रीलंकेमध्ये पुन्हा धार्मिक हिंसाचार वाढला !

कोलंबो – श्रीलंकेच्या कॅण्डी या पर्वतीय जिल्ह्यात आणीबाणी घोषित केल्यानंतरही बहुसंख्यांक सिंहली बौद्ध आणि अल्पसंख्याक मुसलमान यांच्यातील धार्मिक हिंसाचार पुन्हा उसळला आहे. या संघर्षात दुकानांची आणि घरांची हानी झाली आहे.

श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडून कायदा-सुव्यवस्था खाते काढून घेतले आहे. विक्रमसिंघे यांच्या ‘युनायटेड नॅशनल पक्षाचे’ ज्येष्ठ सदस्य रणजित मद्दुमा बंडारा यांची पोलिसांचे प्रभारी असलेले नवे मंत्री म्हणून नेमणूक केली आहे. विक्रमसिंघे यांना ११ दिवसांपूर्वीच वरील खाते देण्यात आले होते. अध्यक्ष सिरिसेना यांनी ७ मार्चला कॅण्डीचा दौरा करून दंगा करणार्‍यांविरुद्ध बळाचा पुरेपूर वापर करण्याचा आदेश सुरक्षादलांना दिला होता.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित हवे ! – अमेरिका

श्रीलंकेच्या राट्रीय सुरक्षेचा आम्ही आदर करतो, मात्र नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राहील, याची काळजीही श्रीलंकेने घ्यावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी आणीबाणी घोषित केल्यानंतर अमेरिकेने वरील म्हणणे मांडले आहे. यापूर्वी कोलंबोतील अमेरिकेच्या दूतावासातून असे स्पष्ट केले होते की, हिंसाचार घडविणार्‍यांविरुद्ध श्रीलंका सरकारने तातडीने कारवाई करावी, धार्मिक अल्पसंख्य आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांना संरक्षण द्यावे आणि आणीबाणी रहित करावी.


Multi Language |Offline reading | PDF