हिंदूंनो, खोट्या इतिहासाला बळी पडू नका ! – श्री. बळवंतराव दळवी, मुंबई कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च २०१८) या दिवशी तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने…

लहानपणापासूनच एक विषय माझ्या डोक्यात घर करून राहिला तो कायमचाच. तो म्हणजे श्रीशिवछत्रपती. या विषयाने माझे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. रणजित देसाई यांची ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी मिळवली आणि अवघ्या ३ दिवसांत ती मी अधाशासारखी वाचून काढली. मग शिवाजी सावंत यांची ‘छावा’ ही कादंबरी वाचून काढली. वाचनाची भूक वाढू लागली होती. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी या २ विचारांनी मी भारून गेलो होतो. शिवनेरी, प्रतापगड, पुरंदर, पन्हाळगड, सिंहगड, राजगड, रायगड अशा अनेक किल्ल्यांच्या वार्‍या झाल्या होत्या. गडावर जातांना तिथल्या वास्तूंविषयीची माहिती जमा करून तो पहाण्याची सवय लागली होती. पूर्वी केवळ गड पहायचो, आता मात्र गड अभ्यासू लागलो होतो.

१. अन् वेगळे शिवराय वाचनात आले !

अन् अशातच एके दिवशी एक लेख वाचनात आला. त्यात लिहिले होते की, ‘शिवराय यांचा खून झाला होता.’ लेख वाचून डोके बधीर झाले. हे असे सारे काही पहिल्यांदाच वाचत होतो. मग पुन्हा एके दिवशी ‘छत्रपती संभाजी महाराज यांना मारण्यात ब्राह्मणांनी औरंगजेबला साहाय्य केले होते’, अशी माहिती समोर आली. हे काहीतरी नवीनच वाचत होतो. ‘श्रीमान योगी’ आणि ‘छावा’ या कादंबर्‍यांमध्ये असे काहीच वाचनात आले नव्हते. मग ही अशी माहिती कुणी लिहिली; म्हणून माझी उत्सुकता वाढली. मग पहिल्यांदाच काही तथाकथित इतिहास लेखकांची नावे मला समजली. वेगळे छत्रपती शिवाजी महाराज मला इथे सापडले. इथे मला ‘श्रीमान योगी’मधील शिवछत्रपती सापडले नाहीत आणि ‘छावा’मधील शंभूराजे मला दिसले नाहीत. पहिल्यांदा मला इथे दिसला, तो म्हणजे राग, संताप आणि द्वेष !

२. कुठले सत्य ?

खरेतर माझ्यासारखा मराठा तरुणाने ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा कधी विचारच केला नव्हता. माझ्यासमोर दोन भिन्न शिवछत्रपती होते. एका इतिहासात मराठ्यांनी केलेला पराक्रम होता, तर दुसरीकडे शिवछत्रपती यांच्या सैन्यात मराठे अल्प; मात्र मुसलमान सैन्य अधिक दिसत होते. कुठले सत्य तेच कळेनासे झाले होते. मन दोन्ही बाजूकडे झुकत होते.  मनात राहून राहून एक विचार येऊ लागला. आजचा मराठा तरुण स्वतः शिवचरित्राचा अभ्यास का करत नाही ? तो मूळ संदर्भ ग्रंथ पडताळतो का ? दुसर्‍याने जे लिहिले आहे त्यावर डोळे बंद करून विश्‍वास ठेवण्यापेक्षा आपण शिवचरित्राचा अभ्यास का करत नाही ?

३. …आणि शिवकालीन संदर्भ ग्रंथांतून सत्य समोर आले !

मी शिवछत्रपती यांच्या इतिहासाचे समकालीन ग्रंथ शोधू लागलो. सभासद बखर, श्रीशिवभारत, शिवकालीन पत्रसार संग्रह, आदिलशाही, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज असे  समकालीन इतिहास ग्रंथ वाचू लागलो. वा.सि. बेंद्रे, यदुनाथ सरकार, सेतुमाधवराव पगडी, विजयराव देशमुख, गो.स. सरदेसाई, सौ. कमल गोखले अशा लेखकांची अनेक संदर्भासहित असलेली पुस्तके वाचून काढली. शिवकालीन २ सहस्र ८०० पत्रे स्वतःच्या संग्रहात ठेवली आणि स्वतःचे छोटे वाचनालय सिद्ध केले. अनेक ऐतिहासिक ग्रंथ माझ्या संग्रही जमा केले. त्या सर्व पुस्तकांत कुठेही ‘शिवछत्रपती यांचा खून झाला होता’, हे सापडले नाही. ‘छत्रपती संभाजीराजे यांना पकडून देण्यात ब्राह्मणांचा हात होता’, अशी कुठेही नोंद दिसली नाही.

‘दोन भिन्न मतप्रवाहांमधील काय सत्य आहे’, हे माझ्यासमोर आले होते. एका बाजूला ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांवर आधारित इतिहास होता, तर दुसरीकडे राग, संताप आणि द्वेष यांवर आधारित चुकीचा इतिहास सांगितला जात होता. मी जर मूळ संदर्भ पडताळले नसते, तर मीसुद्धा डोळे बंद करून त्या तथाकथित इतिहास लेखकांंच्या खोट्या इतिहासाच्या प्रचाराला बळी पडलो असतो.

४. हिंदु धर्मात फूट पाडण्याचे षड्यंत्र !

शिवछत्रपती हे हिंदु राजे होते. त्यांनी ‘हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि किल्ले रायगडावर हिंदुपदपातशाही स्थापन केली’, हे जगजाहीर असतांनाही ‘दुसर्‍या बाजूला शिवछत्रपती यांनी हिंदु धर्म सोडला होता. त्यांच्या सैन्यात ५७ टक्के मुसलमान होते. त्यांचा खून झाला होता’, असे काहीही खोटे लिहून मराठा तरुणांची माथी भडकवली जात आहेत. जो मराठा तरुण शिवकालीन ग्रंथ आणि पुरावे यांविषयी बोलतो, त्याला ‘भटाळलेला आहे’, असे बोलून दूर ठेवले जात आहे. हिंदु मराठा विरुद्ध मराठा असा नवीन वादही चालू केला आहे. मराठा तरुणांना ‘ते हिंदु नाहीत’, असे सांगून हिंदु धर्मात फूट पाडायचे काम काहीजण करत आहेत, हे मला स्पष्ट दिसू लागले.

५. खोट्या इतिहासाला बळी पडू नका !

मी माझ्या सर्व हिंदूंना विनंती करतो, ‘‘तुम्ही दुसर्‍यावर विसंबून रहाण्यापेक्षा स्वतः इतिहासाचा अभ्यास करा. शिवकालीन ग्रंथ वाचा. त्यांच्या पुस्तकावर अवलंबून राहू नका. काहींना खोटा इतिहास लिहून तो पसरवण्याचे पैसे मिळतात. तुम्ही त्यांच्या खोट्या इतिहासाला बळी पडू नका. मराठा टिकला, तर महाराष्ट्र टिकेल आणि शिवछत्रपती यांचा खरा इतिहासही टिकेल. मराठाच जर धर्म सोडून अन्य लोकांच्या मागे जाऊ लागला, तर जे ५७ टक्के मुसलमान शिवराय यांच्या इतिहासात घुसवले गेले आहेत, त्यांची संख्या भविष्यात वाढत जाऊन मराठाच नाममात्र उरेल, हे ध्यानी घ्या !’’

– श्री. बळवंतराव दळवी, मुंबई कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now