परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवापूर्वी सौ. शालन शेट्ये यांना देवतांच्या पुष्पवृष्टीसंबंधी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

सौ. शालन शेट्ये

१. ध्यानावस्थेत ‘कैलास पर्वतावर सर्व देवता शिवावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आतुर झाल्या आहेत’, असे दृश्य दिसणे : ‘१४.५.२०१७ या रात्री ८.३० ते ९ या वेळेत मी रामनाथी आश्रमातील खोली क्र. ३२४ मध्ये नामजपासाठी बसले होते. तेव्हा माझे शरीर पूर्णपणे हलके होऊन ध्यान लागले. ध्यानावस्थेत असतांना माझ्या डोळ्यांसमोर दिसले, ‘कैैलास पर्वतावर माता पार्वती आणि शिवगण यांसह सर्व देवतांची शिवाला दुग्धाभिषेक घालण्यासाठी सिद्धता करण्याची एकच धावपळ चालू आहे. नंतर पूजा आणि अभिषेक झाल्यावर शिवावर पुष्पवृष्टी करण्यासाठी सर्व देवता आतुर झाल्या. सर्वत्र अत्यानंदाचे वातावरण होते.’

२. ध्यानातून बाहेर आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये शिवतत्त्व असून ‘सर्व देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी अमृत महोत्सवाची आतुरतेने वाट पहात आहेत’, असे जाणवणे : त्यानंतर मी ध्यानातून बाहेर आले. तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये शिवतत्त्व आहे. त्यांच्या अमृत महोत्सवासाठी सर्व जण आतुर झाले आहेत. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी सर्व देवताही अमृत महोत्सवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहेत.’

– सौ. शालन जयेश शेट्ये, लांजा, रत्नागिरी. (१५.५.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. – संपादक