पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी अज्ञातांकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा दंगलीचे प्रकरण

मुंबई – कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेले पू. संभाजी भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या मागणीसाठी ११ फेब्रुवारी या दिवशी मालाड लिंक रोडवरील मीठ चौकी येथे अज्ञातांकडून घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

मालाड येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री जात असतांना हा प्रकार घडला. कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी घोषित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये झालेल्या हिंसक घटनांच्या प्रकरणी आंदोलकांवर प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही या वेळी अज्ञातांनी केली.

काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

मालाड येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम चालू असतांना काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी मालाड, मालवणी, कांदिवली आणि चारकोप येथील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सकाळीच कह्यात घेतले. लोकसभेत भाषणाच्या वेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना रामायणातील शूर्पणखा राक्षसिणीच्या हास्याशी केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.