मेजर आदित्य कुमार यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

शोपियां येथील गोळीबार प्रकरण

नवी देहली – सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांवर केलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाल्याच्या प्रकरणी मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात नोंद झालेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

मेजर आदित्य कुमार यांचे वडील लेफ्ट. कर्नल करमवीर सिंह

मेजर आदित्य कुमार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कारवाईला मेजर आदित्य कुमार यांचे वडील लेफ्ट. कर्नल करमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, तसेच ‘मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रहित करावा’, अशी मागणी केली. ‘लष्कराची सेवा बजावतांना ‘अफ्स्पा’ (सैन्याला विशेषाधिका देणारा कायदा) कायदा लागू असलेल्या क्षेत्रात समाजकंटकांनी आक्रमण केल्याने हा गोळीबार करावा लागला. त्यामुळे कोणताही गुन्हा नोंद होऊ शकत नाही’, असे सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. यावर न्यायालयाने वरील आदेश दिला.

गानोवपुरा येथे २७ जानेवारी या दिवशी स्थानिक नागरिकांनी सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. यानंतर सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ तरुणांचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मेजर आदित्य कुमार यांच्यासह १० जणांच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या या कृतीवर देशभरातून सडकून टीका झाली. भाजपने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

लेफ्ट. कर्नल करमवीर सिंह यांच्या याचिकेवर आदेश देतांना न्यायालयाने ‘मेजर आदित्य कुमार यांच्यावर तुर्तास कोणतीही कारवाई करू नये’, असा आदेश जम्मू-काश्मीर पोलिसांना दिला. याशिवाय ‘गुन्हा रहित करण्याच्या याचिकेवर जम्मू-काश्मीर सरकारने २ आठवड्यांत त्यांची भूमिका मांडावी, तसेच केंद्र सरकारची या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी’, असे न्यायालयाने सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now