शिवाला बेलाचे पान वाहण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वाहावा ?

बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचा देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

१. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे : सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वाहावे (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च ।)

२. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे : शाक्तपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वाहावा. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) आणि अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करू शकते. वाहतांना बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवावा. तीन पानांतून एकत्र येणारी शक्ती आपल्याकडे यावी, हा त्यात उद्देश असतो. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्तीने त्रिगुण न्यून होण्यास साहाय्य होते.

बेल वाहण्याच्या पद्धतीनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरावर होणारा शिवत्त्वाचा लाभ

बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचा देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.

बेल उपडा का वाहावा ?

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळेे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था