शिवआराधना

शिवाची कृपा संपादण्याचा मार्ग

शिवाची नावे, त्यांचा अर्थ आणि शिवाचे कार्य

१. शिव : ‘शिव म्हणजे कल्याण करणारा, शुभंकर. तो सर्व सृष्टीचा लयकर्ताही समजला जातो. लय म्हणजे शेवट किंवा अंत घडवणारा, नष्ट करणारा; परंतु ‘लय’ या शब्दाचा अर्थ ‘जीवन एका सुरेल लयीत बांधणारा’, असाही का समजू नये ? कारण भगवान शिवशंकर महादेव नृत्यकलेचाही प्रणेता आहे. नृत्य जाणतो, निर्माण करतो, तो जीवनही लयबद्ध आणि प्रवाहित करील, यात शंकाच नको.

२. जलाशमेषज : मेष म्हणजे वैद्य, जो जलोपचार, शीतोपचार जाणतो, तो मदनदाहातून मदनालाही पुनर्जीवित करू शकेल, हेही जाणवते.

सर्वांचेच दैवत असणारा आणि कल्याणकारी शिव

१. महादेव : देवांचाही देव, मोठा देव !

२. शंकर :  हे सवार्र्ंचे कल्याणकारी दैवत आहे.

३. अनेक अंगांनी आणि विविध रूपांनी प्रगट होणारे हे दैवत बहुतांश कुलांचे कुलदैवतही आहे.

४. योगशास्त्र, धनुर्विद्या आणि ६४ कला यांचे प्रणेते, आपणा सर्वांप्रमाणे प्रापंचिक, लोकाभिमुख, सत्वर पावणारे, जेवढे कनवाळू, तेवढेच क्रोधी, सर्वांना सदैव समवेत घेऊन जाणारे, तरीही एकांतप्रिय, जास्तीतजास्त संख्येने सर्वत्र मंदिरे आढळणारे हे अत्यंत जागृत दैवत आहे.

५. अनेक प्रकारच्या उपासना आणि भक्तीमार्ग यांचा प्रारंंभ यांच्यापासूनच, यांच्याच प्रेरणेने अन् ज्ञानाने होतो.

‘शिव’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

१. शिव हा शब्द वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. ‘वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो.

२. शिव म्हणजे मंगलमय आणि कल्याणस्वरूप असे तत्त्व.

३. शिव म्हणजे ब्रह्म अन् परमशिव म्हणजे परब्रह्म.

आज्ञाचक्राचा अधिपती

शिव आज्ञाचक्राचा अधिपती आहे. शिव आदिगुरु आहे. गुरुसेवेत असलेल्या शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. अशा दृष्टीने आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे एकप्रकारे शिवाच्या गुरुत्वाचीच साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.

शिवोपासनेच्या विविध पद्धती

शिवाच्या उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिवलिंग, शिवमूर्ती आणि ज्योतिर्लिंग यांचे पूजन ही शिवाच्या उपासनेची प्रमुख पद्धत होय. पुराणातील कथांचे श्रवण करणे, हीसुद्धा शिवोपासनेची एक पद्धत आहे.

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं

नको तीर्थांसि जाऊं नको ।

योगाभ्यास नको व्रतें मख

नको तीव्रें तपें तीं नको ॥

काळाचें भय मानसीं धरुं

नको दुष्टांस शंकूं नको ।

ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥ – शिवस्तुती, श्‍लोक ३१

– ज्योतिषी ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), वारजे, पुणे. (‘श्रीधर संदेश’, मार्च २०१४)