काँग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर कराची साहित्य संमेलनात भाग घेण्यासाठी पुन्हा पाकला जाणार

पाक भारतावर आक्रमण करून सैनिकांना ठार मारत असतांनाही पाकप्रेमाचे उमाळे येणार्‍या मणिशंकर अय्यर यांच्यासारख्यांकडून दुसरी अपेक्षा तरी कोणती असू शकते ? सरकार त्यांना पाकमध्येच का पाठवून देत नाही ?

कराची – काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले त्यांचे पूर्वीचे नेते मणिशंकर अय्यर हे कराची साहित्य संमेलनात भाग घेण्यासाठी पुन्हा एकदा पाकमध्ये जाणार आहेत. त्यांच्या समवेत लेखक अमित चौधरी हेही जाणार आहेत. तेथे ते दोघे जण फाळणीचा जनतेवर झालेला परिणाम आणि भारत-पाक यांच्यातील विद्यमान संबंध, यांवर विचार मांडणार आहेत.

९ फेब्रुवारीला चालू झालेले हे साहित्य संमेलन १२ फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये २०५ पाकिस्तानी, तर अन्य राष्ट्रांतील ३० असे २३५ वक्ते विषय मांडणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटनसत्रात भारताचे पाकमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांचे भाषण झाले. अय्यर हे नोव्हेंबर २०१५ मध्ये पाकिस्तान दौर्‍यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी एका मुलाखतीत भारत आणि पाक यांच्यातील चर्चा पुढे घेऊन जायची असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवले पाहिजे अन् त्याजागी आम्हाला सत्तेवर बसवले पाहिजे, असे अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. वर्ष २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.