युद्धारंभ केव्हा ?

संपादकीय

जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सैन्याच्या सुंजवान या तळावर १० फेब्रुवारीला आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अद्यापपर्यंत ५ सैनिक हुतात्मा, तर ४ आतंकवादी ठार झाले आहेत. सैन्याचे कुटुंबीय असलेल्या या तळावर केलेल्या भ्याड आक्रमणामुळे पुन्हा एकदा आतंकवाद्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे. हे आक्रमण जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांनी केल्याची माहिती आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच ४ फेब्रुवारीलाही पाकिस्तानी सैन्याने अमेरिकी बनावटीच्या अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा वापर करून आक्रमण करून भारतीय सैन्याचा एक कॅप्टन आणि ३ सैनिक यांची हत्या केली. या वेळी सर्व भारतवासियांची पाकविरोधात भारताने त्वरित युद्ध पुकारून त्याला नेस्तनाबूत करावे, अशी तीव्र भावना झाली होती. त्यानंतर आठवड्याच्या आतच आतंकवाद्यांनी सैन्याच्या तळावर आक्रमण केले.

गेल्या २ वर्षांत जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांनी सैन्याच्या तळावर ४ मोठी आक्रमणे केली. यात साम्य म्हणजे ही सर्व आक्रमणे पहाटे ४ ते ५.३० या कालावधीत करण्यात आली आहेत. २ जानेवारी २०१६ ला पठाणकोट हवाई दलाच्या तळावर केलेल्या आक्रमणात ७ सैनिक हुतात्मा झालेे. १८ सप्टेंबर २०१६ ला काश्मीरमध्ये उरी येथे सैन्याच्या तळावर केलेल्या भयंकर आक्रमणात १९ सैनिक हुतात्मा झालेे, तर २९ नोव्हेंबर २०१६ ला नगरोटा येथे केलेल्या आक्रमणात ७ सैनिक हुतात्मा झाले होते. पाक सैन्य आणि आतंकवादी यांच्या आक्रमणात प्रतिदिनच सैनिकांचे बळी जात आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिक घायाळ होत आहेत. अशा वेळी शासनकर्त्यांची भूमिका आश्‍चर्यकारक आहे.

देशावर सर्वाधिक काळ काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसच्या कार्यकाळातही पाकिस्तानची आक्रमणे प्रतिदिनच चालू असायची; मात्र निवळ तोंडी चेतावणी देण्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या मंत्र्यांकडून काहीच प्रत्युत्तर नसायचे. जणू सैनिक मरण्यासाठीच आहेत, अशाच आविर्भावात काँग्रेसचे नेते होते. दुसर्‍याने आक्रमण केल्यानंतर आम्ही विचार करू, समिती नेमू, अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यामागे होती. आता सरकार पालटले असले, तरी संरक्षणविषयक धोरणांमध्ये काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे भारतावर आक्रमण केल्याने विशेष काही होत नाही हा पाकचे सैनिक आणि आतंकवादी यांचा समज अधिक दृढ होत झालेला दिसतो.

पाकच्या प्रतिदिनच्या आक्रमणामुळे सीमाभागातील जनतेची ससेहोलपट होत आहे. ३ किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांचे विस्थापन, शेकडो शाळा ३ दिवसांसाठी बंद ठेवणे अशा हास्यास्पद उपाययोजना क्षेपणास्त्रसज्ज भारताला कराव्या लागतांना पाहून कोणा भित्र्या शत्रूलासुद्धा बळ चढेल, अशी स्थिती आहे. पाक सैनिकांनी क्षेपणास्त्रांनी केलेल्या आक्रमणानंतर शिवसेनेने भारताची क्षेपणास्त्रे केवळ राजपथावर दाखवण्यासाठी आणि वाहवा मिळवण्यासाठी आहे का ?, असा प्रश्‍न केला आहे. तसेच हे केवळ आक्रमण नसून भारतासमवेत पुकारलेले युद्धच आहे. त्यामुळे तसेच चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर जगात भारताची नामर्द अशी ओळख होईल, असेही पुढे सांगितले आहे.

इतिहासातून शिकणार कि नाही ?

एक काळ होता थोरले बाजीराव पेशव्यांचा ! तेव्हा महाराष्ट्र वगळता भारतभर अत्याचारी मोगल शासकांचे राज्य होते. मोगलांना मराठ्यांचे राज्य बुडवण्याची खुमखुमी होती, तर बाजीरावांची पूर्ण भारतभर मोगल शासकांना उलथवून मराठा साम्राज्य विस्तार करण्याची मनीषा होती. मोगल शासक अतिशय कपटी आणि धूर्त होते. त्यामुळे ते कधी हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करतील आणि त्यांच्याशी आपण युद्ध करू अशी वाट बाजीराव पहात राहिले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राबाहेर मराठी सैन्य नेले. दिवसा घोड्यावरून प्रवास करायचा आणि रात्रीपर्यंत इच्छित स्थळी येऊन शत्रूपक्षावर अकस्मात् आक्रमण करायचे. शत्रूला सावध होऊच द्यायचे नाही आणि प्रतिकारही करू द्यायचा नाही. अशा प्रकारे आक्रमणाचे तंत्र अवलंबत त्यांनी भारतभरातील मोगल साम्राज्य उलथवून मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. बाजीरावांच्या या रणनीतीमुळे आणि देशभर पसरलेल्या दरार्‍यामुळे अफगाणिस्तानातून भारतात आणि दक्षिणेत आक्रमक येणे बंद झाले. वर्ष १७३९ मध्ये इराणचा नादीरशहा याने देहलीवर आक्रमण केले, तेव्हा पेशवे देहलीकडे निघाले या बातमीनेच नादिरशहाने देहली सोडली होती. तसेच भविष्यातही हिंदवी स्वराज्यावर संकट कोसळू नये; म्हणून त्यांनी उत्तरेस शिंदे, होळकर, पवार इत्यादी सरदार घराणी उभी केली. याला म्हणतात सुरक्षा आणि रणनीती ! याचा पासंग तरी आजच्या शासनकर्त्यांना आहे का ?

इस्रायलनेसुद्धा त्यांच्या देशाभोवती क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचे कवच उभे केले आहे. कुठल्याही देशाकडून एक जरी क्षेपणास्त्र इस्रायलवर आले, तर ते तात्काळ हवेतच नष्ट केले जाते आणि जेथून क्षेपणास्त्र आले, त्या ठिकाणावर इस्रायलचे क्षेपणास्त्र झेपावते. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये, पाकिस्तान आणि भारतासारखेच शत्रूत्व आहे. त्यामुळे त्यांच्यात कधीतरी चकमकी होतात; मात्र वर्ष २०१४ मध्ये इस्रायलच्या ३ लहान मुलांना आतंकवाद्यांनी ठार केले, तसेच इस्रायलवर रॉकेटचा मारा केला. तेव्हा इस्रायलने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पॅलेस्टाईनचे २ सहस्रांहून अधिक सैनिक आणि नागरिक यांना ठार केले. त्यानंतर कुठे पॅलेस्टाईन ताळ्यावर आला.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सर्व जनतेने मोदी शासनाला डोक्यावर घेतले, कारण जनतेलाही तेच हवे. सातत्याने बळी जाणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून जनतेच्या मुठी आवळल्या जातात, सैनिकांचे कुटुंबीय एकाच्या बदल्यात पाकचे १०० मारा, अशी मागणी करतात; मात्र शासनकर्त्यांचे काय ? शासनकर्त्यांचे शांतता, संयम या शब्दांपलीकडे क्षात्रतेज कधी जागृत होणार कि नाही ? हा प्रश्‍न जनतेला सतावत आहे.