रामसेतूसाठी अखंड लढा देणारे डॉ. एस्. कल्याणरामन् यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी घेतली भेट !

१. रामसेतूसाठी अखंड लढा देणारे डॉ. कल्याणरामन् !

डॉ. कल्याणरामन् (डावीकडे) यांची मुलाखत घेतांना श्री. विनायक शानभाग

भारतातील प्रत्येक हिंदूला रामायणाविषयी माहिती आहेच, तसेच रामसेतूविषयी एक विशेष आकर्षणही आहे. प्रभु श्रीरामचंद्रांनी नल आणि नील नावाच्या वानरांच्या साहाय्याने, तसेच वानर सेनेच्या सेवारूपी परिश्रमाने रामसेतू बांधला. अशा रामसेतूला तोडण्यासाठी वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन केंद्र सरकारने सेतूसमुद्रम् प्रकल्प हाती घेतला. त्याच्या विरोधात चेन्नई येथील प्रसिद्ध इतिहास आणि संस्कृती तज्ञ डॉ. कल्याणरामन् (वय ७८ वर्षे) यांनी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी आणि अधिवक्ता दुरैनाथन् कुप्पूस्वामी यांच्या साहाय्याने सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने देहलीमध्ये १५ लाख हिंदूंची सभा घेतली. डॉ. कल्याणरामन् यांच्या अविरत परिश्रमाने सर्वोच्च न्यायालयाने सेतूसमुद्रम् प्रकल्पावर स्थगिती आणली आणि जगभरातील कोट्यवधी हिंदूंमध्ये रामसेतूविषयी जागृतीही झाली. अशा महान विभूतीची दिनांक ४.२.२०१८ या दिवशी चेन्नई येथील त्यांच्या घरी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी विश्‍वविद्यालयाचे श्री. विनायक शानभाग यांनी डॉ. कल्याणरामन् यांची इंग्रजी भाषेतून मुलाखत घेतली. त्या वेळी डॉ. कल्याणरामन् यांनी सेतूसमुद्रम् प्रकल्पाच्या विरोधात कशा पद्धतीने लढा दिला आणि त्यांना त्या अंादोलनात श्री हनुमंताविषयी अनुभूती कशी आली, ते सांगितले.

२. श्री हनुमंत रामसेतूचे सतत रक्षण करत असल्याचे वाल्मीकि रामायणात सांगितलेले असणे

डॉ. कल्याणरामन् यांनी सांगितले, वाल्मीकि रामायणात असे लिहिले आहे की, श्री हनुमंत रामसेतूचे सतत रक्षण करत असतो आणि त्याची आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा देतांना अनुभूती घेतली. श्री हनुमंताच्या साहाय्याविना सेतूसमुद्रम् प्रकल्पाला स्थगिती मिळाली नसती. रामसेतूविषयी बोलतांना डॉ. कल्याणरामन् यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू येत होते.

३. रामसेतू राष्ट्रीय स्मारक घोषित होईपर्यंत लढा देणे आवश्यक !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना त्यांनी सांगितले की, जोपर्यंत रामसेतू राष्ट्रीय स्मारक घोषित होत नाही, तोपर्यंत आपल्याला (हिंदूंना) लढा द्यायचा आहे. या वेळी त्यांनी रामसेतूविषयीचे लिखाण आणि छायाचित्रे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी दिली.

डॉ. कल्याणरामन् यांचा परिचय

डॉ. कल्याणरामन् (वय ७८ वर्षे) हे सरस्वती संशोधन केंद्राचे संचालक आहेत. या वयातही ते श्री सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य करत आहेत. भारतीय रेल्वे लेखा सेवा आणि भारतीय रेल्वे इलेक्ट्रॉनिक कमिशन टास्क फोर्स यांचे ते सदस्य होते. वर्ष १९७८ ते १९९५ पर्यंत १८ वर्षे ते एशियन डेव्हलपमेंट बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी फिलिपीन्स विद्यापिठातून सार्वजनिक प्रशासन या विषयावर विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी मिळवली आहे. कन्नड, तेलगू, हिंदी, संस्कृत आणि तमिळ या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि ७०० हून अधिक शास्त्रज्ञ यांच्या सहकार्याने त्यांनी वेदकालीन श्री सरस्वती नदीचा शोध लावला. श्री सरस्वती संस्कृतीविषयी त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत.

जागतिक वैदिक अभ्यास संघटना मंडळाचे सदस्य, रामेश्‍वरम् रामसेतू रक्षा चळवळीचे अध्यक्ष आणि भारताचा इतिहास अन् संस्कृती लिखाण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून डॉ. कल्याणरामन् यांची निवड करून त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांना इतिहासाच्या अभ्यासासाठीचा वाकांकार पुरस्कार २०००, शिवानंद प्रतिष्ठित नागरिक पुरस्कार २००८, रामसेतू रक्षणाविषयीचा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान २००८ आणि मिथिक सोसायटी सेंटेनरी अवॉर्ड २००९ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. – श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (८.२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now