बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या गोठ्याला आग

घरातील १ गाय, १ वासरू आणि २ बोकड यांचा होरपळून मृत्यू

हिंदूंनो, आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंचा आक्रोश ऐकू गेला नाही, हे सत्य जाणा आणि जगभरातील धर्मबांधवांच्या रक्षणार्थ आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी व्हा !

ढाका – बांगलादेशमधील फारीदपूर जिल्ह्यात असलेले चार बाश्पूर या भागातील हिंदु रहिवासी श्री. सुनील बिश्‍वास, श्री. सुबल बिश्‍वास, श्रीमती कामोना बिश्‍वास आणि श्रीमती ममता बिश्‍वास यांच्या गोठ्याला धर्मांधांनी आग लावली. या आगीत १ गाय, १ वासरू आणि २ बोकड जळून खाक झाले. याशिवाय १० मण कांदाही जाळून गेला. त्यामुळे ८ लक्ष टका (६ लाख १६ सहस्र रुपये) इतकी हानी झाली. १५ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी २ धर्मांधांना अटक केली आहे.

चार बाश्पूर भागातील मुस्तफा मुन्शी, रहमान मुन्शी, रहीम मुन्शी, इनामुल मुन्शी आणि बिपुल शेख या ५ धर्मांधांनी बिश्‍वास कुटुंबियांच्या गोठ्यात ज्वलनशील पदार्थ फेकले. त्यामुळे गोठ्यास मोठी आग लागली. यानंतर तेथील रहिवासी श्री. शामल देबनाथ यांना जाग आली. त्यांनी या धर्मांधांना पळून जातांना पाहिले. श्री. सुबल बिश्‍वास यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचे हात भाजले. तथापि आग नियंत्रणात येऊ शकली नाही. यानंतर त्यांनी या प्रकरणी मधुखाली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रहमान मुन्शी आणि इनामुल मुन्शी यांना अटक करून पोलीस कोठडी बजावली.

बांगलादेशमधील बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिश्‍वास कुटुंबियांशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी मधुखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी मिझानुर रहमान यांची भेट घेतली. आरोपींचा बिश्‍वास कुटुंबाशी भूमीवरून वाद होता, त्यामुळे त्यांनी सूड उगवला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

या घटनेतील इतर फरार आरोपींना त्वरित अटक करावी, तसेच घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी अधिवक्ता रवींद्र घोष यांनी केली. या आगीमुळे झालेल्या हानीची भरपाई देऊन घटनेत घायाळ झालेल्या दुसर्‍या गोमातेचे सरकारी खर्चातून वैद्यकीय उपचार करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now