हिंदूसंघटनाची संधी !

अयोध्या येथे राममंदिर बांधण्याच्या मागणीसाठी येत्या महाशिवरात्रीपासून, म्हणजे १३ फेब्रुवारीपासून रथयात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ‘श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटी’ आणि विश्‍व हिंदु परिषद यांनी या ‘रामराज्य’ रथयात्रेचे आयोजन केले आहे. अयोध्येपासून चालू होणार्‍या रथयात्रेचा समारोप तमिळनाडूच्या रामेश्‍वरम्मध्ये २५ मार्चला श्रीरामनवमीच्या दिवशी होणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २८ वर्षांपूर्वी सप्टेंबर १९९० मध्ये राममंदिर रथयात्रा काढली होती. गुजरातमधील सोमेश्‍वर येथे चालू झालेली त्यांची रथयात्रा अयोध्या येथे समाप्त झाली होती. राममंदिर चळवळीविषयी जनजागृती करण्याचा त्यामागे हेतू होता. देशातील लोकांना ‘रामराज्य’ हवे आहे. भगवान श्रीराम १४ वर्षांनंतर अयोध्येत परतले होते. विद्यमान सरकारने वर्ष २०१९ पर्यंत म्हणजे १४ मासांत अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. वर्ष १९९० च्या पहिल्या रथयात्रेनंतर हिंदूंमध्ये अयोध्या येथील राममंदिराविषयी चांगलीच जागृती झाली. प्रत्यक्ष श्रीरामांच्या मंदिरासाठी इतकी वर्षे लढा द्यावा लागणे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सहिष्णुता हा हिंदूंचा एकच गुण हे सर्व सहन करू शकला. त्यासाठी हिंदूंचे कौतुक करावे तेवढे न्यूनच आहे; पण तसे होतांना दिसत नाही. उलट हिंदूंना या गुणावरून डिवचले जातांना आपण पहातो, असो. आता राममंदिराच्या उभारणीला काळ पोषक असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पण घोषित केले आहे की, अयोध्या खटला केवळ भूमी वाटपाच्या सूत्रावर निकालात काढला जाईल. याचा अर्थ खटल्यातील धर्मविषय किंवा हिंदु-मुसलमान विचारधारा इत्यादी सूत्रांना न्यायालय हात लावणार नाही. ते एका अर्थाने चांगलेच झाले, असे म्हणण्याचे कारण एवढेच की, या सूत्रांवर निर्णय देण्यासाठी धर्मगुरु आहेत; ते त्यांचे कार्य पार पाडतील. हिंदूबहुल देशात हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाच्या उभारणीसाठी २८ वर्षे लढा द्यावा लागणे, ही गोष्ट जगातील कोणत्याही व्यक्तीला विचारप्रवण करणारी आहे. त्यांना जेव्हा भारत देशातील परिस्थितीचा अंदाज लागेल, तेव्हाच त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. देश हिंदूबहुल असला, तरी हिंदूंचे परिणामकारक संघटन नाही. परिणामस्वरूप हिंदूंना समष्टी लाभाची गोष्ट मिळायला उशीर झाला. मूठभर विरोधक एकजुटीने संघर्ष करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, तसाच प्रकार मूठभर धर्मांधांनी राममंदिराला केलेल्या विरोधाच्या संदर्भात झाला. त्यांचा विरोध प्रभावी ठरला आणि हिंदूंना संघटनाची निकड जाणवायला लागली. आज हिंदूंना न्याय्य मागणी यशस्वी होण्यासाठी सरकार, नेते, हिंदुत्वनिष्ठ यांचे साहाय्य मिळत आहे. मागील ४ वर्षांपासून सरकारी व्यवस्थेमध्ये झालेला पालट भगवान श्रीरामांचे मंदिर उभे रहाण्यासाठी पोषक आहे. श्रीराम चौदा वर्षांनंतर अयोध्येला परत आले. विद्यमान केंद्रशासनाची मुदत १४ मासांनी समाप्त होणार आहे. असा योगायोग साधून हिंदु धर्मनिष्ठांनी आयोजित केलेली ही रथयात्रा आहे. हिंदूंचे भक्कम संघटन दाखवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी हिंदूंनी कोट्यवधींच्या संख्येने रथयात्रेत सहभागी व्हायला हवे.