(म्हणे) पाकिस्तानच्या एका गोळीला असंख्य गोळ्यांनी उत्तर देऊ ! – गृहमंत्री राजनाथ सिंह

शत्रूने आक्रमण केल्यावर त्याला उत्तर देणारे नव्हे, तर शत्रू आक्रमण करणारच नाही, यासाठी त्याला धडकी भरवणारे शासनकर्ते हवेत !

आगरतळा (त्रिपुरा) – पाकिस्तानसह भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण तरीही त्यांच्या कुरापती थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याकडून एक गोळी आली, तर त्या गोळीला असंख्य गोळ्यांनी उत्तर देऊ, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो आहे; पण आता सहनशक्तीची सीमा झाली. पाकिस्तानच्या गोळ्यांना प्रत्युत्तर देण्याचे आदेशच सैन्यादलाला दिले आहेत. शेजारी राष्ट्र म्हणून आक्रमणाचा प्रारंभ भारताकडून होणार नाही; पण त्यांना कुरापतींचे मूल्य  मोजावेच लागेल. (आक्रमण हाच स्वरक्षणाचा उत्तम मार्ग असतो, हे गृहमंत्री केव्हा जाणणार ? – संपादक) भारताकडून काश्मीर हिरावून घेण्याचे धाडस पाकिस्तानमध्ये नाही.

सुशासनासाठी भाजपला निवडून द्या !

डाव्यांची सत्ता उलथवण्यासाठी त्रिपुराची जनता भाजपला मत देईल. त्रिपुराच्या जनतेला सुशासन हवे असेल, तर त्यांनी भाजपला निवडून द्यावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांना अटक : नवी देहलीतील पाकच्या उच्चायुक्तांनी आतंकवाद्यांना पाकला जाण्याचा व्हिसा दिल्याचे उघड

भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडून आतंकवादी निर्मितीचे उद्योग होत असतील, तर असे आयुक्तालय भारतात हवेच कशाला ?

लश्कर-ए-तैयबा चे पाक प्रशिक्षित आतंकवादी – अब्दुल माजिद भट आणि मोहम्मद अशरफ मीर

श्रीनगर – पाकिस्तानमध्ये आतंकवादी प्रशिक्षण घेऊन भारतात परतणार्‍या अब्दुल मजीद भट आणि महंमद अशरफ मीर या आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आली. या दोघांनी पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या प्रशिक्षणस्थळी जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. ते देहलीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने दिलेल्या व्हिसावर अधिकृतपणे पाकिस्तानात गेले होते. ते भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, भट आणि मीर या दोन्ही काश्मिरी युवकांना वाघा सीमेवर तपासणी करत असतांना संशयास्पद हालचालींवरून कह्यात घेण्यात आले.   ते दोघे पाकिस्तानातून परत येणार असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस, सैन्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. हे दोघेही जम्मू काश्मीरमधील आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी होणार होते. या दोघांसमवेत अनेक पाकिस्तानी मुलांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात अनेक जण जेमतेम १० वर्षांची मुले आहेत.

शस्त्र प्रशिक्षणासाठी पाकचा व्हिसा !

पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्दुल मजीद भट आणि महंमद अशरफ मीर या काश्मिरी आतंकवाद्यांना शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठीच पाकिस्तानच्या नवी देहली येथील उच्चायुक्तांनी अधिकृतपणे व्हिसा दिल्याचे समोर आले आहे.