उत्तरप्रदेशात १५ चकमकींत एक गुंड ठार, तर २४ अटकेत

पोलिसांनी ही कारवाई गुन्हेगारांची पाळेमुळे नष्ट होईपर्यंत चालू ठेवायला हवी, तरच कायदा-सुव्यवस्था राखली जाईल !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या कानपूर, सहारनपूर, मुझफ्फरनगर, गोरखपूर यांसह विविध जिल्ह्यांत गेल्या २ दिवसांत १५ चकमकी झाल्या. त्यामध्ये १ गुंड ठार झाला असून पोलिसांनी २४ गुन्हेगारांना अटक केली. राज्याचे नवे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी दायित्व स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक राजीव नारायण सिंह यांनी सांगितले की, ठार झालेल्या गुंडाला पकडण्यासाठी २५ सहस्र रुपयांचे पारितोषिक घोषित पूर्वी केले होते. नागलाखेपाड जंगलात २ फेब्रुवारीला विशेष कृती दलाच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्यावर उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये लुटालूट आणि हत्या करणे, असे ३० गुन्हे प्रविष्ट होते. एकूण कारवाईमध्ये पोलिसांनी देशी बनावटीची शस्त्रे, स्फोटके, वाहने आणि रोख रक्कम शासनाधीन केली. अटक केलेल्या ३ गुन्हेगारांवर प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे पारितोषिक घोषित केलेले होते.