विविध कार्यक्रमांत विषय मांडतांना आपले बोलणे आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी होऊन ते उपस्थितांच्या अंतर्मनात जाण्यासाठी स्वतःचे साधनाबळ वाढवा !

सर्वत्रच्या वक्त्यांसाठी सूचना

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

१. कार्यकर्त्यांनी समाजाला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व पटवून दिल्यावर धर्मप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जाणे

‘हिंदु धर्मजागृती सभा, राष्ट्रीय आंदोलने, हिंदूसंघटन मेळावे, हिंदू अधिवेशने आदींच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते समाजाला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व पटवून देतात. प्रत्येक विषयाचा तात्त्विकदृष्ट्या अभ्यास करून ते सूत्रबद्धरित्या विषयाची मांडणी करतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन उपस्थित धर्मप्रेमी त्यांचे कौतुक करतात.

२. व्यष्टी साधनेचा पाया नसणार्‍या कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा समाजमनावर केवळ तत्कालीन परिणाम होणे

बरेच कार्यकर्ते व्यष्टी साधनेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. व्यष्टी साधनेचा पाया नसणार्‍या कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा राजकारण्यांच्या भाषणाप्रमाणे समाजमनावर तत्कालीन परिणाम होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विषयाचे इतरांनी जरी कौतुक केले, तरी त्यांनी त्यात अडकू नये; कारण त्यामुळे अहं वाढून साधनेत वेगाने घसरण होण्याचा धोका असतो.

३. कार्यकर्त्यांनी साधनावृद्धी करून वाणी चैतन्यमय होण्यासाठी यत्न करणे अपेक्षित !

भगवंताच्या कृपेमुळे आणि साधनेच्या बळावरच प्रभावी अन् चिरकालीन टिकणारे संघटन करता येते. त्यामुळे ‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठानपाहिजे ॥’ (दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६) असे समर्थ रामदासस्वामींनी सांगून ठेवले आहे.

कार्यकर्त्यांनी व्यष्टी साधनेसाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न केले, तरच त्यांच्या वाणीत चैतन्य निर्माण होईल. त्या चैतन्यमय वाणीमुळे भाषणातील विषय धर्मप्रेमींच्या अंतर्मनापर्यंत तर पोहोचेलच; पण त्यासह ते धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांसाठी उद्युक्तही होतील, यात शंका नाही !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now