…तर काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकार बरखास्त करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काश्मीरमध्ये सैनिकांवर गुन्हा नोंद केल्याचे प्रकरण

नवी देहली – प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर भाजप-पीडीपी यांच्या युती सरकारच्या पोलिसांनी नोंद केलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर हे सरकारच बरखास्त करावे, अशी रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी व्यक्त केली. काश्मीर खोर्‍यातील शोपियां जिल्ह्यात दगडफेक करणार्‍या तरुणांना पांगवण्यासाठी सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याने थेट सैनिकांच्याच विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामुळे राज्य सरकारवर सर्व थरांतून टीका होत आहे.

सैनिकांवर गुन्हे नोंद करण्याविषयीच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे नेते तथा जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी ‘सैनिकांचा मान आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याची कुणालाही अनुमती नाही’, असे सांगितले. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार महंमद सागर यांनी या प्रकरणी संबंधित सैनिकांवर कठोर कारवाईची मागणी केली. (सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांवर कारवाई करण्याची मागणी का करत नाही ? हा देशद्रोह्यांना पाठिशी घालण्याचाच प्रकार नव्हे का ? – संपादक)

सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवर गुन्हा नोंद का केला नाही, याची चौकशी करणार ! – पोलीस महासंचालक, जम्मू-काश्मीर

सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवर पोलिसांनी गुन्हा का नोंद केला नाही, याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक एस्.पी. वेद यांंनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF