महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित पशु-पक्षी आध्यात्मिक स्पंदने जाणू शकतात, तर मनुष्य का नाही ? या विषयावर शोधनिबंध सादर

मेक्सिको येथे धर्ममीमांसा आणि पंथ यांतील प्राण्यांचे स्थान विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

मेक्सिको – येथे १७ ते २४ जानेवारी २०१८ या दिवशी धर्ममीमांसा आणि पंथ यांतील प्राण्यांचे स्थान (अ‍ॅनिमल्स इन थिओलॉजी अ‍ॅण्ड रिलीजन) या विषयावर मायंडींग अ‍ॅनिमल्स इंटरनॅशनल इनकॉर्पोरेटेड यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत २० जानेवारीला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पशु-पक्षी आध्यात्मिक स्पंदने जाणू शकतात, तर मनुष्य का नाही ? (इफ अ‍ॅनिमल्स कॅन परसिव्ह स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स, वाय कान्ट हयूमन्स  ?) या विषयावर विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सहलेखक पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी लिहिलेला शोधनिबंध मेक्सिको येथील साधिका कु. मारीआला यांनी सादर केला.

शोधनिबंध सादर करतांना कु. मारीआला यांनी मांडलेली ठळक सूत्रे

१. वर्ष २००४ मध्ये त्सूनामी येण्यापूर्वी काही घंटे आधी पशू-पक्ष्यांनी समुद्रसपाटीपेक्षा अधिक उंचीच्या भागात आश्रय घेतला होता. या नैसर्गिक आपत्तीत १४ देशांतील साधारण २ लाखांहून अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या; पण त्या तुलनेत पशू-पक्षी मरण्याचे प्रमाण किरकोळ होते. यातून पशू-पक्षांमध्ये अशी कोणती क्षमता आहे, ज्यामुळे जे मनुष्याला कळू शकले नाही, ते त्यांना जाणता आले ? त्यांच्यात निसर्गातील पालटांच्या संदर्भात असलेल्या सजगतेमुळे कि सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेमुळे कि दोन्हींमुळे त्यांना कळते ?, असे प्रश्‍न निर्माण होतात.

२. सुनामी आणि तशाच अन्य काही घटनांमुळे पशू-पक्ष्यांमधील आध्यात्मिक स्पंदने जाणण्याच्या क्षमतेविषयी संशोधन करण्याची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला प्रेरणा मिळाली. आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाता सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण विश्‍वातील प्रत्येक वस्तूतील महत्त्वाचे घटक आहेत. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी वातावरणात रज-तमप्रधान स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढते. ही स्पंदने पशू-पक्ष्यांना त्यांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेमुळे जाणता आली.

३. सात्त्विक पशू-पक्षी सात्त्विक, तर असात्त्विक पशू-पक्षी असात्त्विक संगीत, खाद्यपदार्थ, वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांची निवड करतात, तसेच असात्त्विक पशू-पक्षांना सात्त्विक वातावरणात आणि सात्त्विक पशू-पक्षांना असात्त्विक वातावरणात जास्त काळ रहाता येत नाही, हे कुत्रा, गाय, घोडा, ससा आदी प्राणी आणि कोंबडा, पोपट आदी पक्षी यांच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनात दिसून आले.

४. गोवा येथील सनातनच्या आश्रमात वारंवार येणारी एक गाय, सनातनच्या दक्षिण भारतातील सेवाकेंद्रात मुक्तपणे फिरणारा मोर, एरव्ही व्यक्तींपासून दूर रहाणारी; पण सनातन आश्रमात साधकांच्या सहवासात सहजपणे थांबणारी फुलपाखरे, सात्त्विक आणि असात्त्विक वस्तूंमधील भेद ओळखून सात्त्विक वस्तूंचीच निवड करणारा पोपट आदींच्या संदर्भातील चित्रीकरणही उपस्थितांना दाखवण्यात आले.

५. पशू-पक्षांप्रमाणेच मनुष्यामध्येही सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता उपजतच असते; पण त्याने व्यावहारिक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने ती क्षमता गमावली आहे. नियमित आध्यात्मिक साधना केल्यास तो ही क्षमता पुन्हा प्राप्त करू शकेल आणि त्यामुळे त्याला त्याच्या भोवतालचे जग व्यापक दृष्टीकोनातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

क्षणचित्रे

१. शोधनिबंध सादर करणार्‍या कु. मारीआला या विदेशी असल्या, तरी त्यांना भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व पटल्याने शोधनिबंध सादर करतांना त्यांनी साडी नेसली होती.

२. कु. मारीआला या शोधनिबंध सादर करत असतांना भूकंपाची घंटा वाजल्याने त्वरित सभागृह रिकामे करून सर्वांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले. थोड्या वेळाने परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वजण पुन्हा सभागृहात आले आणि त्यानंतर कु. मारीआला यांनी त्यांचे सादरीकरण पुन्हा चालू केले. असे १५ मिनिटांच्या सादरीकरणात ३ वेळा झाले. शोधनिबंध मांडतांना आलेल्या अडथळ्यांमुळे आयोजकांनी कु. मारीआला यांना २२ जानेवारीला पुन्हा एकदा शोधनिबंध मांडण्याची संधी दिली.


Multi Language |Offline reading | PDF