इस्रोच्या १०० व्या उपग्रहाच्या निमित्ताने…

संपादकीय

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १२ जानेवारी या दिवशी नवा इतिहास रचला आहे. आपले पी.एस्.एल्.व्ही. सी.-४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात झेपावले. यात ३ भारतीय, तर २८ विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. अवकाशात झेपावलेला इस्रोचा हा शंभरावा उपग्रह आहे. इस्रोची ही कामगिरी ऐतिहासिक तर आहेच; मात्र भारतियांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. भारताला मागास ठरवून हिणवणार्‍या पाश्‍चात्त्यांना इस्रोच्या वैज्ञानिकांनी भारतियांची तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील क्षमताच दाखवून दिली आहे.

वैज्ञानिक कर्तृत्वात जगात अव्वल !

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्रायोजनिक इंजिनचा वापर, हा या मोहिमेतील महत्त्वपूर्ण भाग होता. यापूर्वी वैज्ञानिक आणि तांत्रिक साहाय्यासाठी आपल्याला अमेरिकेसारख्या गर्विष्ठ देशाकडे हात पसरण्याची वेळ येत असे. काही वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान जगातील रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि जपान या ५ देशांकडेच उपलब्ध होते. भारताने यातील काही देशांकडे क्रायोजनिक इंजिनचे तंत्रज्ञान मिळवण्यासंदर्भात विचारणा केली होती, तेव्हा अमेरिकेने या देशांवर दबाव आणून भारताला हे तंत्रज्ञान मिळू दिले नव्हते. यातून खचून न जाता भारतीय शास्त्रज्ञांनी अन्य देशांहून शक्तीशाली आणि अधिक वजन घेऊन जाणार्‍या क्रायोजनिक इंजिनची निर्मिती केली. गतवर्षी भारताने या शक्तीशाली क्रायोजनिक इंजिनच्या साहाय्याने १०४ उपग्रह अंतराळात पाठवण्याचा विश्‍वविक्रम केला. विशेष म्हणजे या १०४ मधील ९६ उपग्रह जागतिक महासत्ता म्हणवणार्‍या आणि एकेकाळी भारताला तंत्रज्ञान न मिळण्यासाठी अन्य देशांवर दबाव आणणार्‍या अमेरिकेचे होते. मंगळावरही पहिल्याच प्रयत्नात पोहोचलेला भारत हा एकमेव देश आहे. अमेरिकेने त्यासाठी ५ वेळा प्रयत्न केल्यावर त्यांना ६ व्या वेळी यश आले, रशियाला ८ वेळा प्रयत्न करावे लागले होते, तर चीनलाही पहिल्या प्रयत्नात यश आले नव्हते. पी.एस्.एल्.व्ही.च्या (Polar Satellite Launch Vehicle च्या) माध्यमातून एकाच वेळी २८ देशांचे २०९ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रमही इस्रोच्याच नावावर आहे.

अंतराळातील कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पेसएक्सची फाल्कन ९, रशियाची प्रोटॉन यूएलए आणि एरियनस्पेस यांसारख्या आस्थापनांना मागे टाकून इस्रो स्वस्त दरात ही सेवा पुरवत असल्याने इस्रोच्या एँट्रिक्स कॉर्पोरेशनने उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. स्वतःचे उपग्रह निर्मिण्यासह लहान उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे नैपुण्य इस्रोने मिळवले आहे. याद्वारे भारताला मोठ्या प्रमाणात विदेशी चलनही मिळत आहे.

खर्च कमी आणि यशाची हमी !

बहुतांश वेळा वैज्ञानिक क्षेत्रातील काही मोहिमा म्हटले की, त्यावर होणारा प्रचंड खर्च डोळ्यांसमोर येतो. त्यातही इस्रोने स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. खर्च कमी (अल्प) आणि यशाची हमी (निश्‍चिती) या सूत्रामुळे इस्रोने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. इस्रोने पहिल्याच चंद्रयान मोहिमेसाठी केवळ ३९० कोटी रुपये खर्च केले होते. अमेरिकेच्या नासा या अंतरिक्ष संस्थेशी तुलना करता ती रक्कम ८ ते ९ पट अल्प होती. आपल्या मंगळायन मोहिमेसाठी केवळ ४३० कोटी रुपये एवढा खर्च आला होता. हा नासाच्या मंगळावरील मोहिमेच्या तुलनेत केवळ ११ टक्के आहे. इस्रोचा वार्षिक अर्थसंकल्प नासाच्या ३ टक्के आहे, असे इस्रोचेच माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे.

या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक असते की, आकडे शेकडो कोटींमध्ये दिसले, तरी देशाच्या विकासासाठी तो खर्च करणे आवश्यकही असते. दूरचित्रवाणी, भ्रमणभाष, इंटरनेट आदी सुविधा आज आपल्या एका क्लिक वर आल्या आहेत; याचे कारण हे उपग्रहच आहेत. जगातील अनेक प्रगत देश आज संशोधन आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रांत मोठी गुंतवणूक करत असतात. देशाच्या सर्व क्षेत्रांतील विकासाला गती देण्याचे कार्य इस्रो करत आहे. वैज्ञानिक प्रगतीसह संरक्षण, हवामान अंदाज, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत आज इस्रोच्या या मोहिमांचा भारताला मोठा लाभ होत आहे.

शास्त्रज्ञांचे खडतर परिश्रम, हेच यशाचे गमक !

अत्यंत खडतर परिस्थितीत सातत्याने आणि चिकाटीने संशोधन करून वैज्ञानिक क्षेत्रात एकेक पाऊल पुढे पुढे जाणार्‍या इस्रोमुळे भारताची ख्याती जगभर पोहोचली आहेच; मात्र देशही आत्मनिर्भर होत आहे. भारतियांची काटेकोर, कार्यप्रवण आणि सातत्यवान अशी एक उज्ज्वल प्रतिमा इस्रोने जगापुढे स्थापित केली आहे. ही सर्व यशोशिखरे पार करत असतांना एक गोष्ट ठळकपणे दिसून येते की, आजचे जे स्वतःला आधुनिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी म्हणवून घेतात, त्यांच्याप्रमाणे ही शास्त्रज्ञ मंडळी विज्ञानालाच श्रेष्ठ ठरवून नास्तिकतावादाचा प्रसार करत नाहीत. कोणताही उपग्रह अवकाशात पाठवण्यापूर्वी इस्रोचे प्रमुख श्री तिरुपतीच्या चरणी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यास आवर्जुन जातात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही इस्रोची परंपरा आहे. त्यामुळेच इस्रोचे संशोधक भारतियांना खर्‍या अर्थाने भारतीय आणि जवळचे वाटतात. अत्यंत समर्पितभावाने कार्य करून देशाला यशोशिखरावर नेणारे इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधक यांना १०० व्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिवादन !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now