मराठा क्रांती मोर्च्याकडून धुळे येथे भव्य निषेध मोर्चा

महाराष्ट्र बंदच्या काळात धुळ्यात समाजकंटकांकडून अपप्रकार झाल्याचे प्रकरण

धुळे  कोरेगाव भीमा घटनेनंतर ३ जानेवारी या दिवशी धुळ्यात बंद पुकारण्यात आला होता. त्या वेळी काढलेल्या मोर्च्यामध्ये काही समाजकंटकांनी हिणकस घोषणाबाजी केली, महिलांना शिवीगाळ केली, महापुरुषांचा अपमान केला. या प्रकाराचा निषेध करत जाब विचारण्यासाठी १२ जानेवारीला सकल मराठा समाजाच्या पुढाकारातून मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले. संयोजकांनी मात्र हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नसून अपप्रवृत्ती आणि गुंडगिरी यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. मोर्चेकर्‍यांनी आपला संताप अत्यंत शिस्तबद्धपणे व्यक्त केला.

१. आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी १२.३० वाजता मोर्च्याला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

२. वाढती गुंडगिरी, हप्तेखोरी आणि व्यापार्‍यांसह जनसामान्यांना त्रास देणार्‍या गुंडप्रवृत्तीविरुद्ध मोर्चा असल्याने शहरातील व्यावसायिकांनी दुकाने खुली ठेवून मोर्च्यास पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

३. मोर्च्यासाठी ५२ पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी यांसह ७०० पोलीस नियंत्रणास नियुक्त करण्यात आले होते. मोर्च्यात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवून पाण्याच्या बाटल्या, कागद उचलून घेतले.

४. मोर्च्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी झाला. तेथे आधुनिक वैद्य, अधिवक्ता, महिला, व्यावसायिक यांच्यासह १६ जणांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मागण्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतली.

या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पूर्ण महाराष्ट्रात उमटले नाहीत, एवढे गंभीर परिणाम धुळे जिल्ह्यात उमटले. ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदला धुळे जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माचे लोक, व्यावसायिक, शिक्षण संस्था यांनी पाठिंबा देऊन उत्स्फूर्त बंद पाळून घटनेचा निषेधच केला; मात्र तरीही काही अपप्रवृत्तींनी बंद दुकाने, महामंडळाच्या बसगाड्या, सामान्य नागरिक यांच्या चारचाकींसह दुचाकी वाहनांवर दगडफेक करत, दहशत माजवत लाखो रुपयांची हानी केली.

२. घरातून, इमारतींवरून मोर्च्याची पाहणी करणार्‍या माता-भगिनींना अश्‍लील शिवीगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत हीन शब्द वापरले. हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे, देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. हे सर्व घडत असतांना मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्यांच्यावर हद्दपारी अन् स्थानबद्धतेच्या नोटिसा बजावल्या आहेत, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण यात सहभागी झाले होते. त्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट पसरली. म्हणूनच हा मोर्चा काढण्यात आला आहे.

धुळे भगवेमय

मोर्च्यात सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच शहरासह आसपासच्या खेड्यांमधून युवक-युवती हातात भगवे झेंडे घेऊन, मराठा क्रांती मोर्च्याची टोपी घालून झुंडीने येत होते. त्यामुळे शहर भगवेमय झाले होते.

निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे

१. ३ जानेवारीच्या मोर्च्यात घडलेल्या अपप्रवृत्तींविषयी सखोल चौकशी करून दायित्व असणार्‍यांचे ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करून त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्यात यावे.

२. मोर्च्याच्या वेळी झालेली हानीभरपाई मोर्च्याचे आयोजन करणार्‍या नेत्यांकडून वसूल करावी.

३. दायित्वशून्य पोलीस अधिकार्‍यांचे जिल्ह्यातून तात्काळ स्थानांतर करावे.

४. हद्दपार आरोपींना कठोर शासन करण्यात यावे.

५. दंंगलीच्या वेळी मारल्या गेलेल्या राहुल फटांगडे या युवकास सरकारने १ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करावे, तसेच मारेकर्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करावा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now