आपल्यामुळे सनातन संस्थेचे नाव अपकीर्त होऊ नये, यासाठी साधकांचे वागणे आदर्श असायला हवे !

सद्गुरु सत्यवान कदम

आपल्या पूर्वसुकृताने आपल्याला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्थांच्या माध्यमांतून साधना करण्याचे भाग्य लाभले आहे. परात्पर गुरुदेवांसारखे गुरु आपल्या जीवनात आले, हे तर आपले महद्भाग्य आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे जनमानसात एक आदराचे स्थान आहे. या संस्थांचे साधक म्हणजे आदर्श साधक या दृष्टीने लोक आपल्याकडे पहात असतात; म्हणून सनातनच्या प्रत्येक साधकाने आदर्श रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. आपले चालणे, बोलणे, वागणे आणि आपला व्यवहार हा आदर्शच हवा. प्रसारातील साधकांचा सेवेच्या निमित्ताने समाजातील लोकांशी संपर्क येतो. समाजातील लोक आपल्याला आपल्या नावाने अल्प, तर सनातनवाले म्हणून अधिक ओळखत असतात. आपल्या हातून एखादी अयोग्य कृती घडल्यास हे सनातनवाल्यांमुळे झाले, असे नाव होते. त्यामुळे सनातन संस्थेचे नाव अपकीर्त होते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात समाज सहभागी व्हावा, त्याची या माध्यमातून साधना व्हावी; म्हणून सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम म्हणजे गुरुदेवांनी आपल्याला दिलेली साधना करण्यासाठीची सुवर्णसंधीच असते. साधकांनी हे उपक्रम वेळेत चालू करावेत आणि वेळेत संपवावेत. त्या वेळी साधकांचे वागणे साधकत्वाला साजेसे असायला हवे. त्यांचा पोशाख व्यवस्थित असायला हवा. साधकांमध्ये साधकत्वाचा अभाव असल्यामुळे किंवा त्यांच्यात असलेल्या स्वभावदोषांमुळे त्यांच्या हातून बर्‍याचदा चुका होतात. त्यामुळे संबंधितांचा साधकांवर असलेला विश्‍वास न्यून व्हायला लागतो. असे होऊ नये; म्हणून साधकांनी प्रत्येक गोष्टीत आदर्श रहावयास हवे. साधकांनी चुका झाल्यास संबंधितांची क्षमा मागायला हवी.

– (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१७)