स्त्रियांना आकृष्ट करून जिहादी बनवण्याच्या वेगवेगळ्या योजनांना सुरूंग लावणे अत्यावश्यक !

१. जिहादमध्ये सहभागी असलेल्या कट्टरपंथीय मुसलमान स्त्रिया !

अल् कायदा या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी याची एक पत्नी उमायमा अल् जवाहिरी हिने जिहादी स्त्रियांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. डिसेंबर २००९ मध्ये लिहिलेले हे पत्र जिहादिका नावाच्या संकेतस्थळावर वाचायला मिळते. मुसलमान स्त्रियांनी जिहादचा मार्ग सोडू नये. आपला विजय जवळ आला आहे, असे सांगतांनाच बुरखा वापरण्याचा पुरस्कारही तिने या पत्रात केला होता. जिहादी स्त्रियांनी संघटनेतील पुरुषांना पूरक भूमिका घ्यावी, असा पत्राचा आशय होता. घातपाती कारवायांमधील सहभागाला आयमन जवाहिरीचा विरोध होता. त्याच्या मतांचाच विस्तार उमायमाच्या पत्रात झालेला दिसतो. हे पत्र उजेडात येऊन सात वर्षे झाली आहेत. आतंकवादी जग आता अधिक आक्राळ-विक्राळ झाले आहे. इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेच्या वर्चस्वामुळे कट्टरपंथियांची शक्ती वाढली आहे. त्याचसह घातपाती कारवायांमध्ये कट्टरपंथीय स्त्रियांच्या सहभागाच्या घटनाही वाढल्या आहेत.

२. सर्व आतंकवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग दिसतो !

लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलमपासून ते चेचेन्यातील ब्लॅक विडो आणि पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइनपर्यंत सर्व आतंकवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. या स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टीकोन अत्यंत पारंपरिक आणि रूढीवादी असला, तरी त्यात उत्तरोत्तर पालट होत गेला आहे. विशेषतः युरोपातील स्त्रिया आतंकवादी कृत्यांमध्ये भाग घेऊ लागल्यावर तो बराचसा पालटला. जिहादी स्त्रियांनी घर राखावेच; परंतु शक्य असल्यास आत्मघाती कृत्यांमध्येही भाग घ्यावा, असा विचार पुढे आल्याने या संघटनांमधील स्त्रियांचे महत्त्वही वाढले आणि तो जगभराच्या चिंतेचा विषय ठरला.

३. स्त्रिया आतंकवादाकडे का आकृष्ट होतात ?, याचा युरोप आणि अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर अभ्यास

फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, कॅनडा, नॉर्वे, स्वीडन आणि अमेरिका या देशांमधून लक्षणीय संख्येने स्त्रिया सिरियात जाऊ लागल्याची वृत्ते थडकल्याने इस्लामिक स्टेट (इसिस) या आतंकवादी संघटनेतील स्त्रियांच्या सहभागाकडे लक्ष वेधले. त्यामुळे स्त्रिया आतंकवादाकडे का आकृष्ट होतात ?, याचा अभ्यास युरोप आणि अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर चालू झाला.

४. आतंकवादी संघटनेकडून सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर उघड करणारी फ्रेंच महिला पत्रकार

इसिस ही आतंकवादी संघटना तिचे जाळे विस्तारण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा कसा वापर करते, याचे भीतीदायक दर्शन इन द स्किन ऑफ ए जिहादिस्टसारख्या पुस्तकातून घडते. एका फ्रेंच पत्रकार स्त्रीची ही सत्यकथा आहे. इस्लामी कट्टरवादाकडे आकृष्ट होऊन १५-१६ वर्षांच्या मुली युरोपातून सिरियात जाण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्यावर याचा शोध घेण्यासाठी ही पत्रकार मेलडी या खोट्या नावाने बनावट फेसबूक खाते उघडते. या खात्यावर तिला आय.एस्.चा म्होरक्या अबू बक्र अल् बगदादी याचा निकटवर्तीय आतंकवादी बिलाल याचा संदेश येतो. मेलडी त्याला तिचे वय वीस आहे आणि ती ख्रिस्ती धर्म सोडून गुप्तपणे मुसलमान पंथात प्रवेश केल्याचे भासवते. तेथून एक मासाच्या (महिनाभराच्या) घटनाक्रमात दोघांचेही फेसबूकवरून झालेले संभाषण पुस्तकात दिले आहे. या काळात बिलाल तिला स्वतःची छायचित्रे पाठवतो आणि तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याच्या गोड शब्दांना भाळून विवाह करण्यास सिद्ध आहे, असे ती सांगते आणि फेसबूकवरच हा विवाह होतो. मग तो तिला सिरियात बोलावतो. ती अ‍ॅमस्टरडॅमपर्यंत पोहोचते आणि तिथेच तिचे सत्य उघडकीस येते. ती मेलडी नसून पत्रकार असल्याचे समजल्यावर पिसाळलेला बिलाल तिच्या विरोधात फतवा काढतो. ती कुत्र्यापेक्षाही अशुद्ध आहे, असे सांगणारा एक व्हिडिओ यू ट्यूबवर झळकतो. अ‍ॅनी या काल्पनिक नावाने हे पुस्तक लिहिणारी ही पत्रकार स्वतःची ओळख लपवून आजही फ्रान्समध्ये पत्रकारिता करत आहे.

५. स्त्रियांना आकृष्ट करण्याच्या आतंकवाद्यांच्या पद्धती आणि अन्य कारणे !

५ अ. विवाहाच्या भूलथापा देऊन आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन : साधारणतः दोन वर्षांपूर्वी आलेल्या या पुस्तकातून तरुण मुलींना विवाहाच्या भूलथापा देऊन, त्यांना भुरळ पाडून आतंकवादी त्यांना संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा अत्यंत परिणामकारक वापर केला जातो, हे ठळकपणे समोर येते. अशा मुली बर्‍याचदा अल्पवयीन असतात. या संबंधीच्या अभ्यासात अशा मुलींना जिहादी वधू, असे संबोधले जाते.

५ आ. या स्त्रिया इस्लामी कट्टरतावादी विचारांकडे आकृष्ट होतात ! : स्त्रियांना आकृष्ट करण्याची ही एक पद्धत आहे. मात्र आतंकवादी संघटनांमध्ये दाखल होण्यास स्त्रियांना जसे वश केले जाते, तसेच त्या इस्लामी कट्टरतावादी विचारांकडे आकृष्ट होतात, असा दावाही करण्यात येतो. पुरुष आतंकवाद्यांप्रमाणेच त्यांच्या मनातही खलिफातचे (इस्लामिक भूभाग) स्वप्न रुजलेले असते आणि या मृगजळामागे त्या सिरियात पोहोचतात, असे म्हटले जाते.

५ इ. स्त्रियांना आतंकवादात सामील होण्यास भाग पाडणे : इसिसच्या क्रूरकर्म्यांनी वर्ष २०१४ मध्ये यझिदींना इस्लामविरोधी ठरवून त्यांच्यावर आक्रमणे केली. अनेकांना ठार केले. यझिदी स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवून मोसूलमध्ये डांबले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. काही स्त्रियांना विकले. काहींनी आत्महत्या केल्या.

६. स्त्रियांची संघटनेतील भूमिका

स्त्रियांनी जिहादमध्ये सहभाग कसा घ्यावा, हे त्यांनीच आपल्या क्षमता ओळखून ठरवावे, असे इसिसने एका ठिकाणी नमूद केले आहे. स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाची देखभाल करायची असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर अवश्य करावा. मात्र तिने स्वसंरक्षणार्थ शस्त्र चालवणे शिकून घ्यावे, असे म्हटले आहे. संघटनेच्या म्होरक्याने अनुमती दिली, तर घातपाती कारवायांमध्ये भाग घ्यावा; मात्र स्त्री आणि पुरुष यांचे एकत्रित दल असू नये, असे इसिस सांगते.

६ अ. स्त्रियांच्या कामाचे स्वरूप : स्त्रियांच्या कामाचे स्वरूप दोन प्रकारांत विभागता येते. पहिले म्हणजे पुरुष आतंकवाद्यांच्या दैनंदिन आवश्यकता भागवणे, संदेशांची देवाण-घेवाण करणे, संशोधनात्मक, प्रलोभने दाखवून संघटनेला भरतीसाठी साहाय्य करणे. या प्रकारातील महत्त्वाचे काम, म्हणजे महान आई बनण्याचे ! अशी आई आपल्या मुलांना जिहादी तत्त्वज्ञानाचे बाळकडू पाजते आणि जिहादींची नवी पिढी उदयास आणण्यास साहाय्य करते.

६ आ. आतंकवादी तत्त्वज्ञानाला वाहून घेतलेली पिढी निर्माण करण्यासाठी शाळा ! : इसिससंदर्भात घोषित करण्यात आलेल्या काही अहवालांनुसार या संघटनेने विशेष मुलींसाठी शाळा स्थापन केल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका यांच्यासाठी बुरखा अन् अंगभर कपडे घालणे सक्तीचे असून शालेय अभ्यासक्रमात विज्ञान, क्रीडा आणि तत्त्वज्ञान या विषयांवर बंदी आहे. इसिस तत्त्वज्ञानाला वाहून घेतलेली पिढी निर्माण करणे, हे या शाळांचे एकमेव उद्दिष्ट आहे. शरीयत कायद्याचे पालन करणार्‍या काही स्त्री आधुनिक वैद्याही (डॉक्टर) जिहादी संघटनांमध्ये कार्यरत आहेत.

६ इ. सामाजिक प्रसारमाध्यमांवरून खलिफातमध्ये सुखी आहोत, हे दाखवण्याची धडपड करणार्‍या जिहादी मुली : एकूणच या प्रकारातील इसिसच्या जिहादी मुली सामाजिक प्रसारमाध्यमांवरून आपण खलिफातमध्ये कशा सुखी आहोत, हे दाखवण्याची धडपड करतांना दिसतात. ट्विटरवरून पोस्ट केलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये त्या फास्ट फूड खातांना, मोफत घरांमध्ये रहातांना दिसतात. अल् कायदामध्ये दाखल झालेल्या स्त्रियांकडे प्रामुख्याने पुरुष आतंकवाद्यांची सेवा करण्याचे काम दिले आहे.

६ ई. आतंकवादी स्त्रियांना बॉम्बफेक, शस्त्रास्त्रे चालवणे, स्फोटके हाताळणे यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते : दुसरी भूमिका म्हणजे आत्मघाती आक्रमणे, गोळीबार, अपहरण अशा प्रत्यक्ष कारवायांमध्ये सहभागी होणे. या आतंकवादी स्त्रियांना बॉम्बफेक, शस्त्रास्त्रे चालवणे, स्फोटके हाताळणे यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. इसिसने घातपाती कामे करणार्‍या स्त्रियांची अल्-खन्सा ब्रिगेड स्थापन केली आहे. या ब्रिगेडचा प्रभाव रक्का आणि मोसूलमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. या ब्रिगेडमधील स्त्रिया तथाकथित खलिफातच्या सीमांचे रक्षण करण्याचे कामही करतात.

७. जिहादमध्ये स्त्रियांचा वाढता सहभाग हा अत्यंत चिंताजनक विषय

जिहादमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे. तो अत्यंत चिंताजनक आणि नव्या प्रश्‍नांना जन्म घालणारा आहे. असे असूनही त्याला आवर घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र विशेष प्रयत्न होतांना दिसत नाहीत. पुरुष दहशतवादी आणि स्त्री दहशतवादी असा भेद मानणे योग्य नसले, तरी स्त्रियांना आकृष्ट करण्याच्या आय.एस्.च्या वेगवेगळ्या योजनांना सुरूंग लावणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी बळाच्या वापरासमवेतच स्त्री दहशतवादी असा वेगळा अभ्यास करण्याची आणि वेगळी धोरणे आखण्याची आवश्यकता आहे.

– सुनीता लोहोकरे (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, ११.१२.२०१६)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now