भारतीय सैनिकांच्या त्यागाचे मोल जाणून त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे आवश्यक !

सुकमा येथे २४.४.२०१७ या दिवशी झालेल्या सीआर्पीएफ्च्या २५ सैनिकांच्या हौतात्म्यामुळे देशभरात जो तीव्र संताप व्यक्त व्हायला हवा होता, त्याचा कुठलाही संकेत मिळत नाही. आक्रमणकर्ते साम्यवादी विचारसरणीला मानणारे आहेत; म्हणूनच केवळ गोरक्षकांवर संपादकीय लिहिणारे आणि सामाजिक प्रसारमाध्यमांवर त्यांची पाकिस्तानी आतंकवाद्यांशी तुलना करणारे आज गप्प बसले आहेत का ? वस्तुस्थिती ही आहे की, या २५ सैनिकांना साम्यवादी आतंकवाद्यांनी मारले आहे. ही गोष्ट ढळढळीतपणे दिसत असूनही ती मान्य करण्यास आणि त्याचा उघडपणे उच्चार करण्यास हे लोक का कचरतात ? जेव्हा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी संसदेवर आक्रमण केले होते, तेव्हा ते आक्रमण म्हणजे भारतावर आक्रमण असल्याचे समजण्यात आले होते. साम्यवादी आतंकवाद्यांनी आमच्या सैनिकांवर केलेले आक्रमणही भारताविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे.

१. केवळ गणवेशावरून सैनिक आणि अर्धसैनिक दलांमध्ये भेद करणे चुकीचे

गेल्या काही वर्षांपासून साम्यवादी आणि जिहादी यांच्यात भारतविरोधी आघाडी झाली आहे, जी काश्मीर ते छत्तीसगडपर्यंत सक्रीय आहे. जम्मू-काश्मीरमधील जवळजवळ सर्वच शहरे आणि सीमेवरील आघाडीवर लष्करी सैनिकांसमवेत रहाण्याची मला पुष्कळ संधी मिळाली आहे. केरळ, कर्नाटक, बिहार, आसाम, अरुणाचलपासून गुजरात, पंजाब आणि जम्मूचे निवासी अतिशय अभिमानाने अन् गौरवाने लष्करात दाखल होतात. मग सीआर्पीएफ् (केंद्रीय राखीव पोलीस दल) असो, बीएस्एफ् (सीमा सुरक्षा दल) असो अथवा आयटीबीपी (इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस) ! आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांच्या गणवेशाच्या आधारे कुठलाही भेदभाव होऊ शकत नाही, तो जो कोणी आहे, तो भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तत्पर भारतमातेचा पुत्र आहे. याशिवाय त्याची दुसरी कुठली ओळख करून देणे चुकीचे ठरेल.

२. सैनिकांविषयी काश्मिरींना किमान आदरही नाही !

मी सैनिकांना होणारा त्रास, त्यांचे दु:ख जवळून अनुभवले आणि मनात ते खोल रुतून बसले. काश्मीरचे दगडफेक करणारे लोक आमच्याशी काय नाते ठेवू इच्छितात आणि आम्ही त्यांच्याशी कुठले नाते ठेवले पाहिजे, हे आधी ठरवावे लागेल. विडंबना ही आहे की, या देशात क्वचित्च असा कुठला नेता असेल, ज्याचा मुलगा लष्करात दाखल झाला आहे अथवा आजही तैनात आहे. आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवणारा पत्रकार बनणे, हे माध्यमांत अभिमानाचे सूत्र बनले आहे. सैनिकांचे दु:ख, त्यांच्या वेदना दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दाखवणे मागासलेले समजले जाते. आपला मुलगा आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असूनही बदमाश आणि दगडफेक करणार्‍यांचा बळी ठरणार असेल, तो स्वतःचे अन् त्याच्या सहकारी सैनिकांचे रक्षण करण्यासाठी गोळीचा उपयोग करू शकत नसेल, तर आपल्याला कसे वाटेल ? सामाजिक प्रसारमाध्यमांवर ज्या प्रकारच्या चित्रफिती (व्हिडिओ) अत्यंत वेगाने पसरत आहेत, ते पाहून जर कुणाचे रक्त उसळत नसेल, तर त्याच्या भारतियतेविषयी शंका घेण्यास जागा आहे. हे (काश्मिरी) लोक देशभक्त भारतीय जनतेच्या परिश्रमाच्या कमाईतून दिलेल्या महसुलाच्या बळावर शिकतात. स्वतःची कारकीर्द घडवतात आणि नंतर टवाळखोरी करण्यासाठी भरपूर वेळ काढून आपल्याच रक्ताच्या, भारतीय बांधवांविरुद्ध लढण्यास उभे ठाकतात. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत जे सैनिक या काश्मिरींचे रक्षण तथा जनतेला पूर, वादळासारख्या नैसर्गिक संकटांपासून वाचवण्यासाठी स्वप्राणांची बाजी लावूनही काम करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे तर दूर, साधा आदरही मिळत नसेल, तर कुठे ना कुठे धोरणात पालट करण्याची आवश्यकता भासणारच आहे.

३. भारताच्या एकतेवर आघात करणार्‍यांना इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून साहाय्य

जे दगडफेक करणारे लोक देशद्रोह, विश्‍वासघात आणि अप्रामाणिकपणे पैसे गोळा करून स्वतःच्याच मातृभूमीविरुद्ध घोषणा देत आहेत; आमच्या वीर सैनिकांचे धैर्य आणि संयमाची परीक्षा घेत भेकडांप्रमाणे स्त्रियांना पुढे करून दगडफेक करतात आणि शिवीगाळ करतात, त्यांच्याविषयी दया दाखवण्याचा विचार तरी सहन केला जाऊ शकतो का ? दगडफेक करणारे खोटारडे आणि विश्‍वासघातकी काश्मिरी आंदोलक अन् त्यांचे सहानुभूतीदार, जे देशातील विविध विद्यापिठांत जहाल साम्यवादी आणि जिहादी यांच्या साहाय्याने केवळ भारताचे सामाजिक धागेदोरे उसवण्याचे कारस्थानच रचत नसून स्वतःची भाषणे अन् पोस्टर यांच्या माध्यमातून भारताच्या एकतेवर आघात करत आहेत, त्यांना सर्वांत मोठे पाठबळ भारताची देशभक्ती हा अतिशय वाईट, तुच्छ आणि त्याज्य गुण समजणारी इंग्रजी प्रसारमाध्यमे अन् वाहिन्या यांच्याकडून मिळत आहे.

४. भारताला चांगल्याच्या बदल्यात नेहमी दगडच मिळतात !

जेव्हा जखमी मेजर सतीश दहिया यांना रुग्णालयात नेण्यात येत होते, तेव्हा दगडफेक करणार्‍यांनी त्यांचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे जो विलंब झाला, त्यामुळे मेजर दहिया यांना वाचवता आले नाही. एवढे सगळे असूनही आम्ही खोर्‍यात चर्चेसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची भाषा करतो, काश्मिरी मुले आमचीच आहेत, असे आम्ही म्हणतो. दगडफेक करणार्‍या कुटुंबांतून निघणार्‍या मुलांचे आयुष्य अतिशय आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे कोण सावरत आहे, हे वास्तव जाणून घ्यायचे असेल, तर एकाच संघटनेचे नाव पुढे येईल अन् ती म्हणजे भारतीय लष्कर ! आपल्याच लोकांनी केलेल्या आघातानंतरही काश्मिरात कानाकोपर्‍यात ४५ हून अधिक सद्भावना विद्यालये भारतीय लष्कराकडून चालवली जातात. यांत जवळजवळ १४ सहस्रहून अधिक काश्मिरी मुसलमान मुले-मुली नगण्य शुल्क देऊन देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षण प्राप्त करत आहेत. अशा २० शाळा पहाण्याची संधी मला प्राप्त झाली. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागतात. मोठमोठ्या नेत्यांकडून शिफारसपत्रे आणली जातात. हे दगडफेकीच्या विषासमोर भारतीय सेनेचे अमृत आहे, जे तिरंग्याची शान आणि संविधानाचा सन्मान वाढवीत आहेत. भारताचे मन नेहमी चांगलेच करू इच्छिते आणि या बदल्यात नेहमी दगडच मिळाले आहेत.

५. धर्मनिरपेक्षतावादी हे गोमांसभक्षकांची वकिली करणे आपले पवित्र कर्तव्य समजतात !

हे केवळ काश्मिरात तैनात सैनिकांपर्यंतच मर्यादित राहिलेले नाही, तर ते सर्वजण, जे देशातील कुठल्याही भागात रहाणारे असोत; जर ते देशभक्तीची भावना दर्शवत सैनिकांच्या सुखदु:खात त्यांच्यासमवेत उभे रहात असतील; अयोध्या, काश्मीर, गोरक्षण आणि धर्मांतर यांविषयी त्यांचे एक विशिष्ट मत असेल, तर त्या सर्व लोकांविरुद्ध शाब्दिक दगडांचे बरसणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. भगवे वस्त्र परिधान केले आहे, ठीक आहे; पण तरीही अशा व्यक्तीचे मुख्यमंत्री बनणे या वर्गाला पसंत पडलेले नाही. गोमांसभक्षण करणारे भलेही कमी संख्येने असतील; महानगरात बसून शाब्दिक दगडफेक करणारे गोपालाच्या देशात गोमांसभक्षकांची वकिली करणे, धर्मनिरपेक्षतावादी आपले पवित्र कर्तव्य समजतात. सैनिकांविषयी सहानुभूती वाटण्याऐवजी सर्वसाधारण नागरिक आणि सुरक्षा दले यांना विश्‍वासघाताने ठार करणार्‍यांविषयी आपलेपणा, सहानुभूती दर्शवणे, या शाब्दिक दगडफेक करणार्‍यांना प्रिय आहे. जसजशी विकासमूलक राष्ट्रीयतेची प्रखर भावना मजबूत होत आहे, तसतसे भारतीय सैनिकांचा उज्ज्वल, धवल पक्ष विजयी होईल, अशी आशा आहे आणि दगडांच्या प्राक्तनात जे लिहिले असते, अगदी तशीच गती सर्व प्रकारच्या दगडफेक्यांना प्राप्त होईल, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही.

– ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now