न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही धोक्यात !

सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ज्येष्ठ न्यायाधिशांची पत्रकार परिषदेत टीका

  • सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चालला नसल्याचा आरोप

  • सरन्यायाधिशांसमोर प्रश्‍न मांडूनही उपयोग झाला नसल्याचेही सूतोवाच

  • देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची पत्रकार परिषद

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश चेलमेश्‍वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांची पत्रकार परिषद

नवी देहली – गेल्या २ मासांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चाललेला दिसत नाही. त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. याविषयी आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही; म्हणूनच आम्हाला माध्यमांसमोर येणे भाग पडले. न्यायव्यवस्थेत हे असेच चालू राहिले आणि न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही धोक्यात येईल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश चेलमेश्‍वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी व्यक्त केली. ‘यापूर्वी असे कधी घडले नव्हते’, असेही त्यांनी सांगितले. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत तोफ डागली. या चारही न्यायाधिशांनी १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता अचानक ही पत्रकार परिषदत घेतली. या वेळी न्या. चेलमेश्‍वर यांनी सरन्यायाधिशांना दिलेले तक्रारीचे पत्र सार्वजनिक करणार असल्याचे सांगितले. न्या. चेलमेश्‍वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असून त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याने देशभरात खळबळ उडाली.

न्या. चेलमेश्‍वर पुढे म्हणाले, ‘‘न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही मुख्य न्यायाधिशांना ४ मासांपूर्वीच पत्र लिहिले होते. त्यात एका खटल्याच्या ‘असाइन्मेंट’विषयी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याविषयी त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे देशासमोर जर आम्ही या गोष्टी ठेवल्या नाहीत, तर लोकशाही संपुष्टात येईल. मुख्य न्यायाधिशांनी देशाविषयीचा निर्णय घ्यावा. आम्ही केवळ देशाप्रती आमचे ऋण व्यक्त करत आहोत. आणखी २० वर्षांनी कुणी आमच्यावर ‘आम्ही विकले गेलो आहोत’, असा आरोप करू नये, यासाठीच या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.’’

या पत्रकार परिषदेत ‘प्रशासनाच्या कामकाजात अनियमितता म्हणजे नेमके काय ?, तुमची मागणी काय होती ?’ आदी प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले; मात्र त्यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला. ‘आम्ही सरन्यायाधिशांना दिलेले पत्र लवकरच सार्वजनिक करू’, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा

न्यायमूर्तींच्या या आरोपानंतर पंतप्रधान मोदी यांनी तातडीने केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला, तरी सरकार यावर लक्ष ठेऊन असल्याचे समजते.

तक्रारींचे आजच निराकरण करू ! – अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल

या प्रकरणी अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ‘न्यायधिशांमधील तक्रारींचे  आजच (१३ जानेवारी) निराकरण केले जाईल’, असे सांगितले.

न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ! – अधिवक्ता उज्ज्वल निकम

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर ज्येष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी ‘न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस काळा आहे’, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘तक्रार मांडण्यासाठी या ज्येष्ठ अधिवक्त्यांनी पत्रकार परिषद घेण्याऐवजी अन्य मार्गांचा अवलंब करायला हवा होता. आता या प्रकारामुळे सामान्य माणूस न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्‍नचिन्ह, तसेच शंका उपस्थित करण्याची शक्यता आहे.’’

न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भातील कायदे रहित करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधिशांनी दिलेल्या माहितीविषयी मत व्यक्त करतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, ‘‘या माध्यमातून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समोर आला आहे. आजपर्यंत याला कायद्याचे संरक्षण होते. त्यामुळे सामान्यांना त्यावर काहीच बोलता येत नव्हते; परंतु आता न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भातील कायदे रहित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर न्यायाधिशांना संरक्षण देणारे कायदेही रहित झाले पाहिजेत.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now