ऑस्ट्रेलिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. शोभना शेट यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सौ. शोभना शेट

वर्ष २०१७ च्या मे मासापासून (महिन्यापासून) मला पुढील अनुभूती येण्यास आरंभ झाला. गुरुपौर्णिमेनंतर त्यांची वारंवारता आणि तीव्रता वाढत गेली. मला पुष्कळदा दैनंदिन जीवनातील कोणतीही कृती करत असतांना माझ्यापुढे घडत असल्याप्रमाणे पुढील दृश्ये दिसतात.

१. एकाच वेळी स्वतःचे विशाल आणि लहान रूप अनुभवणे, अनेकदा स्वतः विशाल रूपात असून स्वतःत श्रीकृष्ण विराट रूपात असल्याचे दिसणे, त्याच्यात सर्व विश्‍व सामावलेले दिसणे, तर दुसर्‍याच क्षणी विराट रूपातील श्रीकृष्णाच्या चरणी स्वतः धुळीच्या कणाएवढी असल्याचे दृश्य दिसणे : कित्येकदा मी आकाराने पुष्कळ मोठी झाली आहे, असे मला जाणवते. ते रूप एवढे मोठे असते की, माझे डोके आकाशाला स्पर्श करते. माझ्या हातांची लांबी आकाशापासून पृथ्वीपर्यंत असते. ते पृथ्वीला टेकल्याचे दिसतात; परंतु मी आतून पूर्णतः पोकळ असते. माझ्यामध्ये केवळ श्रीकृष्ण तेवढ्याच विराट रूपात असतो आणि त्याच्या आतमध्ये मला संपूर्ण विश्‍व, सर्व देश, लोक इत्यादी दिसतात. मला त्याच्या हृदयात रामनाथीचा आश्रम दिसतो. स्वतःला एवढ्या मोठ्या रूपात पहातांना मला अस्वस्थता जाणवते. दुसर्‍याच क्षणी मला श्रीकृष्ण विराट रूपात असून मी त्याच्या चरणांजवळील एक धुळीच्या कणाएवढी लहान आहे, असे दिसते. त्याच्याविना कोणालाही माझे अस्तित्व जाणवत नाही. हे दृश्य दिसल्यावर मला चांगले वाटते.

प्रश्‍न : मला अशा दोन विरुद्ध स्वरूपाच्या अनुभूती येण्याचे कारण काय ? हे वाईट शक्तींनी निर्माण केलेले आभास तर नाहीत ना ?

(संकलक : ईश्‍वराशी एकरूप होण्याच्या सर्वव्यापी होणे किंवा सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हे दोन प्रकार आहेत. बहुतेकांना यांपैकी एकाचीच अनुभूती येते. तुम्हाला येणारी अनुभूती कोणत्याही दिशेने तुम्ही पुढे जाऊ शकाल, हे दर्शवते.)

२. स्वतः वाळूचा कण असून महासागराजवळ बसून श्रीकृष्णाला प्रार्थना करत असल्याचे दिसणे आणि वार्‍याची झुळूक आल्यावर महासागराच्या तळाशी श्रीविष्णूच्या चरणांशी आनंदात असल्याचे जाणवणे : वर्ष २०१७ च्या गुरुपौर्णिमापासून मी एक पुष्कळ लहान वाळूचा कण असून महासागराजवळ बसल्याचे दिसते. तेथे मी मला तुला पहायचे असून तुझ्या चरणांजवळ यायचे आहे, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करत असल्याचे जाणवते. थोड्या वेळानंतर वार्‍याची एक झुळूक आल्याने त्यासमवेत हा वाळूचा कण उडून थेट महासागराच्या मधोमध अगदी तळाशी जातो. तेथे श्रीविष्णु भल्यामोठ्या शेषावर पहुडला असून तो वाळुचा कण श्रीविष्णूच्या चरणांशी आनंदात आहे, असे मला दिसते.

प्रश्‍न : मी सहसा श्रीविष्णूला प्रार्थना करत नाही. त्यामुळे या अनुभूतीचा अर्थ काय आहे ?

(संकलक : साधनेत प्रगती झाल्यावर काही जणांकडून आवश्यक त्या प्रार्थना त्या त्या देवतेला होतात.)

३. मृत्यूच्या पूर्वी मनातील सर्व संस्कार पुसले जावेत, असे वाटणे आणि श्रीकृष्ण आतून काळसर रंगाची घाण ओढून काढत असून आतील बराचसा भाग गुलाबी अन् नंतर पांढरा होत असल्याचे दिसणे, तर काही वेळा श्रीकृष्ण हृदय स्वच्छ करत असल्याचे जाणवणे : अलीकडे माझ्या मनात मी आतून पोकळ व्हायला हवे, असा विचार तीव्रतेने अन् वारंवार येतो. माझ्या मृत्यूच्या पूर्वी माझ्या मनातील सर्व संस्कार पुसले जाऊन मला स्वच्छ व्हायचे आहे; पूर्वग्रहदूषितपणा, वाईट किंवा अयोग्य विचार, प्रतिक्रिया, अपेक्षा इत्यादी काहीच मनात असू नयेत. बर्‍याचदा श्रीकृष्ण माझ्या आतून काळ्या रंगाची पुष्कळ घाण ओढून काढत आहे आणि त्यामुळे माझ्या आतील बराचसा भाग गुलाबी अन् नंतर पांढरा होत आहे, असे मला दिसते. सध्या श्रीकृष्ण माझे हृदय स्वच्छ करत असल्याचे जाणवते.

४. माझ्या आतमध्ये खोलवर एक जीव असून तो सारखा मला मुक्त व्हायचे आहे अन् श्रीकृष्णाला पहायचे आहे, असे सांगत असतो.

५. बाहेर जातांना स्वतः शंखात झाकलेली असून शंखामध्ये चालत असल्याचे जाणवणे आणि कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान केलेला असला, तरी पांढर्‍या रंगाच्या पोशाखातच असल्याचे जाणवणे : काही वेळा मी कामाच्या ठिकाणी किंवा किराणामाल आणायला जात असतांना मी एका शंखामध्ये झाकली गेले आहे. जणू मी शंखामध्येच चालत आहे, असे मला जाणवते. त्या वेळी मी कोणत्याही रंगाचा पोषाख परिधान केलेला असला, तरी मी पांढर्‍या रंगाच्या कपड्यांमध्येच आहे, असे मला दिसते. माझ्या सभोवताली शंखनाद प्रतिध्वनित होत असल्याचेही मला ऐकू येतो.

प्रश्‍न : याचा अर्थ काय आहे ?

(संकलक : शंखामध्येच चालत आहे, असे जाणवणे म्हणजे विष्णुतत्त्वाच्या पोकळीत असणे. गुलाबी रंग प्रीतीचा दृश्य रंग आहे, तर पांढर्‍या रंगाचा कपडा निर्गुण स्थिती दर्शवतो.)

६. नकारात्मक विचारांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत गेल्यावर तेथील कपाटाच्या आरशात स्वतःला पाहू न शकणे आणि नंतर मानसरित्या गेल्यावर आरशात स्वतःच्या ठिकाणी अन् आरशातही श्रीकृष्ण दिसणे : जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराच्या वेळी आम्हाला एका प्रयोगासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी तेथील कपाटाच्या आरशात मी स्वतःला पाहू शकत नव्हते. माझ्या मनात स्वतःविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये झालेल्या शिबिराच्या वेळी साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले होते. त्यांना आलेल्या अनुभूती वाचतांना मलासुद्धा तो प्रयोग करण्याची इच्छा झाली. मी मानसरित्या तेथे गेल्यावर मला तेथील आरशात पहातांना चांगले वाटत होते. आरशात मधेमधे मला स्वतःच्या जागी श्रीकृष्ण दिसत होता. श्रीकृष्ण माझ्यामध्ये आणि त्या आरशामध्येसुद्धा आहे, असे मला वाटत होते. मला त्या आरशाबद्दल प्रेम वाटून मी त्याकडे आकर्षिले जात होते.

प्रश्‍न : हा भास आहे कि नेमके काय आहे ?

(संकलक : अनुभूती आहे.)

– सौ. शोभना शेट, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया . (२४.११.२०१७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now