‘इस्रो’चा १०० वा उपग्रह अंतराळात झेपावला

भाग्यनगर (हैदराबाद) – ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘इस्रो’ने १०० वा उपग्रह अंतराळात सोडून नवा इतिहास घडवला. ‘इस्रो’नेे श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’वरून १२ जानेवारीला सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी ‘पी.एस्.एल्.व्ही.सी. ४०’चे यशस्वी प्रक्षेपण केले. ‘इस्रो’ने ३१ उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत १०० उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

‘पी.एस्.एल्.व्ही.सी. ४०’ समवेत भारताने तब्बल ३१ उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये ३ भारताचे, तर २८ उपग्रह फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या ६ राष्ट्रांचे होते. गेल्या वर्षी ‘इस्रो’ची ‘पी.एस्.एल्.व्ही.सी. ३९’ मोहीम अयशस्वी ठरली होती. त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. ‘इस्रो’ने यश संपादन करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शत्रूराष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास साहाय्य

या उपग्रहात आकाशातून पृथ्वीची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम सीमांवर शत्रूराष्ट्रांवर लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह महत्त्वाचे ठरणार आहेत.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या या यशस्वी कामगिरीचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी ‘या उपग्रहामुळेे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे उज्ज्वल भविष्य दर्शवले आहे’, असे म्हटले आहे. राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांनीही ‘इस्रो’ला शुभेच्छा देत ‘प्रत्येक भारतियासाठी हा गर्वाचा क्षण आहे. ही कामगिरी भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे’, असे गौरवोद्गार काढले.