हे अवश्य कराच !

संपादकीय

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडनच्या दौर्‍यावर गेलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी एका हॉटेलमध्ये चांदीचे चमचे चोरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्या हॉटेलमधील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यामुळे पत्रकारांनी केलेली ही चोरी लक्षात आली. हा भोजन समारंभ एका विदेशी शिष्टमंडळासमवेत होता. यात भारत आणि ब्रिटन या देशांतील महत्त्वपूर्ण राजकीय नेते, उद्योगपती आणि पत्रकार उपस्थित होते. एकूणच देशासाठी हा लाजिरवाणा प्रसंग ठरला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चोरी करणार्‍या पत्रकारांहून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टीकेचे लक्ष्य बनत आहेत. मुळात बॅनर्जी काही ना काही कारणांमुळे टीकाकारांचे लक्ष्य होत्याच. केंद्रशासनाच्या धोरणांवर कडाडून टीका करणे आणि केंद्रशासनाला उघड उघड विरोध करणे यात त्या आघाडीवर आहेत. त्या लंडनच्या दौर्‍यावर जातांना जो पत्रकारांचा चमू त्यांच्याबरोबर होता, त्यांच्यापैकी काही जणांनी चोरीचे पाप केले. चोरी हे हिंदूंच्या शास्त्राप्रमाणे पाप आहे. हिंदूंच्या संस्कृतीत वाढलेल्यांना ते अवगत आहे. हिंदूंची ही शिकवण आपण जगाला सांगतो आणि त्याच्या विरोधात आपण वागतो. त्यामुळे हा प्रकार अधिक चर्चेचा विषय बनला आहे. देशातील बंगाल राज्य हिंदूंच्या शिकवणीपासून वंचित आहे का ?, असा प्रश्‍न जगभरातील जनता विचारत आहे. याचे उत्तर अर्थातच मुख्यमंत्री ममताजी यांच्याकडून अपेक्षित आहे. चोरी करणार्‍या पत्रकारांची ओळखही लपवण्यात येत आहे. चूक करायची आणि ती लपवायची. यातून काय साध्य करायचे ? चोरी करण्याचे पाप टाळण्यासाठी व्यक्तीमध्ये पालट कसे होणार ? राजा कालस्य कारणम् । चोरी करणार्‍या पत्रकारांची नावे लपवली जाण्याला मुख्यमंत्रीच उत्तरदायी आहेत, असा अर्थ कोणी लावल्यास त्यात गैर ते काय ? कारण पत्रकारांचा हा चमू मुख्यमंत्र्यांसोबतच गेला होता. अशा पत्रकारांना कडक शिक्षा दिल्यावाचून मुख्यमंत्र्यांच्या नावाला कलंक लागणे थांबेल का ? बॅनर्जी यांना याविषयी काहीच का वाटत नाही ? चूक करणार्‍याला शिक्षा देणे हे उत्तम प्रशासनाचे लक्षण नाही का ? सीमा भागातून घुसखोरी करणार्‍या बांगलादेशींविषयी सौम्य धोरण ठेवणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्र्यांना बांगलादेशी घुसखोरांमुळे झालेली देशाची हानी ठाऊक नाही, असे म्हणता येत नाही. ही घुसखोरी न थांबवण्याची चूक मुख्यमंत्र्यांकडून होतच आहे, हे जनतेने जाणलेले आहे. पंतप्रधानांच्या विकासाच्या कोणत्याच धोरणाला त्या प्रतिसाद देत नाहीत आणि जनतेलाही केंद्रशासनाच्या धोरणांना विरोध करण्याच्या सूचना देतात. एकूणच त्यांचे राज्य केंद्रशासनाच्या धोरणांशी विसंगत पद्धतीने कारभार चालवते. राज्यातील वातावरण त्यामुळे तमोगुणी असल्याचे म्हणता येते. पत्रकारांनी केलेली चोरी हा त्याचाच भाग आहे. परदेशात जाऊन चोरी करण्यामुळे बंगाल राज्याच्या नावाला कलंक लागला. राज्याला कलंक म्हणजे देशाच्या नावालाही कलंक ! हा कलंक कसा पुसला जाईल, याविषयी मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करतात किंवा नाही, हे कळत नाही. तरीही हा कलंक धुवून काढण्यासाठी राज्यातील तमोगुणी वातावरण दूर लोटून त्या ठिकाणी सत्त्वगुणी वातावरणाची निर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सिद्धता करावी लागेल ! अर्थात् हे करण्यासाठी साधना करण्याची बुद्धी मुख्यमंत्र्यांना होईल का ? हा खरा प्रश्‍न आहे.

विनाशाचे मूळ !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांचा द्वेष करतात, हे नव्याने सांगायला नको. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाल्यावर परदेश दौर्‍यावर गेले होते, तेव्हा म्हणे त्यांच्याबरोबर दोनशे पत्रकारांचा चमू होता. त्या वेळी कोणताच अनुचित प्रकार पत्रकारांकडून घडला नव्हता. बॅनर्जी तर एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर कितीसे पत्रकार गेले असतील ? तरीही त्यांनी चोरीचे पाप केलेच. हे राजकारणाचे क्षेत्र आहे. पत्रकारांनी हे पाप केेलेच नाही किंवा हा अपप्रचाराचा भाग आहे किंवा विरोधकांनी म्हणजे प्रत्यक्ष केंद्रशासनातील कोणीतरी मंत्र्यांनी हे रचलेले षड्यंत्र आहे, असे म्हणत मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आता पुढे येतीलही. पण हा सगळा खोडसाळपणा आहे, हे भारतियांच्या लक्षात आल्यावाचून रहाणार नाही.

एक पत्रकार त्याने चमचा चोरला नसल्याचाच दावा करत होता. वास्तविक या पत्रकाराने चमचा चोरून तो अन्य एका पत्रकाराच्या बॅगेत ठेवला होता. त्याचे हे कृत्य सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍याने टिपले होते. शेवटी हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकाराची पोलीस तक्रार करण्याची चेतावणी दिल्यानंतर संबंधित पत्रकाराने भयभीत होऊन चोरी केल्याचे मान्य केले. या गुन्ह्यासाठी सदर पत्रकाराला ५० पौंडांचा (अनुमाने ४ सहस्र ३०० रुपये) दंड भरावा लागला. स्वयंशिस्तीच्या बाबतीत ही मंडळी किती मागे आहे, हे या प्रकारातून लक्षात येते. राज्याचा प्रत्यक्ष मुख्यमंत्री वादग्रस्त व्यक्तीमत्त्व ठरतो, तेव्हा जनता कशी सुस्वभावी असू शकेल ?, अशीच टीका सर्वत्र होत आहे. यासाठीच वर उल्लेख केल्याप्रमाणे राज्यातील वातावरण सत्त्वगुणी बनवण्यासाठी जनतेला साधना शिकवणे क्रमप्राप्त आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष निधर्मी आणि साम्यवादी विचारधारेच्या पक्षांच्या कंपूतील एक पक्ष आहे. त्यांना साधनेचा मार्ग पसंत नाही. प्रचंड बुद्धीवाद आणि नास्तिकपणा ही त्यांची वैशिष्ट्ये. अहंकाराचे वाढते आवरण त्यामुळे स्वतःच्या मतावर ठाम रहाण्याची वृत्ती. अशा दोषांतून बाहेर पडून साधनेचा मार्ग पत्करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही. तरीही त्या जगन्नियंत्याला शरण जाण्यावाचून पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल अन्यथा ममता बॅनर्जी यांना लंडन दौर्‍यावर जो अनुभव आला, तसेच काहीतरी नकळत घडत रहाणार आणि पुढे ते निस्तरायला वेळ द्यावा लागणार, असे आमच्या अल्प बुद्धीला वाटते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now